आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलट गद्दार, CM कसा होऊ शकतो?:गेहलोतांचा थेट हल्ला; म्हणाले- 10 आमदार नसलेला व्यक्ती कोणीही स्वीकारणार नाही

जयपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत असताना काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट याच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला आहे.

ते म्हणाले - 'सचिन पायलट यांना कसे मुख्यमंत्री करता येईल. ज्या व्यक्तीला 10 आमदारांचा पाठिंबा नाही. ज्या व्यक्तीने बंडखोरी केली, ज्याला गद्दार म्हटले जाते, त्याचा जनता कसा स्वीकार करेल. जेव्हा आम्ही 34 दिवस हॉटेलमध्ये बसलो होतो, तेव्हा हे सरकार पाडण्याचे कट रचत होते. यात अमित शहांचाही समावेश होता. धर्मेंद्र प्रधानही होते.'

गेहलोत यांनी एनडीटीव्हीला बोलताना ही टीका केली. ज्या व्यक्तीने गद्दारी केली आहे. ज्याला मी स्वतः व आमच्या आमदारांनी सहन केले. 34 दिवस हॉटेलांत थांबलो व त्यांना ते कसे स्वीकारतील?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

'माझ्याकडे पुरावे, ते फेटाळू शकत नाहीत'

पायलट यांनी भाजपसोबतचे आपले संबंध फेटाळल्याच्या प्रश्नावर गेहलोत म्हणाले - तो फेटाळू शकत नाहीत. संपूर्ण खेळ त्यांनी रचला होता. प्रत्येकी 10 कोटी वाटण्यात आले. माझ्याकडे पुरावे आहेत.

हायकमांडकडून कोणतेही संकेत नाहीत

मुख्यमंत्रीपदी राहण्याच्या प्रश्नावर गेहलोत म्हणाले - आज तर मी येथेच आहे. पक्षश्रेष्ठींकडून मला इशारा सोडा साधा संकेतही नाही. मी पक्षश्रेष्ठींसोबत आहे. पायलट यांचा कुणीही स्वीकार करणार नाही. हायकमांड राजस्थानसोबत न्याय करेल

'अमरिंदर सिंगांसारखी बंडखोरी करणार नाही'

हायकमांड राजस्थानसोबत न्याय करेल. सप्टेबरची गोष्ट आहे. मी अजय माकन व हायकमांडपर्यंत माझ्या भावना पोहोचवल्या आहेत. राजस्थानमध्ये सत्ता अबाधित राखणे महत्त्वाचे आहे. मी 3 वेळा मुख्यमंत्री राहिलो. माझ्यासाठी मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही. तुम्ही सर्व्हे करा. मी मुख्यमंत्री राहिल्याने सत्ता अबाधित राहत असेल तर माझ्याकडे नेतृत्व कायम ठेवा. दुसऱ्या चेहऱ्याने सरकार येत असेल तर त्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करा. मी अमरिंदर सिंग यांच्यासारखी बंडखोरी करणार नाही. मी सरार आणण्यासाठी प्राण पणास लावेल, असेही गेहलोत यावेळी म्हणाले.

'मंत्री बनण्यासाठी पायलटांनी फोन केला'

सचिन पायलट यांच्यासोबतच्या वादावर गेहलोत म्हणाले - 2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राजस्थानात 20 खासदार निवडून आल्यानंतर मला दिल्लीला बोलावण्यात आले. कार्यकारी समितीची बैठक झाल्यानंतर राजस्थानातून मंत्री करण्याविषयी मला विचारण्यात आले. सचिन पायलट यांनाही याची माहिती आहे. मी पायलट यांना केंद्रात मंत्री करण्याची शिफारस केली. त्यावेळी वसुंधरा राजेंच्या राजवटीत 70 गुर्जर मारले गेले होते. येथे गुर्जर-मीणांमध्ये वाद होता.

गेहलोत म्हणाले - त्यानंतर मला सचिन पायलट यांनी आपली शिफारस करण्यासंबंधी फोन केला. पण मी त्यांची अगोदरच शिफारस केली होती. व्यक्तीच्या मनात प्रेम असेल, तरच तो एखाद्या तरुणाची शिफारस करेल. हीच वस्तुस्थिती आहे.

