आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

एलएसीवर तणाव वाढला:लष्करप्रमुख लेहमध्ये; चीनकडून पूर्व लडाखमध्ये जवानांची 5 पथके तैनात, चौथ्या दिवशी दिल्लीपासून लडाखपर्यंत घडामोडी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनविरुद्ध भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपानची वज्रमूठ

पूर्व लडाखमध्ये तणाव वाढला आहे. यामुळे दिल्लीपासून वास्तविक नियंत्रण रेषेपर्यंत (एलएसी) सलग चौथ्या दिवशी वेगवान घडामोडी घडल्या. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे गुरुवारी लेहमध्ये दाखल झाले. सूत्रांनुसार, पँगाँग सरोवराच्या द. किनाऱ्याजवळ सध्याच्या स्थितीत बदलासाठी चीनकडून झालेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर स्थितीचा व्यापक आढावा घेण्याच्या उद्देशाने लष्करप्रमुखांचा हा दौरा होत आहे.

दुसरीकडे, वायुदलप्रमुख आर. के. एस. भदौरियांनी पूर्व भागाचा दौरा करून सज्जतेचा आढावा घेतला आणि जवानांची हिंमत वाढवली. दरम्यान, दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ४ महिन्यांपासून चीन या भागातील स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न करत आहे. आम्ही चर्चेतून वाद सोडवण्याच्या प्रयत्नात आहोत. दुसरीकडे, चीनने पूर्व लडाखमध्ये ५ मिलिशिया पथके तैनात केली आहेत. मिलिशिया चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे राखीव दल आहे. हे दल युद्धाच्या वेळी लष्करी मोहिमांमध्ये मदत करते.

चीनविरुद्ध भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपानची वज्रमूठ
चीनला घेरण्याच्या रणनीतीअंतर्गत अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत चतुष्कोणीय बैठक आयोजित करण्याची भारताची योजना आहे. अमेरिकेशी राजनैतिक स्तरावर २+२ चर्चा करण्याच्या दिशेनेही काम सुरू आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आठवड्याच्या ब्रीफिंगदरम्यान ही माहिती दिली.

हाँगकाँगमध्ये चीन करत असलेले मानवाधिकारांचे उल्लंघन, विविध देशांत इंटरनेट गोपनीयतेचे कथित उल्लंघन व सर्व द्विपक्षीय करारांचे उल्लंघन करून भारतासोबतच्या सीमेवर एकतर्फी बदल करण्याचा चीनचा प्रयत्न या पृष्ठभूमीवर २+२ चर्चा व बैठक आयोजित करण्याची तयारी भारताने केली आहे.

चीनचा तिळपापड : पब्जीसह ११८ चिनी अॅप्सवर बंदी घालण्यावर घेतला आक्षेप
बीजिंग | भारताने ११८ अॅप्सवर बंदी घातल्याने चीन संतापला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने या निर्णयावर आक्षेप घेत म्हटले की, भारताने अॅपवर बंदी घालणे चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवणाऱ्यांच्या कायदेशीर हितांचे उल्लंघन आहे. भारताने बुधवारी पब्जीसह चीनशी संबंधित आणखी ११८ अॅप्सवर बंदी घातली होती.

सीडीएस रावत यांचा इशारा
पाकिस्तानने आगळीक केल्यास सडेताेड उत्तर

- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत यांनी गुरुवारी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे.
- रावत म्हणाले, उत्तर सीमेवर धोका निर्माण झाला आणि पाकिस्तानने काही आगळीक केली तर त्याला नुकसान सोसावे लागेल. आम्ही त्याची तयारी करून ठेवली आहे.
- आपल्याला या स्थितीचा सामना व आगामी आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज राहावे लागेल.
- विविध आघाड्यांवरील तिन्ही दलांतील कोणताही जवान कोरोनाने प्रभावित नाही.
- चीनसोबतचा वाद चर्चेने न मिटल्यास लष्करी पर्याय खुला असल्याचे वक्तव्य त्यांनी मागील आठवड्यात केले हाेते.