आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसामच्या बालवधूंचे दुःख:निमीचा आक्रोश - नवऱ्याला मध्यरात्री उचलून नेले; रेजिना म्हणाली - आधारमध्ये चूक, मुलाचा काय दोष

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाममध्ये बालविवाहाप्रकरणी गत 3 दिवसांत 2,258 जणांना अटक करण्यात आली आहे. यात लग्न लावणाऱ्या हिंदू पुजारी व मुस्लिम काझींचाही समावेश आहे. पोलिसांच्या मते, त्यांच्याकडे एकूण 8 हजार आरोपींची यादी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरुषांना अटक केल्यानंतर त्याच्या मागे राहिलेल्या महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निमीच्या डोळ्यांत आई बनण्याचा आनंद नाही. भीती व असुरक्षेचे सावट आहे. रेजिनाच्या डोळ्यातही एक भयाण शांतता आहे. आपले हसते-खेळते आयुष्य एका झटक्यात कसे बदलले, हे समजून घेण्याचा ती प्रयत्न करत आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात राहणआऱ्या बहुतांश महिलांची स्थिती हीच आहे. वाचा दोन कहाण्या...

पहिली कथा निमीची : मध्यरात्री 2 वा. पोलिसांनी नवऱ्याला उचलून नेले, दीड महिन्याचे बाळ घेऊन कुठे जावू...

बालविवाहाविरुद्ध राज्यव्यापी मोहिमेचा भाग म्हणून आसाम पोलिसांनी गत 2 दिवसांत ज्यांच्या पतींना अटक केली, त्या हजारो बालवधूंपैकी निमी एक आहे. निमी म्हणाली- गुरुवारी मध्यरात्री 2च्या सुमारास दारावर टकटक झाली. दरवाजा उघडला तेव्हा बाहेर पोलिस उभे होते. ते आत आले व पतीला घेऊन गेले.

ती म्हणाली- आमचा दीड महिन्याचा मुलगा रडत राहिला. पण ते थांबले नाही. आता मी त्याला घेऊन मी कुठे जावू. 17 वर्षीय निमीने घरातून पळून जाऊन 20 वर्षीय गोपाळ बिस्वासशी लग्न केले होते. ती पतीसोबत गावातील चौकात पकोडे विकून उदरनिर्वाह करत होती.

सरकारने पूर्वइशारा का दिला नाही

गोपाळचा मोठा भाऊ युधिष्ठिर त्याच्या आई-वडिलांसोबत जवळच राहतो. तो म्हणाला- माझ्या कुटुंबाची काळजी घेण्याइतपत माझे उत्पन्न नाही. निमी व तिच्या मुलाची काळजी कोण घेणार? पतीच्या अटकेपासून ती उपाशी आहे. मूलही आता आजारी पडले आहे. युधिष्ठिर म्हणाला- सरकारने आम्हाला यासंबंधी अगोदरच सावध करायला हवे होते.

पोलिसांनी शनिवारपर्यंत 2,258 जणांना अटक केली.
पोलिसांनी शनिवारपर्यंत 2,258 जणांना अटक केली.

दुसरी कहाणी रेजिनाची : आधारवर सूनेचे वय कमी, त्यात मुलाचा काय दोष

राजीबुल हुसेन यांना गुरुवारी सायंकाळी 6च्या सुमारास घरातून उचलण्यात आले. काही मिनिटांपूर्वीच तो आपल्या वडिलांसोबत केरळहून घरी परतला होता. त्याची आई रेजिना सांगते - मुलाने प्रेमविवाह केला होता. माझी सून लहान नाही. पण तिच्या आधार कार्डमध्ये गफलत झाली होती. त्यामुळे आज माझा मुलगा तुरुंगात आहे. आता सून जन्माची नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी गावी फेऱ्या मारत आहे.

