आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Asam Flood Ground Report | Heavy Floods, Landslides In 26 Districts Of Asam, 105 Deaths So Far, Risk Of Infection In Relief Camps

आसाम ग्राउंड रिपोर्ट:आसामच्या 26 जिल्ह्यांत भीषण पूर-भूस्खलन, 105 जणांचा मृत्यू; 27.64 लाख लोकांना फटका, छावण्यांत 18 हजार लोकांचा मुक्काम

दिलीपकुमार शर्मा । गुवाहाटी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील खोलाबाइया गावचे आहे.
  • निर्वासितांच्या छावण्यांत संसर्गाचा धोका असल्याने पीडित परतू लागले घरी, उदरनिर्वाहाचेही संकट!

आसामच्या ३३ पैकी २६ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, भीषण पूर व भूस्खलनाचा फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील १०५ लोकांचा मृत्यू झाला. सुमारे २७.६४ लाख लोकांना नैसर्गिक संकटाचा तडाखा बसला आहे. १८ हजार लाेकांवर छावण्यांत राहण्याची वेळ आली आहे. दिब्रूगड जिल्ह्याच्या रोंगमोला गावातील शामल दास (३९) दोन दिवसांपूर्वी निर्वासितांच्या छावण्यांतून घरी परतले आहेत. पुरामुळे बांबू, पत्र्यापासून तयार त्यांच्या घराची मोठी हानी झाली. पत्नी व दोन मुलांसह शामल घरी परतले आहेत. परंतु, आता रोजगाराची चिंता वाढू लागली आहे. शामल म्हणाले, लॉकडाऊन पासूनच हाती काम राहिले नव्हते. आता पुराने जीवन बरबाद करून टाकले. छोटे किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो. आता सगळे मार्गच बंद झाले आहेत. शेतजमिनीचे पुराने नुकसान झाले. सहा दिवसांपासून सुहागी देवी शाळेत तयार केलेल्या छावणीत राहू लागलो आहोत. परंतु, संसर्गाच्या भीतीने घरातील पाणी कमी होताच परततो. छावण्यांत कोरोनाचा संसर्ग होऊ नये, अशी भीती वाटत असे. काही पीडित लोक उंच जागेवर प्लास्टिकचे तंबू लावून राहत होते. त्यातून ते फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत होते. १९९८ पासून दरवर्षी लोक छावण्यांत आश्रय घेत आले आहेत. परंतु, एवढी भीती कधी वाटली नव्हती. शामल यांच्या गावापासून दोन किमी अंतरावर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे मूळ गाव मुलुक आहे. येथेही पुराने थैमान घातले आहे. येथे १०० पूरग्रस्त कुटुंबांनी स्थानिक विणू राभा सभागृहात आश्रय घेतला आहे. डेब्रीडुवा गावातील अदालत खान म्हणाले, गेल्या महिन्यापासून मुलांसह छावणीत राहतो. शेत व घर बुडाले आहे. कोरोनामुळे कोठेही मजुरी करण्यासाठी जाता आले नाही. या संकटाच्या काळात सरकारने मदत केली नाहीतर आमची उपासमार होईल. परंतु, येथील आमदारांनी त्याची दखल घेतली नाही. निवडणुकीत सगळे मत मागण्यास येतात. डेब्रीडुवामध्ये ८ हजार मते आहेत. बरपेटा जिल्ह्यातील सिधोनी गावातील मोहंमद नयन अली (४७) म्हणाले, प्रशासनाने पंधरा दिवसांत केवळ एकदा प्रति व्यक्ती एक किलो तांदूळ व २०० ग्रॅम डाळीचे वाटप केले. त्यानंतर आमची विचारपूस करण्यासाठी कोणीही आले नाही. बरपेटा जिल्ह्यात एका जलविद्युत प्रकल्पातून विसर्ग झालेल्या पाण्याने पुराहून जास्त नुकसान केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. भूतानचा कुरिचू हायड्रोपॉवर प्रकल्प त्यास कारणीभूत मानला जातो. बरपेटा जिल्ह्याचे उपायुक्त मुनींद्र शर्मा यांनी त्यास दुजोरा दिला. ते म्हणाले, आमच्या जिल्ह्यात ७३९ गावांना पुराने वेढले आहे. सुमारे १२ लाख लोकांना त्याचा फटका बसला, तर १५ लोकांचे प्राण गेले. भुतान सलग १० दिवसांपासून पाण्याचा विसर्ग करत आहे. दररोज १ हजार ते १५०० क्युसेक पाणी साेडल्यास परिस्थिती वाईट होणारच. दुसरीकडे पुरामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ९६ जनावरांचा मृत्यू झाला. उद्यानात २२३ छावण्यांपैकी ९९ छावण्या पाण्यात बुडाल्या. आसामचे मुख्य सचिव कुमार संजय कृष्णा म्हणाले, बचाव कार्यात छावण्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. क्वाॅरंटाइन सेंटर तयार करतील, अशाच ठिकाणांची निर्वासित छावण्या उभारण्यासाठी निवड करण्यात आली. पूर्वीच्या तुलनेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुराचे आव्हान जास्त आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुराचा तडाखा बसला आहे. त्यांना कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरक्षित ठेवणे सोपे काम नाही. असे असूनही खबरदारी घेतली जात आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनचे प्रकल्प सहसमन्वयक पंकज चक्रवर्ती म्हणाले, अनेक भागांत पाणीच पाणी झाले आहे. ग्वालपाडा जिल्ह्याचे उपायुक्त वर्नाली डेका म्हणाल्या, छावण्यांच्या प्रभारींवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

आसामच्या ४० टक्के भागाला फटका, दरवर्षी ५०-६० लाख लोकांवर परिणाम

> राष्ट्रीय पूरसंबंधी आयोगानुसार आसामच्या ३१ हजार ५०० चौरस किमी भागात पुरामुळे नुकसान झाले. म्हणजेच ४० टक्के भागाची हानी झाली. आसाम पूर्णपणे नदीच्या खोऱ्यात वसलेले अाहे. हेच त्यामागील कारण आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ७८ हजार ४३८ चौरस किमी आहे. त्यापैकी ५६ हजार १९४ चौरस किमी ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र आहे. उर्वरित बराक नदीच्या खोऱ्यात २२ हजार २४४ चौरस किमीचा भाग येतो.

> दरवर्षी पुरामुळे आसामचे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान होते. १९९८ च्या पुरात ५०० कोटी, २००४ मध्ये ७७१ कोटींचे नुकसान झाले होेते. आसाम सरकारच्या म्हणण्यानुसार राज्याने १९५४, १९६२, १९७२, १९८४, १९८८, २००२ व २००४ मध्ये भयंकर पुराचा फटका सोसला.दरवर्षी तीन-चार वेळा पुरासारखी स्थिती असते.

> साडेतीन कोटी लोकसंख्येच्या राज्यात दरवर्षी ५०-६० लाख लोकांना फटका बसला. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार २२ मेपासून १५ जुलै दरम्यान राज्याच्या ४ हजार ७६६ गावांना पुराने वेढले आहे.