आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Andhra Pradesh Chemical Gas Leakage At LG Polymers Industry In RR Venkatapuram Village

भोपाळसारखी दुर्घटना:विशाखापट्टणममध्ये स्टायरीन वायुगळती; ११ ठार, ३०० हून जास्त रुग्णालयात, २० व्हेंटिलेटरवर

विशाखापट्टणम2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात ३६ वर्षांनंतर भोपाळसारखी वायुगळती; श्वास कोंडले, लोक धावले, पळताना बेशुद्ध होऊन पडले

विशाखापट्टणममध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजता एलजी पॉलिमर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात स्टायरीन वायूची गळती झाली. यामुळे ८ मुलांसह ११ लोकांचा मृत्यू झाला. ३०० हून जास्त लोक रुग्णालयात दाखल आहेत. २० जण व्हेंटिलेटरवर आहेत. कारखान्याच्या ५ किलोमीटरच्या कक्षेत येणाऱ्या ५ गावांतील हजारो लोकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनास त्रास, शरीरावर चट्टे आणि मळमळ असा त्रास होत आहे. स्टायरीन वायू हा सिंथेटिक रबर आणि राळ बनवण्यासाठी वापरला जातो. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

विशाखापट्टणम पोलिसांनी एलजी पॉलिमरच्या व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. यात सदोष मनुष्यवध आणि बेजबाबदारीने मृत्यू ही कलमे लावण्यात आली आहेत. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने याची दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.

जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या दोघांचा बोअरवेलमध्ये पडून मृत्यू

आरआर व्यंकटपुरम गावातील एलजी पॉलिमरमधून पहाटे तीन वाजता वायुगळती सुरू झाली तेव्हा बहुतेक लोक झोपेत होते. मात्र, वायूमुळे लोकांना हळूहळू दम लागणे, डोळ्यांची जळजळ आणि चक्कर येणे सुरू झाले. काही जण तर झोपेतच बेशुद्ध झाले. गावातील के. व्ही. रामाकृष्णाने सांगितले की, काहीतरी अघटित घडत असल्याची जाणीव झाली होती. जीव वाचवण्यासाठी लोक घरांतून बाहेर पळाले. मात्र, महिला आणि मुलांसह मोठ्या प्रमाणात लोक जागोजागी बेशुद्ध होऊन पडत होते. काही जणांच्या तोंडातून फेस निघत होता. लोक तडफड करत होते. ठिकठिकाणी पशू-पक्षी निश्चल पडले होते. कारखान्याच्या परिसरातील झाडेझुडपे सुकून गेली होती यावरून वायुगळतीच्या परिणामाचा अंदाज लावता येईल. गावापासून दूर पळताना दोघे बेशुद्ध होऊन बोअरवेलमध्ये पडले. दोघांचाही मृत्यू झाला. लोकांना वाचवण्यासाठी आलेले पोलिसही वायुगळतीने बेशुद्ध झाले. नंतर रिक्षा, दुचाकी, हाताने उचलून पीडितांना रुग्णालयात नेण्यात आले. केजी रुग्णालय आणि इतर रुग्णालयात गोंधळाची स्थिती होती. आई-वडील आपल्या मुलांच्या शोधार्थ आक्रोश करत होते. विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद यांनी सांगितले की, ३.४५ ते ५.४५ वाजेपर्यंत वायूचा थर एवढा दाट होता की कोणीच गावात जाऊ शकले नाही. ९.३० नंतर थर विरळ झाला, तेव्हा खरी स्थिती समजली.

घोडचूक : घटनेनंतर कारखान्याचा सायरन वाजलाच नाही

वायुगळतीच्या वेळी काही कर्मचारी कारखाना पुन्हा सुरू करण्याची तयारी करत होते. लॉकडाऊनमुळे हा बंद प्रकल्प गुरुवारी सुरू होणार होता. सूत्रांनुसार, घटनेनंतर कारखान्यातील सायरन वाजला नाही. कारखान्यातील रेफ्रिजरेशन युनिटमधील बिघाडाने गळती झाली. २० अंशांपेक्षा कमी तापमानात वायू पातळ राहतो. मात्र रेफ्रिजरेशनमधील बिघाडाने त्याचे वायूत रूपांतर होण्यास सुरुवात झाली. हा कारखाना १९७० मध्ये स्थापन झालेला आहे. तेव्हा तो हिंदुस्थान पॉलिमर नावाने विजय मल्ल्या यांच्या मालकीचा होता. नंतर १९९७ मध्ये दक्षिण कोरियाच्या एलजी पॉलिमर्स कंपनीने तो अधिग्रहीत केला होता.

पंतप्रधानांकडून आपत्कालीन बैठक, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना एक कोटी जाहीर 

> आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. व्हेंटिलेटरवर असणाऱ्यांसाठी प्रत्येकी १० लाख, रुग्णालयातील लोकांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येतील. > पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने बैठक आयोजित करून एनडीएमए आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून स्थितीचा आढावा घेतला. गृह मंत्रालय त्यावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. > आंध्र प्रदेशचे डीजीपी गौतम डी. सवांग म्हणाले की, गळती थांबवण्यात आली आहे. स्थिती नियंत्रणात आहे. स्टायरीन विषारी वायू नाही, मात्र जास्त प्रमाणात शोषल्यास मृत्यू होतो.

बातम्या आणखी आहेत...