आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवारची सकाळ अयोध्येसाठी अतिशय खास होती. सकाळी हनुमानगढी येथे विराजमान बजरंगबलीच्या पूजाअर्चेनंतर श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनासाठी हनुमंताची परवानगी मागण्यात आली. त्याचबरोबर हनुमानगढीवरील शस्त्रास्त्रांचे प्रतीक ‘निशाण’चे अनेक वर्षांनंतर विधिवत पूजन झाले.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पाच दशकांपासून प्रतीक्षित श्रीराम मंदिर बांधकामासाठी भूमिपूजन होईल. जन्मभूमीवर चारही भावांसह विराजमान श्रीरामलल्लांचे मंगळवारी ‘रामार्चा’ पूजन झाले. ते चार तास चालले. यात श्रीरामलल्लांसह देवतांच्या प्रत्येक मंत्राबरोबर तुळशीपत्र समर्पित केले जाते. रुद्राभिषेकासारखीच ही पूजा असते. पूजनासाठी ११ आचार्यांसह काशीतील विद्वत परिषदेचे तीन आचार्य प्रो. राजनारायण द्विवेदी, प्रो. रामचंद्र पांडेय, प्रो. विनयकुमार तिवारी यांची उपस्थिती होती. भूमिपूजन होत असलेल्या ठिकाणी स्वतंत्र आचार्य होते. तेथे त्यांनी वास्तुशांती पूजन, नवग्रह इत्यादी पूजन विधी पार पाडले. देश-विदेशातील ९ शिलापूजनाचाही त्यात समावेश आहे. पूजा झालेल्या शिळांसह कांची मठाचे शंकराचार्य यांच्याकडून आलेली कांस्यशिला, नवरत्न व सामग्रीसह बुधवारी पंतप्रधान स्वतिवाचन, वैदिक मंत्रांसह मंदिर निर्माण आरंभ पूजा करतील. काशी विद्वत आचार्यांसह आलेले चांदीचे नाग दांपत्य, कच्छप व रत्नही विराजमान होतील. देशभरातून १५०० ठिकाणांहून आलेले जल व पवित्र मातीचेही पूजन होईल. मंगळवारी परिसर ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेदाच्या वैदिक मंत्रांनी मुग्ध झाला होता. परिसरात यज्ञ-आहुतीचा दरवळ पसरलेला आहे. गेल्या ३५ वर्षांच्या आंदोलनातील समर्थकांचे दुपारनंतर पाहुण्याच्या रूपाने आगमन होत होते. सायंकाळपर्यंत बहुतांश पाहुणे मंडळी दाखल झाल्याचे ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले. सरसंघचालक मोहन भागवत, मगहर कबीर मठाचे पीठाचार्य जितेंद्रानंद सरस्वती, बाबा रामदेव, स्वामी अवधेशानंद, चिदानंद मुनी, सुधीर दहिया, राजू स्वामी, ब्रह्मानंद स्वामी, सुरेश पटेल, रितेश डांडिया यांच्यासह देशभरातील १३५ संत-महंत भूमिपूजन कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.
स्मृतिचिन्ह पाहुण्यांना राम दरबाराच्या चित्राचे चांदीचे नाणे भेट
श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीचे नाणे भेट दिले जाईल. त्याच्या एका बाजूस राम दरबार तथा दुसऱ्या बाजूस भगवान राम, सीता, लक्ष्मण व हनुमान असतील. दुसऱ्या बाजूस ट्रस्टचे प्रतीकचिन्ह असेल. अयोध्येतील भाविकांत रघुपती लड्डू म्हटले जाणारे १.२५ लाख लाडू वाटप केले जातील. अयोध्येपासून ६५० किमीवरील गौतम बुद्ध नगरात रावणाचे मंदिर आहे. या मंदिराचे पुजारी महंत रामदास म्हणाले, मला राम मंदिराच्या भूमिपूजनाची प्रतीक्षा आहे. आम्ही मिठाई वाटू.
हनुमानगढी येथे येणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरतील मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा हनुमान मंदिरात जातील. येथे ते दहा मिनिटापर्यंत पूजन करतील. हनुमानगढीकडून त्यांना पगडी, मुकुट व गदा भेट दिली जाईल. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हनुमानगढीचे पूजन करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरतील. पंतप्रधान पवित्र शरयू नदीचे दर्शन करतील. रामलल्लाचे पुजारी सत्येंद्र दास म्हणाले, पंतप्रधान पूजा करताना त्यांच्याजवळ कोणीही नसेल. तेथे आरतीची थाळी सजवलेली असेल.
