आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात विविध राज्यांना थेट व्हॅक्सीन पुरवठा 1 मे पासून केला जात असल्याची माहिती कोव्हॅक्सीन बनवणाऱ्या भारत बायोटेकने जारी केली आहे. अनेक राज्यांनी कोरोना व्हॅक्सीनचा तुटवडा असल्याची तक्रार केली. केंद्राकडून व्हॅक्सीनचे वाटप योग्यरित्या होत नाही असे आरोपही झाले. पण, हे आरोप चुकीचे असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. यासोबतच, लसींचा नियमित पुरवठा देखील सुरूच आहे. 1 मे पासून 18 राज्यांना लसींचा थेट पुरवठा केला जात आहे. ज्या राज्यांना थेट व्हॅक्सीन पुरवण्यात आल्या, त्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, बिहार, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
भारत बायोटेकने सोशल मीडियावर लिहिले, "लसींचा पुरवठा लवकरात लवकर करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. तरीही काही राज्य आमच्यावर प्रश्न उपस्थित करत असून हे अतिशय निराशाजनक आहे. आमचे 50% कर्मचारी कोरोनामुळे काम करू शकत नाहीत. तरीही आम्ही महामारी आणि लॉकडाउनमध्ये 24 तास काम करत आहोत."
सरकारने वाटप केल्याप्रमाणे राज्यांना थेट पुरवठा
कंपनीच्या संयुक्त संचालक सुचित्रा एला यांनी नुकतेच सांगितले, की केंद्र सरकारकडून होणाऱ्या वाटपाच्या आधारे कंपनीने 1 मे पासून राज्यांना थेट व्हॅक्सीन पुरवठा सुरू केला आहे. तत्पूर्वी आरोग्य मंत्र्यांनी सांगितले होते, की तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या उत्पादनात एकूण उत्पादनाचा 50% साठा केंद्र सरकार ठेवणार आहे. तर उर्वरीत 50% राज्य सरकार आणि खुल्या मार्केटमध्ये दिला जाणार आहे.
सध्या महाग आहेत व्हॅक्सीन
भारत बायोटेकने केंद्र सरकारला प्रति डोस 150 रुपये आणि राज्य सरकारांना 600 रुपये प्रति डोस व्हॅक्सीन देण्याची घोषणा केली होती. पण, टीका झाल्यानंतर 29 एप्रिल रोजी कंपनीने लसीची किंमत राज्यांसाठी 600 रुपयांवरून 400 रुपये करत असल्याचे घोषित केले. खासगी रुग्णालयांना या लस प्रति डोस 1200 रुपयांत मिळत आहेत.
सर्वात यशस्वी लसींपैकी एक कोव्हॅक्सीन
भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने पहिली स्वदेशी लस कोव्हॅक्सीन तयार केली. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचे अंतिम निकाल जारी केले. त्यामध्ये ही लस 78% काम करत असल्याचा दावा करण्यात आला. हे व्हॅक्सीन घेणाऱ्यांपैकी एकात सुद्धा कोरोना झाल्यानंतर गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. गंभीर लक्षणे रोखण्यात व्हॅक्सीन शंभर टक्के उपयोगी असल्याचे सांगितले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.