आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir | There Will Be A High tech City In Ayodhya, Over One Lakh Devotees Can Come Every Day

राम मंदिर:अयोध्येत असेल हायटेक सिटी, रोज येऊ शकतील एक लाखावर भाविक, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचा नकाशा सर्वात अगोदर दिव्य मराठीत

विजय उपाध्याय | अयोध्या3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन बंधूंसह दरबारात विराजमान होतील रामलल्ला
  • 70 एकर परिसर : 300 कोटी फक्त मंदिरावर खर्च होणार

अयोध्यास्थित श्रीराम जन्मभूमी “श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ म्हणून ओळखले जाईल. या परिसराला सरकारी दस्तऐवजात हेच नाव दिले जाईल. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनापूर्वी मंदिर उभारणीसाठी विविध विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र आणि परवानगीची प्रक्रिया अत्यंत वेगात सुरू आहे.

अयोध्या विकास प्राधिकरणात मंदिराच्या नकाशाची फाइल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मंदिराच्या नव्या मॉडेलसोबत संपूर्ण ७० एकर क्षेत्राच्या विकासाचा नकाशाही तयार आहे. सर्व आवश्यक सुविधा आणि ग्रीन बेल्टमध्ये तीन मजली मंदिरात रामदरबार सजेल.

संपूर्ण परिसर हायटेक सिटीसारखा असेल. हा भाग अयोध्येचे उपनगर मानला जाईल. रोज १ लाख भाविकांना येथे सुविधा दिली जाऊ शकेल. संपूर्ण परिसर सौरऊर्जेने प्रकाशमान होईल. अगोदर ६७.७ एकर ठरलेली जमीन मोजणीनंतर ७० एकर मिळाली आहे. गर्भगृह रामकोटमध्ये आहे.

मंदिर, परिक्रमा आणि पंचदेव मंदिर सहा एकरांत

मंदिर आणि परिक्रमा पथ तसेच पंचदेव मंदिराचे क्षेत्र सुमारे ६ एकर असेल. गर्भगृह व रामदरबाराचे मुख पूर्वेकडे असेल. दरबार हॉलमधून थेट हनुमान गढी दिसेल. मंदिर उभारणीसाठी सुमारे ३०० कोटी खर्च येईल. विशेष म्हणजे नकाशाला मंजुरी मिळवण्यासाठी २ कोटी रुपये फी द्यावी लागेल.

५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनासोबतच अयोध्येत ५०० कोटींच्या प्रकल्पांची घोषणा होईल. यादरम्यान ३२६ कोटींच्या प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरण होईल. तसेच १६१ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पणही होईल.

पायात टाइम कॅप्सूलची बातमी खोटी : चंपत राय

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी माध्यमांमध्ये टाइम कॅप्सूलविषयी आलेल्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. मंदिर उभारणीपूर्वी जमिनीत २ हजार फूट खोलीतील धातूच्या पेटीत टाइम कॅप्सूल पुरली जाणार असल्याच्या या बातम्या होत्या.