आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतसिंह प्रकरण:रियाला 44 फोन करणारे AU म्हणजे आदित्य ठाकरे : खा. शेवाळेंचा आरोप

नवी दिल्ली/ मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भूखंडप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या आदित्य ठाकरे यांनाच घेरण्याचा शिंदेसेनेकडून प्रयत्न

नागपुरातील कथित भूखंड घोटाळाप्रकरणी उद्धवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली असताना शिंदेसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची थेट लोकसभेत मागणी करून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती त्याला ड्रग्ज देत असल्याचा आरोप आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला ‘एयू’ या नावाने ४४ फोन आले होते. हे ‘एयू’ म्हणजे ‘आदित्य उद्धव ठाकरे’ असा उल्लेख बिहार पोलिसांनी केल्याचा दावा करत शेवाळेनी चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत व आमदार मनीषा कायंदे यांनी शेवाळेंच्या आरोपांचे खंडन करताना त्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का, असा प्रश्न केला. तर रियाच्या वकिलांनी यापूर्वीच कोर्टात सुनावणीच्या वेळी रिया व आदित्य ठाकरे हे एकमेकांना ओळख नसल्याचे सांगितले होते.

शेवाळेंचं लग्नच आम्ही वाचवलंय : आदित्य आरोपांना उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ज्यांनी गद्दारी केली त्यांच्याकडून चांगले काही अपेक्षितच नाही. राहुल शेवाळेला मी काडीमात्र किंमत देत नाही. त्यांचं लग्नच ठाकरे घराण्याने वाचवलेलं आहे. पण मला यात जायचं नाही. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात मला हस्तक्षेप करायचा नाही. आम्ही भूखंड घोटाळा उचलून धरल्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. त्यांना व राज्यपालांना वाचवण्यासाठी हे प्रकार केले जात आहेत.’

सत्य समोर यावे म्हणून मी मुद्दा लोकसभेत मांडला : खा. शेवाळे पत्रकारांशी बोलताना शेवाळे म्हणाले, ‘लोकसभेत ड्रग्जप्रकरणी चर्चा सुरू होती. माझ्याआधी ४ ते ५ खासदारांनी सुशांतच्या प्रकरणाचा उल्लेख केला होता. मी म्हणालो, सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआय, बिहार आणि मुंबई पोलिसांनी तपास केला. यात ड्रग्जसंबंधात चौकशी करताना रियाला ‘एयू’ नावाने ४४ कॉल आल्याचे सीबीआयने म्हटले होते. एयू म्हणजे आदित्य ठाकरे असे बिहार पोलिसांचा निष्कर्ष होता. मुंबई पोलिसांनी मात्र एयू म्हणजे रियाची मैत्रीण अनन्या उधास म्हटले होते. सीबीआयने खुलासा केलेला नाही. सत्य जनतेसमोर यावे या उद्देशाने आपण लोकसभेत मुद्दा मांडला.

राणेंवर बदनामीचा आरोप करत केसरकरांकडून मात्र क्लीन चिट केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे दोन्ही पुत्र नीलेश व नितेश यांनी सुशांतसिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचे आरोप केले. मुंबई पोलिस दबावामुळे हे प्रकरण दडपत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र तपासात हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. शिंदे सेनेचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी ऑगस्ट महिन्यात ‘राणेंकडून आदित्य यांची बदनामी केली जात आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचाही या बदनामीला विरोध आहे, ते राणेंच्या आरोपाबाबत असहमत आहेत,’ असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता त्यांच्याच पक्षाकडून आदित्य यांना टार्गेट केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...