आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 वर्षांनंतर कांगारुंचा पाकमध्ये विजय:तिसऱ्या कसोटीत पाकला तब्बल 115 धावांनी लोळवले, मालिका जिंकली, बाबर व इमामची तुफानी फलंदाजीही पाकच्या आली नाही कामी

लाहोर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला तब्बल 24 वर्षांनंतर पाकला त्याच्याच देशात लोळवण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलियाने येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत पाकचा तब्बल 115 धावांनी पराभव करुन 3 सामन्यांची कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. कांगारुंनी पाकपुढे 351 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल पाकचा संपूर्ण संघ अवघ्या 235 धावांतच गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ऑफ स्पिनर नेथन लायनने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर कर्णधार पॅट कमिंस याने 3 बळी टिपले. कॅमरन ग्रीन व मिचेल स्टार्कला प्रत्येकी 1 बळी मिळाला.

पाकचा सलामीवर इमाम उल हक (70) याने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. कर्णधार बाबर आझमनेही 55 धावा काढत त्याला चांगली साथ दिली. हे दोघे वगळता पाकचा एकही फलंदाज कांगारुंच्या प्रभावी गोलंदाजीपुढे टिकला नाही. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाचा अवघ्या 3 विकेट्सने विजय हुकला होता. पण, लाहोर कसोटीत त्यांनी विजयश्री खेचून आणण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. या विजयामुळे कांगारुंनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या क्रमाकावर झेप घेतली आहे. टीम इंडिया आता तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे.

ख्वाजाची शानदार फलंदाजी

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने संपूर्ण मालिकेत शानदार फलंदाजी केली. त्याने 3 सामन्यांत 496 धावा केल्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात खेळताना त्याने 91 व दुसऱ्या डावात 104 धावा ठोकल्या. त्याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर कांगारुंनी पहिल्या डावात 391 व दुसऱ्या डावात 3 बळी मोजून 227 चा स्कोअर उभा केला. त्यानंतर पाकचा पहिला डाव 268 धावांतच गडगडला. यामुळे ऑस्ट्रेलियाला 123 धावांची आघाडी मिळाली होती.

पाकविरोधातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात बळी घेतल्यानंतर आनंद साजरा करणारे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू
पाकविरोधातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात बळी घेतल्यानंतर आनंद साजरा करणारे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू

पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाकच्या एकाही फलंदाजाला धावपट्टीवर स्थिर होऊ दिले नाही. सामन्यात 8 बळी घेणाऱ्या कर्णधार पॅट कमिंस याला सामनावीर घोषित करण्यात आले. यापूर्वी 24 वर्षांपूर्वी म्हणजे 1998-99 मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकमध्ये शेवटी कसोटी मालिकाही 1-0 ने जिंकली होती.

बातम्या आणखी आहेत...