आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी समर्पण निधी (देणग्या) गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेशी संबंधित दै. भास्करच्या प्रश्नांना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सडेतोड उत्तरे दिली. या चर्चेचे मुख्य अंश...
- राम मंदिरासाठी आतापर्यंत किती निधी गोळा झाला आहे?
अपेक्षेपेक्षा खूप जास्त. जेथून १० रुपयांची अपेक्षा होती, तेथून १०० रुपये, जेथून १०० रुपयांची अपेक्षा होती, तेथून हजार रुपये मिळत आहेत. बँकेत जमा चेक क्लिअर होण्यासाठी ८-१० दिवस लागत आहेत. एकूण रकमेचा समोर आलेला आकडा फक्त अंदाजच आहे. अंतिम आकडा २७ फेब्रुवारीला मोहीम संपल्यानंतरच स्पष्ट होईल. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांनी आतापर्यंत जमा रक्कम १५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. माझ्या मते हा आजवरचा अचूक आकडा असावा.
- काहींनी ट्रस्टसारख्या पावत्या छापून घेतल्या, मिळत्याजुळत्या नावांनी वेबसाइट बनवल्या, बँक खातीही उघडली आहेत...
ही बाब पूर्णपणे खरी आहे. अयोध्येत मी स्वत: गेल्या मेपासून आतापर्यंत ४-५ एफआयआर दाखल केले आहेत. ३० जानेवारीला ट्रस्टच्या नावातून एक अक्षर हटवून बनावट वेबसाइट तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ८-१० एफआयआर नोंदवले आहेत. काही कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरही पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. जेथे ८-१० लाख कार्यकर्ते फिरून देणग्या घेत आहेत तेथे १०-१५ लोकांनी घोळ केल्यास ते समुद्रातील एका थेंबाइतकेही नाही. मी त्याला गांभीर्याने घेत नाही. कारण, देश गंभीर आहे, तरीही घोटाळे होतच आहेत. कुणाला पकडले जात आहे का?
- समर्पण निधीसाठी यूपीआय-बारकोडही तयार केले. मात्र त्याचीही बनावट खाती तयार केली, त्यावर नियंत्रण कसे आणाल?
आम्ही यूपीआय व बारकोडद्वारे समर्पण निधी घेणे बंद केले आहे. कारण ती यत्किंचितही विश्वासार्ह नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांनी सांगितले आहे की त्यात घोळ केला जाऊ शकतो. ट्रस्टची केवळ ३ खाती आहेत. ती स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक व बँक ऑफ बडोद्यात आहेत. आम्ही स्वत: बँकांना सांगितले आहे की, यूपीआय व बारकोडमध्ये कुणीही फेरफार - घोळ करू शकतो.
- सरकार यूपीआय व बारकोड सर्वात सुरक्षित असल्याचे सांगते?
गोंधळ केला जाऊ शकत नाही अशी काही व्यवस्था सरकारने केलीही असेल. आमचे बँकवाले म्हणतात की यूपीआय आणि बारकोडमध्ये गोंधळ केला जाऊ शकतो.
- मग लोकांना असली-नकलीत फरक कसा करता येईल, आणि अस्सल कुपनची ओळख तरी कशी पटवली जाणार?
ही कुपन्स खरी आहेत, हे कसे मानावे, याबाबत मला रोज दोन-चार फोन तरी येतात. तुम्हीच सांगा, तुम्ही फोनवर बाेलत आहात, मात्र पाहू शकत नाही. मग या कॉलच्या दुसऱ्या बाजूला बोलणारा मीच असेन, याची काय गॅरंटी आहे? खरे तर अविश्वास वा संशय दूर करण्यासाठी कोणतीही पद्धत नाही. समजा मी एखादी पद्धत शोधली तरी ज्यांना फसवेगिरी करायची आहेत ते आणखी चार नव्या शकला शोधून काढतीलच. यामुळे आधीच आमच्या वेबसाइटवरून कुपन/पावतीबाबत खातरजमा करून घ्यावी. बँक खातेही तपासून घ्यावे. संशयाचे निराकरण झाले तरच देणगी द्यावी, अन्यथा राहू द्यावे.
