आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Awards Return Today, India Closed Tomorrow; 20 party Support Farmers Agitation In New Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचे 11 दिवस:आज अवॉर्ड वापसी, उद्या भारत बंद; 20 पक्षांचा पाठिंबा, बंददरम्यान अॅम्ब्युलन्स, विवाहाच्या वाहनांना मात्र वाहतुकीची असेल मुभा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्री राष्ट्रीय महामार्गावर पारा 13 अंशांपर्यंत उतरतो, तरीही जागाेजागी सुरू असलेले लंगर थांबत नाहीत

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात ८ डिसेंबरला ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीने बंदचे आवाहन केले आहे. बंदला काँग्रेससह २० पक्ष व १० कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी नेते बलदेवसिंग निहालगड यांनी सांगितले, सायंकाळपर्यंत बंद असेल. दुपारी ३ पर्यंत चक्काजाम राहील. अॅम्ब्युलन्स व विवाहाच्या गाड्यांना मुभा असेल. पंजाबचे खेळाडू, कलाकारांनी सोमवारी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.

गुजरात, तामिळनाडूसह कर्नाटकातूनही येताहेत शेतकरी, ३०० रेल्वे तिकिटे केली रद्द
मनीषा भल्ला | सिंघु बॉर्डरहून

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी येथे सुरू केलेल्या आंदोलनाला ११ दिवस झाले. सीमेवर सुमारे १ लाख निदर्शकांसाठी दिवस-रात्र लंगर सुरू आहे. यात ज्यूस, पिझ्झा, देशी तुपातील लाडू, जिलेबी, पाणीपुरी, बदाम-अक्रोड वाटले जात आहेत. राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या कित्येक मैल रांगा आहेत. काही शेतकरी तर परदेशातून आले आहेत. दर दहा पावलांवर एक लंगर आहे. यात भाज्यांमध्ये मटार-पनीर, आलू-गोबी, छोले-पुरी, पराठेही दिले जात आहेत. पंजाबमधील एका गावातून १५ टन देशी तूप आले आहे. मलेरकोटलाच्या मुस्लिम समाजाने व्हेज पुलावचा लंगर लावला आहे. रात्री थंडी वाजू नये म्हणून चादरी-ब्लँकेट, याशिवाय साबण, ब्रश, पेस्टही दिले जात आहे. गुरुदासपूरहून आलेले सविंदरपालसिंग यांनी सांगितले, ६५ दिवसांपासून आंदोलनाची तयारी सुरू होती. अनिवासी भारतीयांनीही प्रचंड मदत केली. आंदोलनस्थळी १५ वैद्यकीय शिबिरे आहेत. भूपिंदरपालसिंग ग्रीसहून आले आहेत. ते लंगरमध्ये रोटी लाटत आहेत. सहा महिन्यांचे रेशन त्यांनी आणले आहे. जगराओचे सज्जेवाल गावातून आलेले विक्रमसिंग म्हणाले, गुजरात-तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थानातूनही शेतकरी आले आहेत. येथे हजारो लिटर दूध वाटले जात आहे. हरियाणातील शेतकरी अन्नधान्य, पेट्रोल, डिझेल, सिलिंडर देत आहेत. ज्या दिवशी शेतकरी पंजाबहून हरियाणात आले तेव्हा जीटी रोड हायवेवरील ढाब्यांवर शेतकऱ्यांना मोफत जेवण दिले गेले. हरियाना डेअरी आणि पंजाब मिल्क असोसिएशनसह दूध विकणारे स्थानिक लोक हजारो लिटर दूध रोज देत आहेत.

हम मंच संचालनाच्या व्यवस्थापक अवतारसिंह कौरजीवाला यांनी सांगितले की, आम्ही कोणालाही काहीही मागत नाही, तरीही दररोज लाखो रुपयांचे योगदान येत आहे, हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य आहे. कालच गायक दलजित दोसांझने २० लाख रुपये दिले आहेत. मूलभूत सुविधांची संपूर्ण जबाबदारी आसपासची कार्यालये, कारखाने, शोरूम आणि पेट्रोल पंपचालकांनी सांभाळली आहे. नवांश शहर येथून जसविंदर सिंह हे ८ क्विंटल पीठ, अडीच क्विंटल मूग डाळ, २ क्विंटल शेंगदाणे, पाण्याचे जार, कोल्डड्रिंक्स, तीन पोती बटाटे, २ क्विंटल मटार घेऊन आले आहेत. तीन दिवसांनंतर आमच्या गावातून खाण्या-पिण्याचे साहित्य घेऊन आणखी एक ट्रॉली येणार आहे. हे सर्व साहित्य ग्रामस्थांनी स्वेच्छेने वर्गणी गोळा करून जमवले आहे. आंदोलनाला देशातील ५०० शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळालेला आहे. पंजाबचे खेळाडू, वाहतूक संघटना, पेट्रोल पंप संघटना यांनीही पाठिंबा दिला आहे. व्यासपीठावर पंजाबचे अनेक खेळाडू आहेत. हॉकी खेळाडू राजबीर कौर पुरस्कार परत करणार आहेत.

