आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिर परिसरात जमिनीच्या सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. बुधवारी परिसरात कुबेर टेकडीवर विराजमान शशांक शेखर शिवलिंगास रुद्राभिषेक करण्यात आला. आता मंदिर उभारणीच्या शुभारंभासाठी पंतप्रधान अयोध्येत येण्याची प्रतीक्षा आहे. उत्तरेत २ जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा व्हावा, असा राममंदिर ट्रस्टचा प्रयत्न आहे. या दौऱ्यात मंदिराचे भूमिपूजन केले जाईल. ट्रस्टने २९ जून हा मुहूर्त काढला असून देवशयनी एकादशीपूर्वी भूमिपूजन झाले नाही तर नंतर चार महिने हे काम सुरू होऊ शकणार नाही. कारण, धार्मिक परंपरेनुसार चातुर्मासात शुभकार्य केले जात नाही. मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनुसार, पंतप्रधानांचा दौरा कोरोना संसर्गाच्या स्थितीवर अवलंबून आहे. ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांचे उत्तराधिकारी कमलनयन दास म्हणाले की, मंदिराचे काम निर्विघ्न पार पडावे म्हणून रुद्राभिषेक करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच मंदिराची पायाभरणी व्हावी, अशी रामभक्तांची इच्छा आहे. त्यांनी अयोध्येत कधी यावे हे तेच ठरवतील. मात्र, यासाठी पूर्वतयारी मात्र वेगाने सुरू आहे. दरम्यान, क्षीरेश्वरनाथ मंदिर ते श्रीरामजन्मभूमी गर्भगृह असा ९०० मीटरचा दुहेरी मार्ग तयार करण्यात येत असून पंतप्रधान याच मार्गाने मंदिरापर्यंत जातील. रविवारी दिल्लीत ट्रस्टची याबाबत महत्त्वाची बैठक झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.