आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:काश्मीरच्या या गावात लग्नात हुंडा-उधळपट्टीवर बंदी, दोन्ही कुटुंबे मिळून करतात खर्च, 30 वर्षांपासून कौटुंबिक हिंसाचाराची घटना नाही

श्रीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीरमधील ‘मोठे घर’... तेथे हुंडा प्रथेविरोधात गावाचा स्वतंत्र लेखी कायदा आहे

श्रीनगरच्या गांदरबल जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या खोऱ्यांतील बाबा वायिल गाव. तेथील लोकांच्या सिद्धांत पालनामुळे या गावाला लोक ‘मोठे घर’ असे संबोधतात. लग्नात दागिने आणि हुंड्यावर पूर्णपणे बंदी असणारे हे श्रीनगरमधील एकमेव गाव. तीन दशकांपासून ग्रामस्थ या नियमाचे पालन करत आहेत.

या गावात वर अथवा वधूला भेट म्हणून सोने देण्याची प्रथा नाही, कुटुंब कितीही श्रीमंत असले तरीही. गावातील श्रीमंत आणि गरीब आजही तीन दशकांपूर्वी निश्चित केलेले सिद्धांत आणि मूल्यांचे पालन करतात. तेव्हा या लेखी दस्तऐवजावर गावातील मान्यवरांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या दस्तऐवजानुसार लग्नात उधळपट्टी करण्यावर पूर्णपणे बंदी असेल. सर्व कार्यक्रम साधेपणाने पार पडतील. वर आणि वधूचे कुटुंबीय लग्नाचा खर्च करतात. वराचे कुटुंब वधूच्या कुटुंबाला ५० हजार रुपये देते. त्यात २० हजार मेहर, २० हजार कपडे आणि १० हजार रुपये इतर खर्चांसाठी असतात. म्हणजे वधूच्या कुटुंबाला मुलीच्या लग्नात काहीच खर्च करावा लागत नाही. या नियमांनुसार जर कोणी हुंडा घेताना आढळले तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल. त्या कुटुंबातील कोणाचे निधन झाले तरी गावातील कोणीही अंत्यसंस्काराला जाणार नाही. या सर्व नियमांचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. ३० वर्षांत आतापर्यंत कौटुंबिक हिंसाचाराची किंवा हुंड्याची एकही घटना घडलेली नाही. हुंडा आणि लग्नातील खर्चाचा दबाव नसल्याने गावातील लोक आपल्या मुलींचे लग्न २५ वर्षे वय असतानाच करू शकतात. काश्मीरच्या इतर काही भागांत मुलींचा ३५ वर्षांपर्यंत विवाहच होत नाही. कारण, त्यांचे कुटुंबीय हुंडा आणि लग्नाचा खर्च करण्यास असमर्थ आहेत.

या गावातील मशिदीचे ६० वर्षीय काझी मोहंमद सईद शाह यांनी सांगितले की, लोक आमच्या गावात मुलगी देण्यास उत्सुक असतात. आमच्याकडे मुली कुटुंबावरील ओझे नाहीत. सर्व कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने होतात. हुंडा हा प्रकारच आमच्याकडे नाही. हुंडा हे कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे, हे आम्हाला माहीत आहे. दुसरीकडे, हुंड्यामुळे संपूर्ण काश्मीरमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना घडतात.

कोणाला हुंडा द्यावा लागू नये याकडे ज्येष्ठ नागरिक ठेवतात लक्ष
बशीर अहमद यांनी सांगितले की, कोणाला हुंडा द्यावा लागू नये याकडे गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष ठेवतात. बऱ्याच वर्षांपूर्वी एक घटना घडली होती, तेव्हा गावातील लोकांनी हुंड्यातील साहित्याला आग लावली होती. आम्ही आमच्या गावातील मुलीचे लग्न दुसऱ्या भागातील मुलाशी केले तरी तेथेही आम्ही गावातील नियमांचे पालन करतो. बहुतांश लोक त्याबद्दल प्रशंसाही करतात.

बातम्या आणखी आहेत...