आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझ्या डोळ्यापुढे माझा जवान मुलगा व मुलगी तडफडत मरण पावले. सासुसासऱ्याचाही जीव गेला. आता एक जवान मुलगा व मुलगी आहे. पण त्यांना ना नोकरी आहे, ना त्यांच्याशी कुणी लग्न करत आहे. मी आजारी असते. नवऱ्याला दम लागतो. श्वास गुदमरतो. पण रोजी-रोटीसाठी घाम गाळावाच लागतो.
औषधोपचार एवढे महाग आहेत की आम्ही खरेदी करू शकत नाही. माहिती नाही आयुष्य कसे कटेल?
मी लीलाबाई, भोपाळच्या यूनियन कार्बाइड कारखान्यासमोरील जे पी नगरमध्ये राहते. माझ्या गल्लीत असे एकही घर नाही, ज्यांनी मृत्यू पाहिला नसेल, ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला नसेल. प्रत्येक घराने त्या दुर्घटनेत काही न काही गमावले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जे पी नगर बरोबर यूनियन कार्बाइड कारखान्याच्या समोर आहे.
मला ती काळरात्र अजूनही जशीच्या तशी आठवते. 2 डिसेंबर 1984, रात्रीचे 10 -11 वाजले असतील. आम्ही घरात निर्धास्तपणे झोपलो होतो. अचानक डोळ्यांत जळजळ सुरू झाली. कुणीतरी डोळ्यात मीरची टाकत आहे असे वाटले. श्वास घेण्यासही त्रास होत होता. श्वास गुदमरत होता.
मी खोलीबाहेर आले, तर मुलांनाही गुदमरल्यासारखे वाटत होते. थंडी असतानाही पती, दीर व सासु-सासरे घामाने भिजले होते. मी बाहेर येऊन पाहिले तर सर्वत्र धूर पसरला होता. आरडाओरडा सुरू होता. लोक सैरावैरा पळत होते. अचानक काय झाले, काहीच कळत नव्हते.
आम्ही सर्वजण एका खोलीत गोळा झालो. दीराने सर्वांना बाहेर जाण्यास मनाई केली. आम्ही सर्वच दरवाजे - खिडक्या बंद केल्या. स्वतःला गोधडीने पांघरून घेतले. संपूर्ण रात्र खोकलत राहिलो. असे वाटत होते, जीव जाईल. आम्ही कसेतरी सकाळ होण्याची वाट पाहिली.
मी सकाळी बाहेर पडले, तेव्हा संपूर्ण गल्ली रिकामी झाली होती. सर्वजण घर सोडून गेले होते. थोडे समोर गेले, तर रस्त्यांवर सर्वत्र मृतदेहांचा खच पडला होता. मुले, तरुण, वृद्ध सर्वांचे मृतदेह. ते दृश्य खूप भयंकर होते. मी अनेक दिवस झोपले नाही. आजही ते दृश्य आठवते, तेव्हा अंगाचा थरकाप होतो.
मुलांचे प्राण वाचावेत म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होते. दुसरीकडे कारखान्याचा सायरन सातत्याने वाजत होता. घरातील कोणतीही वस्तू खाण्यायोग्य नसल्याचे डॉक्टर व सरकारी अधिकारी वारंवार सांगत होते. कारण, प्रत्येक गोष्टीत विष पसरले होते.
आम्हाला तोपर्यंत काय घडले, यासाठी कोण जबाबदार आहे, हे संकट कुठून आले, हे कळले नव्हते. यूनियन कार्बाईड कारखान्यातून प्राणघातक वायूची गळती झाल्याचे नंतर समजले. यामुळेच हा विध्वंस घडला होता.
माझे सासरे कापड मिलमध्ये नोकरीस होते. त्या रात्री त्यांची नाइट ड्यूटी होती. ते पहाटेच पायी घरी येत होते. त्यांचे डोळे सुजले होते. ते उघडतही नव्हते. काही वेळाने त्यांना दिसणेही बंद झाले. त्यानंतर पुन्हा त्यांना कामावर जाता आले नाही.
त्यांना श्वसनाचा त्रास झाला. चालणे-फिरणेही बंद झाले. दिवसभर पलंगावर पडून राहत होते. दुसरीकडे, मुलगा व मुलीची प्रकृतीही दिवसागणिक बिघडत होती. त्यांचे शरीर फुगत होते. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. हमीदिया रुग्णालयात उपचार सुरू होते. वर्षभराने सासऱ्याचा मृत्यू झाला.