अॅपवर बैठक घेतात महिला शेतकरी
ननू जोगिंदर सिंह | टिकरी सीमेवरून
सकाळीच महिला शेतकरी जवळपास असलेली सर्व कार्यालये आणि बहादूरगड नगर परिषदेच्या तात्पुरत्या बाथरूममध्ये आंघोळी करून, सर्व आटोपून तयार आहेत. ८.३० वाजेपर्यंत रस्त्यांवर अनेक ट्रॉलीजच्या मध्ये बनवलेल्या चुलींवर पराठे तयार झाले आहेत. एका ट्रॉलीच्या मध्ये टोहाना आणि बठिंडाच्या एका गावातून आलेले शेतकरी जेवण तयार करत आहेत. हरियाणाच्या लोकांना रोट्या आणि पंजाबींना भाजी चांगली करता येते, त्यामुळे एकत्र जेवण तयार करत आहोत. ७० वर्षीय एक इसम सांगतात, ‘बेटा, आम्ही एकच होतो. पंजाब थोरला आणि हरियाणा धाकटा. दोघे आता सोबत आहोत तर धडा शिकवूच.’ एक महिला शेतकरी धरणे स्थळावरील व्यासपीठाची स्वच्छता करत आहे. हरियाणाचे एक ज्येष्ठ शेतकरी युवकांना सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोरून हटण्याचे आवाहन करत आहेत. ते म्हणत आहेत- उत्साहासोबत संयमही आवश्यक आहे. ही भविष्याची लढाई आहे, संयमाने लढली जाईल.

रात्रीचे ८ वाजले आहेत. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत लावलेल्या चार्जिंग पॉइंटवरून मोबाइल चार्ज होत आहेत. जसवीर कौर नत्त यांची आंदोलनाशी जोडलेल्या चंदिगडच्या एक शिक्षिका आणि मुंबईच्या पंजाब वुमन कलेक्टिव्हच्या कामायनी यांच्यासोबत बैठक घेत आहेत, तीही मोबाइल अॅपवर. आंदोलनात महिलांच्या भूमिकेवर चर्चा होत आहे.

सध्या कापूस वेचणी आणि गव्हाच्या लागवडीचा हंगाम असल्याने २० ते ५० % महिलाच आलेल्या आहेत. किसान सभेची छोटीशी ट्रॉलीच त्यांचे घर झाली आहे. त्यात आवश्यक असलेले प्रत्येक साहित्य आहे. त्यात मोबाइल चार्जिंग पॉइंट, लाइट, चढण्यासाठी शिड्या तसेच जेवण ठेवण्यासाठी जागा आहे. बहुतांश ट्रॉलीत बाजूला फोल्डिंग वेल्ड केले आहे, ते उघडून बसता येते. २६ नोव्हेंबरपासून आंदोलनाला बसलेल्या या शेतकऱ्यांना खाण्या-पिण्याची अडचण येऊ नये यासाठी मिठाई आणि नमकीन मठरींचा एक ट्रक भरून आला आहे.

हरियाणाच्या नागरिकांनी पंजाबहून आलेल्या महिला नेत्यांची सर्व व्यवस्था आपल्या घरात केली आहे. कॅनडाचे अमनजोत ढिल्लों फिजियोथेरेपिस्ट आहेत. त्यांनी सांगितले की, आंदोलन खलिस्तान समर्थित आहे, अशी आवई दुसऱ्या दिवशीच उठवण्यात आली. कॅनडात जाणाऱ्या युवकांसाठी ‘वुई केअर फॉर यू’ ही हेल्पलाइन आहे, तिचे ५-६ हजार सदस्य आहेत. तिनेच पुढाकार घेतला आणि ग्रुपमधील आयटी तज्ञांनी मदत केली. त्यांनी नवे सोशल मीडिया अकाउंट बनवले. हॅशटॅग आणि ट्रेंड करणे शिकवले. आंदोलनाशी संबंधित कंटेंट ट्रेंड केले. लुधियानाच्या एका एनजीओकडूनही मदत मिळाली. शेतकरी नेते आपला मुद्दा फक्त पंजाबीतूनच मांडू शकत होते, हे दुसरे आव्हान होते. त्यामुळे शिक्षित युवकांची मदत घेण्यात आली आणि त्यांनी भाषणे इंग्रजी आणि हिंदीत अनुवादित केली.

या आंदोलनात माळवातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे तसेच ज्यांचे नातेवाईक विदेशात आहेत अशा कुटुंबातील लोकही मोठ्या प्रमाणावर आले आहेत. त्यामुळे येथे इतर ठिकाणांपेक्षा जास्त लंगर सुरू आहेत. लंगरचा अर्थ फक्त जेवण नव्हे तर लंगरमध्ये ओडोमॉस, पॅरासिटामॉल आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटपही केले जात आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या गुरू रामदास कॉलेजच्या २ अॅम्ब्युलन्स उभ्या आहेत, अनेक खासगी संस्थांनीही वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे.

कायदा मागे नाही, दुरुस्ती होऊ शकेल : कैलाश चौधरी
...आणि सरकारची भूमिका

- केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले, ‘जे शेतकरी शेतात काम करत आहेत ते चिंतित आहेत, असे मला वाटत नाही. काही राजकीय लोक आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांचा कायद्यांना पाठिंबा आहे. कायदा मागे घ्यावा, असे मला वाटत नाही. गरज पडली तर आगामी काळात यात काही दुरुस्ती होऊ शकेल. ’
- उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, चंदिगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
- विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
- ऑलिम्पिक पदक विजेता मुष्टियोद्धा विजेंदरसिंगनेही पाठिंबा देत राजीव गांधी खेलरत्न परत करण्याचा इशारा दिला.
- मुंबईत अकाली दलाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे सीएम उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनीही पाठिंबा दिला. दोन आठवड्यांनंतर दिल्लीत होणाऱ्या बैठकीलाही ते येतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser