आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे बडे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री ए के अँटोनी यांचे सुपुत्र अनिल अँटोनी यांनी भाजपत प्रवेश केला आहे. अनिल अँटोनी यांनी गत जानेवारी महिन्यात BBCच्या 2002 च्या गुजरात दंगलीवरील डॉक्युमेंट्रीवरील वादानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी गुरुवारी नवी दिल्लीत भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. यावेळी केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन उपस्थित होते.
अनिल अँटोनी यांचे वडील ए के अँटोनी काँग्रेसचे बडे नेते आहेत. ते काँग्रेस प्रणित यूपीए सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही होते. याशिवाय त्यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.
पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
काँग्रेस सोडण्यापूर्वी अनिल अँटोनी केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलमध्ये सक्रीय होते. त्यांनी बीबीसीची पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीवर टीका करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. भाजप नेते पीयूष गोयल त्यांच्या पक्षप्रवेशावेळी म्हणाले - "अनिल अँटोनी यांचे एक बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. मी त्यांच्यामुळे खूप प्रभावित झालो. शाश्वत विकासावरील त्यांचे विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारासारखे आहे. ते पक्षात सक्रीय भूमिका बजावून दक्षिण भारतात भाजपचे पदचिन्हे वाढवण्यास मदत करतील असा मला विश्वास आहे."
कोण आहेत अनिल अँटोनी
अनिल काँग्रेस नेते ए के अँटोनींचे सुपुत्र आहेत. ए के अँटोनी काँग्रेसचे बडे नेते आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्यावरच या पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गतवर्षी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांचे नाव चर्चेत आले होते.
याऊलट अनिल अँटोनींचे नाव केव्हाच काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातील राजकारणात आले नाही. ते तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरुर यांचे निकटवर्तीय मानले जातात. आपल्या राजीनाम्यातही त्यांनी थरुर यांचे आभार मानले होते.
राजकारणात प्रवेश
2000 मध्ये तिरुवनंतपुरमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेकची पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्टेनफोर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घतेली. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी केरळ कांग्रेसच्या डिजिटल मीडिया समन्वयकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.