आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अ‍ॅपलला मागे टाकत अरामको जगातील सर्वात मूल्यवान कंपनी, मूल्य 2.42 लाख कोटी डॉलर

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामको जगातील सर्वात मूल्यवान कंपनी झाली आहे. आयफोन निर्माती अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपल इंकला तिने मागे टाकले आहे. तेलाच्या किमती उसळल्यानंतर सौदी अरामकोला हा फायदा मिळाला आहे.

टेक कंपन्यांच्या शेअर्सच्या मागणीत अलीकडच्या दिवसांत घसरण आली आहे. बुधवारच्या बंद भावानुसार, सौदी अरामकोचे बाजार भांडवल २.४२ लाख कोटी डॉलर होते. अ‍ॅपलचे मूल्य २.३७ लाख कोटी डॉलर राहिले. सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी आहे. या वर्षाच्या सुरुवातीस अ‍ॅपलचे बाजार भांडवल ३ लाख कोटी डॉलरवर पोहोचले होते आणि तेव्हा अरामको तिच्या १ लाख कोटी डॉलरने मागे होती. मात्र, त्यानंतर अॅपलच्या शेअर्समध्ये सुमारे २०% घसरण झाली तर अरामकोचे शेअर २८% वधारले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षी १२४% वाढला आहे. २०२० मध्ये हा ४९ अब्ज डॉलर होता, २०२१ मध्ये हा ११० अब्ज डॉलर राहिला.

अ‍ॅपलसारख्या कंपनीने आजवर आपल्या उत्पादनांचा दर्जा टिकवून नवनवीन प्रयोग करीत जगभरातील आयफोन चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. शिवाय, या क्षेत्रात कंपनीने आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यातही यश मिळवले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत इंधन तेलाचा विचार करता जागतिक बदलत्या परिस्थितीत सर्वच देशांत इंधन तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत. शिवाय रशिया-युक्रेन युद्धाचाही इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अरामकोचे महत्त्व एकदम वाढले.

पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने परिणाम
अमेरिकतील कंपन्यांचा विचार करता अ‍ॅपल ही कंपनीही आजही जगात अव्वल कंपनी ठरते. परंतु, कोरोनाकाळात चीनसारख्या मोठ्या देशामध्ये अनेक शहरांत लॉकडाऊन लागले आणि बाजारपेठा बंद राहिल्या. यामुळे अॅपलसारख्या सर्वाधिक खप असलेल्या कंपनीची पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्याचा परिणाम कंपनीच्या उलाढालीवर झाला.

बातम्या आणखी आहेत...