अनेकांच्या आधार कार्डांत चुका

रेजिनाच्या शेजाऱ्यांनी दावा केला की, राजीबुलच्या पत्नीसारखे अनेक जण लग्नावेळी अल्पवयीन नव्हते. परंतु आधार कार्डसाठी नावनोंदणी करताना त्यांची जन्मतारीख चुकीची नोंदवली गेली. पोलिसांनी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घेतलेला डेटा चुकीचा आहे. आता आम्ही या महिलांना त्यांच्या जन्माच्या मूळ नोंदी मिळवून देण्यासाठी मदत करत आहोत. यामुळे त्यांच्या पतींना जामीन मिळेल.

अनेक मुलींचा शेल्टर होम निवारा

या प्रकरणी काही पीडितांना त्यांच्या कुटुंबीयांकडून मदत मिळत आहे. पण रिया देवीसारख्या अनेक जणी त्यांच्या पतींच्या अटकेनंतर अधिकाऱ्यांच्या दयेवर अवलंबून आहेत. सरकारी निवारागृहात राहणारी 16 वर्षांची रिया म्हणाली – पती हेच माझे सर्वस्व आहे. कारण, आम्ही पळून जाऊन लग्न केले होते. आता मी माझ्या वर्षभराच्या मुलीला घेऊन कुठे जाऊ?

शेल्टर होममध्ये राहणारी 9 महिन्यांची गरोदर रूपा (16) म्हणाली - माझ्या नवऱ्याला सोडा. आम्ही सहमतीने लग्न केले होते. आता मी त्यांच्याशिवाय कशी जगू.

2026 पर्यंत सुरू राहणार मोहीम

राज्य मत्रिमंडळाने 23 जानेवारी या प्रकरणी अटकसत्र राबवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 15 दिवसांच्या आत पोलिसांनी बालविवाहाचे 4004 गुन्हे दाखल केले. याशिवाय बालविवाहाप्रकरणी जनजागृती अभियानही राबवले. दुसरीकडे, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी बालविवाहविरोधी ही मोहीम 2026च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत चालणार असल्याचे म्हटले आहे.

सरकारने का घेतला निर्णय

बाल विवाहाप्रकरणी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेचा एक रिपोर्ट जारी झाला आहे. त्यात आसाममध्ये माता बालमृत्यूदर सर्वाधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाल विवाहामुळे असे होत असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. या अहवालानुसार, बालविवाहाचे सर्वाधिक 370 प्रकरणे आसामच्या धुबरी जिल्ह्यात नोंदवण्यात आले.

त्यानंतर होजईत 255, उदलगुरीत 235, मोरीगावमध्ये 224 व कोकराझारमध्ये 204 प्रकरणे नोंदवण्यात आली. याशिवाय, दीमा हसाओत 24, कछारमध्ये 35 व हैलाकांडी जिल्ह्यात बालविवाहाचे अवघे एक प्रकरण नोंदवण्यात आले आहे. हा रिपोर्ट उजेडात आल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता.

या प्रकरणाशी संबंधित आणखी एक बातमी वाचा

वडिलांची अटक टाळण्यासाठी मुलीची आत्महत्या:वडिलांनी लावून दिला होता बालविवाह, आसाममध्ये आतापर्यंत 2170 जणांना बेड्या

वडिलांची अटक टाळण्यासाठी एका अल्पवयीन तरुणीने आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना आसाममध्ये घडली आहे. विशेष म्हणजे या तरुणीचे वडील तिचा बालविवाह लावून देत होते. यामुळे पोलिस तिच्या वडिलांना अटक करण्याच्या प्रयत्नांत होते.

आसाम सरकारने बालविवाहाविरोधात धडक मोहीम राबवली आहे. राज्यात आतापर्यंत या प्रकरणी 2170 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात आता एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सीमा खातून उर्फ खुशबू नामक ही तरुणी अल्पवयीन होती. तिचे लग्न लावून देण्यात येत होते. बालविवाह करण्याप्रकरणी वडिलांना अटक होऊ नये, यासाठी शुक्रवारी रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. येथे वाचा संपूर्ण बातमी..,

बातम्या आणखी आहेत...