आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bangal Election Updates: 4 Killed In Bengal Firing; Troops Surrounded 350 To 400 People And Threw Bombs; News And Live Updates

वादानंतर हिंसाचार:बंगाल गोळीबारात 4 ठार; जवानांना 350 ते 400 लोकांचा घेराव, बॉम्बही फेकले

कोलकाता2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी हावडा जिल्ह्यात भाजप खासदार लॉकेट चटर्जी यांची कार रोखण्याचा प्रयत्न करताना स्थानिक लोक.

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात शनिवारी ४४ जागांसाठी ७६.१६% मतदान झाले. कूचबिहार जिल्ह्यातील सीतलकुची येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. बंगालमध्ये आतापर्यंत २९४ जागांपैकी १३५ मतदारसंघांत मतदान पार पडले आहे. उर्वरित ४ टप्प्यांत १५९ जागांसाठी मतदान बाकी आहे. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी राज्यात सभा घेतल्या. निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या प्राथमिक अहवालानुसार, वादानंतर ३५० ते ४०० स्थानिक लाेकांनी सुरक्षा दलास घेराव घातला होता. जवानांच्या रायफल हिसकावण्याचेही प्रयत्न झाले. यामुळे सीआयएसएफ जवानांना गोळीबार करावा लागला. यानंतर लोकांनी बॉम्ब फेकले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा दलाला बळाचा वापर करावा लागला. निवडणूक आयोगाने या घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या भागातील मतदान केंद्र क्रमांक १२६ वरील मतदानही थांबवण्यात आले. सीतलकुची येथेच भाजप व तृणमूल समर्थक भिडले. या वेळी गोळीबार झाल्याने एक मतदार आनंद बर्मन (१८) याचा मृत्यू झाला. चौथ्या टप्प्यात उत्तर कूचबिहार, अलिपूरद्वार जिल्ह्यातील सर्व तसेच दक्षिण २४ परगणा व हुगळीतील काही जागांचा समावेश आहे. शनिवारच्या मतदानानंतर इतर उमेदवारांसह केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले आहे.

सीआयडी चौकशी करू : ममता
सिलिगुडी | स्वरक्षणासाठी गोळीबार केल्याच्या सुरक्षा दलाच्या दाव्यावर ममतांनी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, सुरक्षा दलाच्या दाव्याच्या बाजूने कोणतेही व्हिडिओ चित्रण नाही. ही कथा कोठून आली? त्यांच्याकडील कुणी जखमी झाला का? घटनेची सीआयडी चौकशी करू.

दीदींची लोकांना चिथावणी : मोदी
सिलिगुडी/नदिया| पंतप्रधान मोदी म्हणाले, ममतादीदी आणि तृणमूलचे गुंड लोकांना सुरक्षा दलाविरोधात भडकावत आहेत. सुरक्षा दलाला कसा घेराव घालायचा आणि त्यांना कसे मारायचे याचे निर्देश दीदी देत आहेत. आपल्या बहादूर जवानांसोबत असे वर्तन योग्य आहे का?

प्रशांत किशोर यांचा दावा
५५ टक्के हिंदू मतदार भाजपसोबत, २० वर्षांपासून लांगूलचालनाचे राजकारण
ममतांचे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची पत्रकारांसोबतची चर्चा व्हायरल झाली आहे. यात ते बंगालची सद्य:स्थिती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा उल्लेख करत आहेत. ते म्हणतात, बंगालमध्ये ध्रुवीकरण झाले आहे. १ कोटीपेक्षा जास्त हिंदी भाषक मतदार व दलित भाजपसोबत आहेत. ५०-५५ टक्के हिंदू मोदींना मते देतील. हिंदी भाषक १ कोटीपेक्षा जास्त मतदार आहेत. दलित २७ टक्के आहेत. ते पूर्णपणे भाजपसोबत आहेत. २० वर्षांपासून येथे अल्पसंख्याक तुष्टीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंत पहिल्यांदाच आपल्याला कुणीतरी विचारत आहे अशी भावना आहे.

बातम्या आणखी आहेत...