आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभर चर्चेत असलेल्या गुजरातच्या आयशा आत्महत्या प्रकरणी अखेर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या पाली येथून त्याला पकडण्यात आले. 23 वर्षीय आयशाने साबरमती नदीमध्ये उडी घेण्यापूर्वी एक व्हिडिओ शूट करून कुटुंबियांना पाठवला होता. हा व्हिडिओ केवळ गुजरातच नव्हे, तर देशभर व्हायरल झाला. तिच्या या टोकाच्या निर्णयावर महाराष्ट्रातून सुद्धा भावूक प्रतिक्रिया समोर आल्या.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाला होता पसार
आयशाचा पती आरिफ खान राजस्थानच्या जालोर येथील रहिवासी आहे. आयशाने शनिवारी (28 फेब्रुवारी) एक व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड केला. त्यानंतर आत्महत्या केली. यानंतर पोलिस आरोपी पतीच्या घरी पोहोचले तेव्हा तो फरार झाला होता. आयशाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासूनच तो पसार झाला होता. पण, सोमवारी रात्री पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला पाली येथून अटक केली.
शिक्षणासह नोकरीही करत होती आयशा
आयशा अहमदाबादच्या रिलीफ रोड येथील एसव्ही कॉमर्स कॉलेजातून अर्थशास्त्रात एम.ए. करत होती. सोबतच एका खासगी कंपनीत नोकरीला होती. 6 जुलै 2018 रोजी तिचा आरिफसोबत विवाह झाला. पण, 10 मार्च 2020 पासून आयशा आपल्या माहेरीच राहत होती. तिने आरिफवर छळाचे आरोप केले होते.
तिला तीन दिवस उपाशी ठेवले तेव्हा...
आयशाच्या वडिलांनी सांगितले, की "माझी मुलगी घरात नेहमी थट्टा मस्करी करत राहायची. इतक्या हसऱ्या स्वभावाच्या माझ्या मुलीचे आयुष्य लग्नानंतर नरक झाले होते. एकदा तर हद्दच झाली. तिला तीन दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. तिने मला काही सांगू नये म्हणून पती आरिफने तिचा फोन सुद्धा हिसकावून घेतला होता. कसे-बसे तिने फोन मिळवून माझ्याकडे आपली व्यथा मांडली की, पप्पा या लोकांनी माझे खाणे-पिणे सुद्धा बंद केले."
आयशाच्या मारेकऱ्यांना माफ करणार नाही
तिच्या त्या फोननंतर मी एक क्षणही व्यर्थ न जाऊ देता थेट पती आरिफ, सासू-सासरे आणि तिच्या नणदच्या विरोधात हुंडाबळीचा खटला दाखल केला. शेवटच्या व्हिडिओमध्ये आयशाने मला आपल्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्धची तक्रार मागे घेण्यास सांगितले आहे. पण, मी माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना माफ करणार नाही.
तज्ञ म्हणतात- फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा
गुजरात बार कौन्सिलचे सदस्य गुलाब खान पठाण यांच्या मते, ही घटना अतिशय दुखद आहे. कायद्याने हे भारतीय दंड विधानाच्या कलम 306 अंतर्गत येते. त्यामुळे, आरोपींना शिक्षा होणे निश्चित आहे. यात खटला सुरू असताना एखाद्याने जबाब बदलला तरीही आयशाच्या शेवटच्या व्हिडिओच्या आधारे आरोपींना शिक्षा देता येईल. या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेऊन आरोपींना त्वरीत शिक्षा द्यायला हवी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.