आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढतोय. यामुळे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, अँटिजन टेस्टऐवजी जास्तीत जास्त आरटी-पीसीआर टेस्ट कराव्यात. मात्र तसे घडताना दिसत नाही. बिहार-तेलंगणसारखी राज्ये ८०% हून जास्त अँटिजन टेस्ट करत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडूसारख्या राज्यांत रुग्ण वाढतच आहेत. यामागील सर्वात मोठे कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने आयसीएमआरचे माजी वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, अँटिजन टेस्टचे अहवाल ४०% पर्यंत सदोष येतात. म्हणजे १० पैकी ४ रुग्ण सुटतात. हाच सर्वात मोठा धोका आहे. यामुळे लक्षण असलेल्या रुग्णांची आरटी-पीसीआर टेस्ट सक्तीची आहे. मात्र, बहुतांश राज्ये असे करत नाहीत. डॉ. गंगाखेडकर यांच्याशी चर्चेचे प्रमुख अंश...
आयसीएमआरने कोरोना टेस्टबाबत प्रोटोकॉल घालून दिला आहे. तो राज्ये पाळत आहेत का?
- प्रोटोकॉलचे पालन होत असल्याचे मला तरी वाटत नाही. सर्व राज्ये अँटिजन टेस्ट वाढवत आहेत. मात्र, अँटिजन टेस्टमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो तेव्हा तत्काळ त्याची आरटी-पीसीआरही करण्याचे निर्देश आहेत. मात्र, त्याचे कठोरपणे पालन होत नाही. हे समाजासाठी बरे नाही.
यामुळे काय आणि किती धोका आहे?
- संसर्ग असूनही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यास त्या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होत राहील. हे अत्यंत धोकादायक आहे.
टेस्टबाबत डब्ल्यूएचओचे काय मत आहे?
- आरटी-पीसीआर आणि अँटिजन, या दोन्ही प्रकारच्या चाचण्या व्हायला हव्यात. दोन्हींची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. लक्षण दिसल्यास तत्काळ टेस्ट करायची असेल तर अँटिजन केली जावी. कारण, आरटी-पीसीआरचा रिपोर्ट येण्यास २४ तास लागतात. तथापि, शक्यतो आरटी-पीसीआरच करावी, असे आयसीएमआरने स्पष्ट केलेले आहे.
काही राज्यांमध्ये प्रोटोकॉलचे पालन होत नाहीय. मात्र तेथे रुग्णही कमी आहेत. असे घडणे शक्य आहे का?
- हे समजून घेण्याची सोपी पद्धत आहे. जर एखाद्या राज्यात पुरेशा संख्येत तपासणी होत असेल आणि तेथील रुग्णालयांत खाटा रिकाम्या असतील तर त्याचा अर्थ सरकार जे सांगतेय ते खरे आहे. नाेंदीत रुग्ण कमी आहेत, मात्र बेड्स रिकामे नसल्यास त्याचा अर्थ तेथे चाचण्या कमी घेतल्या जात आहेत.
काही राज्यांत दुसरी लाट आली आहे, कुठे ५ महिन्यांनंतरही आली नाही, हे तर्कसंगत आहे का?
- आपला देश विशाल आहे. येथे सर्वत्र सारखी स्थिती असू शकत नाही. यामुळे ‘पीक’ कुठे आधी येईल, तर कुठे नंतर. सध्या जेथे रुग्ण कमी आहेत, तेथे आगामी काळात ते वाढतील. मग ते बिहार असाे की यूपी.
आमची लस ९५%पर्यंत प्रभावी असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. तथापि, एकाही कंपनीने लस किती काळ इम्युनिटी देईल, हे सांगितलेले नाही. असे का?
- लस किती काळ सुरक्षा देईल, हे आधीच सांगणे कठीण आहे. कारण की, हा आजार १० महिनेच जुना आहे. लसीचा प्रभाव समजण्यासाठी २-३ वर्षांचा काळ जावा लागतो. यामुळे लस किती काळ प्रभावी असेल, याचा दावा कोणतीही कंपनी करत नाही.
कोरोनाचा मृत्युदर आधीच्या तुलनेत घटला आहे, यामागील कारण काय असावे?
- सुरुवातीस आजार व त्यावरील उपचारांची स्पष्टता नव्हती. पीपीई किट्स नव्हते, ना पुरेशा संख्येने एन-९५ मास्क. काय ट्रीटमेंट करायची, हेही माहीत नव्हते. रुग्ण भरती होताच थेट व्हेंटिलेटर लावले जायचे. हेही मृत्यूमागील एक कारण होते. अनुभवातून उमगले की ऑक्सिजन सपोर्ट आणि रुग्णाला पोटावर झोपवल्यानेच चांगल्या पद्धतीने उपचार करता येतात.
जगभरात आजवर जेवढे आजार आलेत, त्यापैकी कोरोनालाच सर्वात कमी वेळेत समजून घेता आले आहे. कारण, अवघ्या जगभरातील वैज्ञानिक फक्त याच एका कामात झटत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.