मुलगा-मुलगी जीवंत होते. पण औषधांच्या बळावर. एकदिवसही ते औषधांविना राहत नव्हते. उत्पन्न बंद पडले होते. औषधीवर संपूर्ण खर्च होत होता. कहर म्हणून दवाखान्याच्या चकरा करून मी स्वतः बेजार झाले होते. एकदिवसही घरी सुखाने राहता येत नव्हते. पती गिरणी चालवून कसे तरी घर चालवत होते.
काही वर्षांनंतर मुलीचे लग्न केले. मुलगी सासरी गेली. तिथे तिचे औषधोपचार बंद पडले. तू कोणत्या आजाराचे दररोज औषधी घेते, असे ते प्रश्न विचारत. आजार लपवण्यासाठी मुलीने औषध घेणे बंद केले. यामुळे तिची प्रकृती हाताबाहेर गेली.
त्यानंतर मी तिला घरी बोलावले. पुन्हा औषधोपचार सुरू केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मला आजही आठवते, त्यावेळी ती गरोदर होती. खूप देखभालीनंतर तिने मुलाला जन्म दिला. ती खूप आनंदात होती. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. वर्षभरातच तिचा मृत्यू झाला. तिच्या सासरच्यांनी तिचे मूल आमच्याच पदरात टाकले.
मुलीच्या मृत्यूनंतर आपला मुलगाही वाचणार नाही हे आम्हाला कळून चुकले. त्याचीही प्रकृती खालावत जात होती. बहुतांश वेळ तो रुग्णालयातच राहत होता. त्याची किडणी खराब झाली होती. त्याला डायलिसिवर ठेवावे लागत होते. मी संपूर्ण दिवस त्याच्यासोबतच राहत होते. कधी-कधी माझ्याजवळ दमडीही नसायची. मी पायीच रुग्णालयात जात होते.
डॉक्टरांनी माझा मुलगा फार काळ जगणार नाही हे सांगितले होते. पण कोणत्या आईला आपले मुलगा मरताना बघावा वाटेल. अखेर, ना-ना प्रयत्न केल्यानंतरही माझाला मुलगा गेला. तो 7 वर्षांचा असताना दुर्घटनेला बळी पडला. त्याचे संपूर्ण आयुष्य हमीदिया रुग्णालयात गेले. तरुण मुलाचा डोळ्यापुढे तडफडत मृत्यू झाला. तेव्हा तो अवघ्या 23 वर्षांचा होता.
गॅस लीक झाल्यानतंर सरकार आम्हाला दरमहा 200 रुपये देत होती. त्यानंतर 25 हजारांची भरपाई दिली. त्यातूनही दरमहा देण्यात आलेली रक्कम कापून घेतली. अशा प्रकारे कुणाला 10 तर कुणाला 15 हजार रुपये मिळाले. एवढ्या कमी पैशांत काय होते. या दुर्घटनेने दिलेल्या या जखमा या तुटपुंज्या भरपाईने भरून निघतील...
आता सर्व गोंधळ याच मुद्यावरून माजला आहे. किती सहजपणे सांगण्यात आले की, नुकसानभरपाई देण्यात आली आहे. आम्हाला काय मिळाले? तुम्हीच सांगा.
किती आंदोलने झाली. दिल्लीपर्यंत गेलो. पण हाती काहीच लागले नाही. आम्ही आजही आजारांचा सामना करत आहोत. भीती वाटते. औषधांचाही आता शरीरावर फारसा परिणाम होत नाही. आजही येथील अनेकांचा तरुणपणातच मृत्यू होतो. हे सर्वकाही त्या दुर्घटनेचा परिणाम आहे. पण दुर्दैव ऐकणारे कुणीच नाही.
नवऱ्याची प्रकृती बरी राहत नाही. त्यांच्या डोळे गेलेत. शरीर साथ देत नाही. पण घरखर्च भागवण्यासाठी गिरणी चालवावीच लागते. माझीही तब्येत बरी राहत नाही. नवऱ्याची मदत करते. असे कुठपर्यंत जगणार माहिती नाही.
घरात जवान मुलगा आहे. पण आम्हालाच त्याला सांभाळावे लागते. त्याचे लग्न होत नाही. मुलीचेही लग्नाचे वय निघून गेले आहे. आम्ही अनेक स्थळे पाहिली. पण कुणीही त्यांच्याशी लग्न करण्यास तयार नाही.
लोक म्हणतात, गॅस पीडितेची मुलगी आहे. जास्त काळ जगणार नाही. जगली तरी तिचे मुलगे दिव्यांग जन्माला येतील. आजारी होतील. अशा मुलीला आम्ही करणार नाही. आम्ही काय करावे? कसे जगावे?
लीलाबाईंनी ह्या सर्व गोष्टी दिव्य मराठी नेटवर्कच्या रिपोर्टर मनिषा भल्लांशी शेअर केल्या आहेत...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.