आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराॐ मनो जूतिर्जुषतामाज्यस्य बृहस्पतिर्यज्ञमिमं तनोत्वरिष्टं यज्ञ समिमं दधातु। विश्वे देवास इह मादयंतामो प्रतिष्ठ॥
यजुर्वेदातील या ‘प्रतिष्ठा मंत्राचा’ उच्चार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र ९ शिळांची प्रतिष्ठापना केली. मुख्य शिळा २२.६ किलोची आहे. नऊ शिळांची नावे अशी -नंदा, जया, भद्रा, रिक्ता, पूर्णा, अजिता, अपराजिता, शुक्ला व सौभागिनी. सोन्याचा लहान कलशही मोदींनी मंदिराच्या पायाभरणीत अर्पण केला.
रामलल्ला येथेच होतील विराजमान
ही पूजा सांगणारे पुरोहित आचार्य दुर्गा गौतम म्हणाले, ३२ सेकंदांच्या या मुहूर्तावर मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन यांनी सोन्या-चांदीची नाणी अर्पण केली.
त्रेतायुगात इक्ष्वाकू वंशाची राजधानी असलेली अयोध्या बुधवारी नव्या इतिहासाची साक्षीदार ठरली. श्रीरामाच्या जन्मभूमीवरून ५ शतकांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर अत्यंत शांततेत नव्या मंदिर उभारणीचा औपचारिक शुभारंभ झाला. टीव्हीच्या माध्यमातून देश-विदेशातील कोट्यवधी भारतीयांच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले. अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतलेले मोदी देशाचे पहिले पंतप्रधान ठरले अाहेत. देश-विदेशात २००हून अधिक दूरचित्रवाहिन्यांवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. भारतासह जगभरात राहणाऱ्या अनेक प्रवासी भारतीयांनी हा सोहळा पाहिला. घरोघर दिवे लावून श्रीरामांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान म्हणाले, ‘आज राम जन्मभूमी मुक्त झाली आहे... आणि संपूर्ण भारत राममय झाला आहे. ’
ऐतिहासिक उत्सवात शरयूने पाहिली प्रेमाच्या अश्रूंची संततधार...
शांत वाहणारी शरयू नदी अयाध्येच्या इतिहासाची मूक साक्षीदार आहे. बुधवारी पुन्हा एकदा शरयू अशाच ऐतिहासिक क्षणाची आणि अयोध्येतील प्रत्येकाच्या मनातील उत्साहाची तसेच डोळ्यातील आनंदाश्रूंची साक्षीदार ठरली. अवघ्या देशाचे लक्ष बुधवारी अयोध्येतील भूमिपूजन व उत्सवाकडे होते. या सायंकाळी झालेले अयोध्या आणि शरयूचे आलिंगन क्वचितच कुणी पाहिले असेल. सायंकाळी हजारो दिव्यांचा पिवळा प्रकाश व शरयू नदीचा प्रवाह एक झाला होता. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेली अयोध्या व शरयू जणू परस्परांना आलिंगन देत असल्याचा भास येथे होता. दोघांनीही पुन्हा एकदा नवा इतिहास घडताना पाहिला... ५०० वर्षांनंतर रामलल्ला मंदिर उभारणीचा शुभारंभ आणि तोही प्रथमच एखाद्या पंतप्रधानांच्या हस्ते... अयोध्येत सारे काही ऐतिहासिक होते. दिवसभरात अयोध्येत मान्यवर पाहुण्यांचा राबता होता. सायंकाळ होऊ लागली तसे प्रभू श्रीराम जणू घरोघर प्रकाशरूपाने दाखल झाले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या लोकांना भूमिपूजन सोहळ्यानंतर अश्रू आवरले नाहीत. सायंकाळपर्यंत अयोध्यावासी रामलल्लांचे रूप पाहण्यासाठी आतुरले होते. चौपाईचे स्वर चारही दिशांनी सुरू होते. सर्वात प्राचीन नागेश्वरनाथ मंदिरापासून हनुमानगढीपर्यंत एक वैभव होते. कुणीही राजकीय नेता नव्हता, ना राजकारण. आंदोलनातील कुणी नेतेही नव्हते. येथील श्रीराम उग्र नव्हे, शांत आहे. आक्रमक नव्हे, करुणामूर्ती आहे. त्यांच्या प्रसन्नतेला तर मर्यादाच नाही...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.