काँग्रेस म्हणाली- एकतेचा संदेश, सेना म्हणाली- हा सुवर्णक्षण
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा ट्विट करून म्हणाल्या, सहजता, साहस, संयम, त्याग दीनबंधू राम नामाचे सार आहे. राम सर्वांत आहेत. राम सर्वांसोबत आहेत. रामलल्लाच्या मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुता, सांस्कृतिक एकतेची संधी ठरावी. गांधींचे रघुपती राघव राजाराम सर्वांना सन्मती देणारे आहेत. वारिस अली शाह म्हणाले, जो रब आहे तोच राम आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनात हा सुवर्णक्षण आहे. भगवान रामाच्या आशीर्वादाने कोरोना संपून जाईल, असे म्हटले.
१९८९ मध्ये पहिल्यांदा शिला ठेवून मोक्षप्राप्ती : कामेश्वर
छायाचित्र ९ नोव्हेंबर १९८९ चे आहे. तेव्हा श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य व विहिंपचे दलित कार्यकर्ता कामेश्वर चौपाल यांनी राम मंदिराची पहिली शिला ठेवली होती. कामेश्वर म्हणाले, ही वीट ठेवून त्याच दिवशी मोक्षप्राप्ती झाली होती. दलित असूनही मला संधी दिली याबद्दल ते अचंबित झाले होते.
अयोध्येत सर्व ठिकाणांहून दिसतील मंदिराचे सुवर्णकलश
सुवर्णकलश व शिखर ध्वजा अयोध्येतून कुठूनही दिसू शकतील, अशी श्रीराम मंदिराची रचना असेल. हे मंदिर अयोध्येतील सर्वात उंच मंदिर असेल. सध्या हनुमानगढी सर्वात उंच मंदिर आहे. राम मंदिरात २५ बाय २५ चे गर्भगृह बनेल. गर्भगृह व कलश सोन्याचा असू शकतो. त्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय होईल. जर्मन तंत्रज्ञानाने कलश तयार केला जाऊ शकतो. राजस्थानच्या भरतपूर व रुपबास येथील दगडांपासून भिंंती, छत, पाया, सज्जे बनवले जातील. तेथील दगडांच्या साह्याने लाल किल्ला, ताजमहल, संसद भवन, राष्ट्रपती भवन बनले आहेत.
रामनाम सार्वभौम, एका धर्मात का बांधायचे? : मोरारी बापू
रामचरितमानसमध्ये भगवान रामास भुवनेश्वर म्हटले गेले. हनुमानजी लंकेवर आपला प्रभाव टाकतात आणि मातेचा शोध घेऊन परतात. मग भगवान राम व संपूर्ण समाज समुद्रकिनारी येतात. तपस्वीचे सैन्य किनारी पोहोचल्याचे वृत्त गुप्तचरांमार्फत रावणापर्यंत जाते. तेव्हा बिभीषण रावणाला म्हणाले, तात, राम केवळ नरभूपाल नाहीत. राम केवळ मृत्युलोकाचे राजेही नाहीत. राम तत्त्वत: भुवनेश्वर आणि काळाचेही काळ आहेत. आज एखादा जबाबदार व्यक्ती रामाला काल्पनिक संबोधते, तेव्हा आम्ही ही गोष्ट कशी स्वीकारणार? राम कल्पना आहे? राम तर या राष्ट्राचा प्राण आहेत. राम या विश्वाचा प्राण आहेत. माणसाच्या आत सचराचर भरून राहिले होते. ते राम आहेत. संपूर्ण जग बुडालेले होते. ते राम आहेत. तुलसीदास म्हणतात,‘बंदउं रघुपति करुनानिधान।’ राम करुणानिधान आहेत. ज्याचे पाय पाताळात व मस्तक ब्रह्मलोकात आहे. ते राघव आहेेत. रामनामाचा महिमा यत्र-तत्र आहे. रामनाम अशुद्धी वाढू देत नाही. अशुद्धी कमी करते. रामनाम सार्वभौम आहे. त्याला एका धर्मात का बांधले जावे? देशात काही लोक रामनाम घेताना घाबरतात. एखादे सांप्रदायिकतेचे लेबल लागणार तर नाही ना, अशी त्यांना भीती वाटत असते. असे राष्ट्र संपूर्णपणे स्वतंत्र कसे असेल? मी गुलाबाची पाकळी तोडली आणि हा माझा धर्म असे सांगितले. दुसऱ्या एकाने तसेच केले. तोही हा माझा धर्म आहे, असे म्हणाला. म्हणजेच गुलाबाला अखंड ठेवले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.