- देणगी रकमेचे काही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे का?
कोणतेही उद्दिष्ट ठेवले नाही, याबाबत विचारही केला नाही. निम्मी लोकसंख्या, म्हणजे ६५ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले. म्हणजे सरासरी १३ कोटी घरांचा दरवाजा ठोठावायचा आहे. लोक किमान १०० रुपये देतातच. यामुळे सरासरी १३०० कोटी रुपये जमा होतीलच, असा अंदाज बांधता येतो. १०,१०० आणि एक हजार रुपयांचे कुपन जवळपास १९ कोटी छापली आहेत. आता जेवढ्या कुपन्सचा वापर होईल त्यातून आम्ही किती लोकसंख्येपर्यंत पोहोचू शकलो,याचा अंदाज येईल.
- जी रक्कम जमा होत आहे, त्याचा वापर केव्हापासून सुरू होईल किंवा सध्या होत आहे?
या रकमेचा वापर पहिल्या दिवसापासून हाेत आहे. अभियान सुरूही झाले नव्हते, त्याआधीही न्यासाच्या खात्यात रक्कम येत होती आणि २७ फेब्रुवारीला अभियान बंद झाल्यानंतरही येत राहील. एलअँडटी तिथे अनेक महिन्यांपासून काम करत आहे. पंतप्रधान भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते किंवा निधी संकलनासाठी कुपन छापली गेली- ही सर्व कामे मंदिर बांधकामाचीच तर आहेत.
- मध्य प्रदेशात काँग्रेस राम मंदिर ट्रस्टचा क्रमांक देऊन थेट खात्यात पैसे टाकण्याचे आवाहन करत आहे, राजस्थानात एनएसयूआय ‘एक रुपया रामाच्या नावे’ अभियान चालवत आहे. तुम्ही यावर काय सांगाल?
ही आनंदाची बाब आहे. आम्हीच निधी संकलनाची रक्कम जमा करावी, असा काही ट्रेडमार्क नाही. आता जे लोक ऑनलाइन आपला निधी देत आहेत, त्यांच्याकडे आमचा कार्यकर्ता थोडाच जातो.
- मंदिर बांधकामाची स्थिती काय आहे, बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होईल?
मकरसंक्रांतीपासून बांधकामास सुरुवात झाली. पाया घालण्यासाठी माती काढण्याचे काम सुरू झाले आहे. मोठ्या प्रमाणात ढिगारा काढला आहे.२०२४ च्या अखेरीस किंवा २०२५ मध्ये रामलल्लाचे नव्या मंदिरात दर्शन होईल.
- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले की, निधी जमा करण्यात नाझी जर्मनीसारखी वागणूक होत आहे. निधी न देणाऱ्यांची नोंद घेतली जात आहे, घरे लक्षात ठेवली जात आहेत ...
नाझी व जर्मनी आम्ही लहानपणापासून ऐकतो आहोत, ते खूप उशिरा बोलत आहेत. कार्यकर्त्यांनी घरे चिन्हांकित केली असतील तर ती कागदाने किंवा ओल्या कपड्याने पुसून टाका. या खूप घाणेरड्या आणि निरर्थक गोष्टी आहेत. कोत्या मनाचे लोकच असे बोलू शकतात.
- कर्नाटकचेच आणखी एक माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, त्यांच्यासाठी अयोध्येत होत असलेले राम मंदिर अद्यापही वादग्रस्त आहे, त्यामुळे त्यासाठी निधी देणार नाही, यावर प्रतिक्रिया काय ?
तुम्ही आपल्या गावासाठी द्या. जिथे श्रद्धा आहे, तिथे द्या. द्यायचे नसेल तर तुमच्यावर कुणाची नाराजी आहे. त्यांच्या नावाची चर्चा व्हावी यासाठी हा सर्व पब्लिसिटी स्टंट आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.