आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानहानी प्रकरणात सुरतच्या सत्र न्यायालयाने साेमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी १३ एप्रिलला हाेईल. त्यासाठी राहुल यांना प्रत्यक्ष काेर्टात हजर राहण्याची गरज नाही. अपिलावर निर्णय येईपर्यंत कोर्टाने २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली.
राहुल यांच्या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. माेगेरा यांनी याचिकाकर्ता भाजप आमदार पूर्णेश माेदी यांनाही नाेटीस पाठवून १० एप्रिलपर्यंत जबाब देण्याचे निर्देश दिले. राहुल यांच्याकडून दाेन अर्ज दाखल केले गेले. पहिला अर्ज नियमित जामीन व दुसरा अर्ज शिक्षेच्या विराेधातील अपिलाचा हाेता. माेदी आडनावावरून केलेल्या टिप्पणी प्रकरणात सुरतच्या एका न्यायालयाने राहुल गांधींना दाेषी ठरवून २ वर्षांची शिक्षा ठाेठावली हाेती.
तरीही... राहुल गांधी यांची अपात्रता कायम राहणार
पुढे काय : राहुल गांधी यांची अपात्रता कायम राहील. सर्वाेच्च न्यायालयाकडून शिक्षा रद्द होईपर्यंत राहुल यांना आठ वर्षे काेणतीही निवडणूक लढवता येणार नाही.
राहुल म्हणाले, लाेकशाहीला वाचवण्याची लढाई
जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, ‘मित्रकाल’ विरुद्ध लाेकशाहीला वाचवण्याची लढाई आहे. या संघर्षात सत्य माझे अस्त्र आहे. सत्य हाच माझा आश्रय अाहे.
महाराष्ट्र सीमेवर आमदार ठाकूर यांचे वाहन गुजरात पोलिसांनी रोखले; एकमेकांविरुद्ध ‘लाइव्ह ड्रामा’
प्रतिनिधी | अमरावती
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरतला जात असलेल्या काँग्रेस नेत्या तथा आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांचे वाहन गुजरात पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबवले. त्या वेळी आ. ठाकूर यांनी गुजरात पोलिसांना प्रश्न केला की, शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते, त्या वेळी अशीच चौकशी केली होती का? त्यावर गुजरात पोलिसांनी आम्ही आमची ड्यूटी करत असल्याचे सांगितले. या प्रकाराचे आ. ठाकूर यांनी सोशल मीडियावर लाइव्हही केले.
आ. ठाकूर मुंबईवरून सुरतला जात होत्या. त्या वेळी त्यांचे वाहन गुजरात पोलिसांनी अडवून दोन कॅमेराधारक त्यांच्या वाहनासमोर उभे केले आणि त्याचे लाइव्ह गांधीनगरमध्ये होत आहे, असे सांगितले. काही वेळाने पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करुन यशोमती ठाकूर यांच्या वाहनाला जाऊ दिले.
नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना पाेलिसांनी घेतले ताब्यात
नाशिक | राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत येथे जाणाऱ्या नाशिकच्या शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह १० ते १५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गुजरातमधील बलसाड जिल्ह्यातील धरमपूर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.