आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची तिसरी लाट येण्याची शंका व्यक्त केली जात असताना भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) चौथ्या सिरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष दिलासादायक आहेत. देशातील ६७.६ टक्के नागरिकांमध्ये (सुमारे ८६ कोटी ) कोरोनाच्या अंँटिबॉडी तयार झाल्या आहेत. याचा अर्थ एक तर त्यांना संसर्ग होऊन ते बरे झाले आहेत किंवा लसीकरणामुळे त्यांच्यात अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात कोरोना प्रतिकार क्षमता विकसित झाली आहे. तथापि, अद्याप ४० कोटी नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. मात्र, मुलांमध्ये संसर्गाची शक्यता कमी असल्याने शाळा सुरू केल्या जाऊ शकतात, असेही आयसीएमआरने नमूद केले आहे. मंगळवारी सिरो सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार चौथ्या देशव्यापी सिरो सर्वेक्षणात ६ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या २८,९७५ लोकांचा समावेश होता. या वर्षी जून-जुलै महिन्यात २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांतून नमुने गोळा करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील १० गावे अथवा वाॅर्डातील ४०-४० नमुने गोळा केले. यात ६ ते ९ वयोगटातील २८९२, १० ते १७ वयोगटातील ५,७९९ आणि १८ वर्षांवरील २०,२८४ लोकांचा समावेश होता.
मुलांमध्ये माेठ्यांसारख्याच अँटिबाॅडीज, शाळा उघडण्याआधी शिक्षक-कर्मचाऱ्यांना लस द्यावी
डॉ. भार्गव म्हणाले, मुले विषाणू सहज हाताळतात. त्यांच्या फुप्फुसात कोविड-१९ विषाणू हल्ला करतो ते रिसेप्टर कमी असतात. सिरो सर्व्हेतही ६ ते ९ वर्षांच्या मुलांमध्ये तेवढ्याच अँटिबॉडीज आढळल्या, जेवढ्या प्रौढांमध्ये. युरोपात अनेक देशांनी प्राथमिक शाळा बंद केल्या नव्हत्या. यामुळे शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल. प्राथमिक वर्गापासून शाळा उघडायला हव्यात. नंतर वरचे वर्ग.
- आधी शिक्षक, बसचालक, सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे.
- मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय राज्य व जिल्हा पातळीवर घ्यायचा आहे. तो पॉझिटिव्हिटी रेट व आरोग्य सेवेच्या स्थितीवर अवलंबून आहे.
संसदेत सरकारी ‘वास्तव’ केंद्र सरकार म्हणाले, ऑक्सिजनच्या टंचाईमुळे किती मृत्यू हे राज्य-केंद्रशासित प्रदेशांनी सांगितले नाही...
केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्याकडे नाही. काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितले की, आरोग्य राज्याशी संबंधित विषय आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती नियमित देत आले आहेत. कोणत्याही राज्य-केंद्रशासित प्रदेशाने ऑक्सिजनच्या टंचाईमुळे मृत्यूचा वेगळा अहवाल दिलेला नाही.
- मात्र मंत्र्यांनी मान्य केले की, दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी खूप वाढल्याने राज्यांत समान वाटपासाठी केंद्राला पुढाकार घ्यावा लागला.
- पहिल्या लाटेत एक दिवसात सर्वाधिक ३०९५ टन ऑक्सिजनची गरज भासली होती, तर दुसऱ्या लाटेत ती रोज ९ हजार टन एवढ्या विक्रमी पातळीवर पोहोचली.
अँटिबॉडीज कमी तिथे तिसऱ्या लाटेचा धोका जास्त
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले,‘ज्या भागांत कमी लोकसंख्येत अँटिबॉडीज तयार झाल्या, तेथे तिसऱ्या लाटेचा धोका जास्त आहे. दोन तृतीयांश लोकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्याने आशा निर्माण होते, पण या युद्धाशी समझोता करता येत नाही. त्यामुळे सामाजिक, धार्मिक, राजकीय गर्दी टाळावी.’
- एक डोस घेतलेल्या ८१% व दोन्ही डोस घेतलेल्या ८९.९% लोकांमध्ये अँटिबाॅडीज आढळल्या. लस न घेतलेल्या ६२.३% लोकांमध्येच अँटिबॉडीज.
८५% आरोग्य कर्मचाऱ्यांत आढळल्या अँटिबॉडी
या सिरो सर्व्हेत सहभागी झालेल्या देशातील ७,२५२ आरोग्य कर्मचाऱ्यांत अँटिबॉडीज आढळल्या. १०% आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसच घेतली नाही. १३.४% कर्मचाऱ्यांनी पहिला डोस तर ७६.१% कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.