25 सप्टेंबर रोजी पायलटमुळे वातावरण बिघडले

पक्षाच्या स्थितीवर गेहलोत म्हणाले - मला काहीच टेन्शन नाही. थोडेफार मतभेद सगळीकडेच असता. 25 सप्टेंबर रोजी बंडखोरी झाली नव्हती. 2019 मध्ये बंडखोरी झाली होती. 34 दिवस हॉटेलमध्ये राहिलो. 25 सप्टेंबर रोजी सरकार वाचवण्यासाठी 90 जण एकत्र झाले होते. अन्यथा सरकार हातातून गेले असते. हायकमांडशिवाय कोणताही मुख्यमंत्री सरकार चालवू शकत नाही.

गेहलोत म्हणाले की, काँग्रेसमध्ये हायकमांडच्या मर्जीशिवाय आमदारांचा पाठिंबा असणारा एकही मुख्यमंत्री नाही. ज्याने पक्षाशी गद्दारी केली, त्याचा स्वीकार आमचे आमदार कसे करतील.

2 महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये झाली बंडाची सुरुवात

'पायलट यांचा व्यवहार चुकीचा'

गेहलोत म्हणाले - 'सचिन पायलट मुख्यमंत्री होणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. पायलट यांनीही आपण मुख्यमंत्री होणार असल्याचा व्यवहार केला. त्यांना अनेक आमदारांना फोन करून पर्यवेक्षक येत आहेत, त्यांना हेच सांगायचे आहे असे सांगितले.'

गेहलोत म्हणाले -'या स्थितीमुळे विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी पायलट शपथ घेणार असा आमदाराचा समज झाला. त्यामुळे 90 आमदार एकत्र झाले. ते सर्व निष्ठावान व हायकमांडसोबत आहेत. ज्यांच्यामुळे आम्ही 34 दिवस हॉटेलमध्ये राहिलो. ज्यांनी सरकार पाडण्याचा कट रचला, त्यांचा आमदार कसा स्वीकार करतील.'

'पक्षाच्या अध्यक्षानेच सरकार पाडण्याचा कट रचला'

गेहलोत म्हणाले की, 'मानेसरमध्ये पायलट यांच्यासोबत बंडखोरी करणारे आमदार गेले होते. ज्या रिसॉर्टमध्ये मध्य प्रदेशाचे आमदार थांबले होते, त्याच ठिकाणी पायलट यांचे समर्थक आमदार थांबले होते. पक्षाचा अध्यक्ष आपल्याच पक्षाचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी करेल याचा कुणी विचारही करू शकत नाही. इतिहासात असे केव्हाच घडले नाही. यामुळेच आमदार पायलट यांचे नाव ऐकताच नाराज झाले होते.'

पायलट यांच्या विरोधात 92 आमदारांचे राजीनामे

2 महिन्यांपूर्वी 25 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या राजकारणात वादळ आले. राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्याचा एका ओळीचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवता आला नाही.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. त्यांच्या जागी सचिन पायलट यांची नियुक्ती होणे जवळपास निश्चित झाले होते. पण गेहलोत गट नाराज झाला. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी गेहलोत गटाच्या जवळपास 92 आमदारांनी शांती धारीवाल यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली. त्यानंतर त्या सर्वांनी विधानसभेचे सभापती सीपी जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन आपापला राजीनामा दिला.

गेहलोत यांनी सोनियांकडे मागितली माफी

28 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांच्याशी जवळपास दीड तास चर्चा केली. बंडखोरीविषयी त्यांनी त्यांच्याकडे माफी मागून अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला.

सोनियांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले होते - 'मी नेहमीच प्रामाणिक सैनिक म्हणून काम केले. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीच्या दिवशी घडलेल्या घटनेने सर्वांना धक्का बसला. या प्रकरणी मी सोनियांची माफी मागितली आहे.'

बातम्या आणखी आहेत...