आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रथमच आमदार झालेले ५९ वर्षीय भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजपने पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन २४ तासांतच नेतृत्व परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण केली. शनिवारी विजय रूपाणी यांच्या अचानक राजीनाम्यानंतर रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली. पटेल यांनी राज्यपाल देवव्रत आचार्य यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. ते सोमवारी दुपारी दोन वाजता एकटेच शपथ घेतील.
सूत्रांच्या मते, नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी विधिमंडळ पक्षाची बैठक फक्त औपचारिकता होती. भूपेंद्र यांचे नाव दिल्लीहून निश्चित झाले होते. मावळते मुख्यमंत्री रूपाणी यांनीच भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. भूपेंद्र अहमदाबादच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते २०१७ मध्ये १.१७ लाख मतांनी विजयी झाले होते. हा विक्रमी विजय होता. समर्थकांमध्ये ‘दादा’ नावाने ते लोकप्रिय आहेत. भूपेंद्र पटेल हे माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात.
भूपेंद्र पटेल यांचे नाव साधे दावेदारांच्या यादीतही नव्हते रूपाणी यांना निरोप जसा आश्चर्यकारक होता, तसाच भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय धक्कादायक होता. शनिवारी रूपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर ज्या नेत्यांची नावे चर्चेत आली त्यात भूपेंद्र यांचे नावच नव्हते. माध्यमांत नितीन पटेल, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, गोरधन झाडाफिया, प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांची नावे प्रमुख दावेदारांत होती. शेवटी भाजप प्रदेश अध्यक्ष रणछोड फालदू यांचेही नाव चर्चेत आले. परंतु, खुर्ची भूपेंद्र पटेल यांना मिळाली.
२०२२ साठी काँग्रेस-‘आप’ला आता नवे धोरण आखावे लागेल
नवा चेहरा का?
एक नवा चेहरा राज्यात देण्याचा मोदी-शहा यांचा प्रयत्न होता. सरकारमधील एखादा चेहरा मुख्यमंत्री म्हणून दिला असता तर जनतेची नाराजी कायम असती.
भूपेंद्र पटेलच का ?
३ कारणे. पहिले- ते कडवे पटेल आहेत. मां उमियाधामसारख्या संस्थेशी संबंध. पाटीदारांत दबदबा आहे. दुसरे- अमित शहा यांच्या लोकसभा मतदारसंघातील घाटलोडियाचे ते आमदार आहेत. शहा आणि आनंदीबेन या दोघांचेही निकटवर्तीय. तिसरे- संघात चांगला प्रभाव. परंतु, प्रशासकीय अनुभव कमी आहे. रूपाणींबाबतही हेच होते.
मग आता कोणताचा मुद्दा नाही?
मुद्दे आहेत, परंतु सरकारच्या विरोधात एकगठ्ठा मते पडतील असा मुद्दा नाही. कोरोना गैरव्यवस्थापनाचा मुद्दा रूपानींसोबतच मागे पडलाय.
मग सरकारमध्येही बदल होणार?
जवळपास सरकारचा पूर्ण चेहरा नवा असेल. भूपेंद्र चुडासमा, नितीन पटेल, कौशिक पटेलसह अनेक बडे चेहरे काढून नव्यांना संधी मिळेल.
काँग्रेस आणि आप काय करणार?
दोन्ही पक्षांना नव्याने धोरण आखावे लागेल. पटेलमधील चेहरे उतरवावे लागतील. काँग्रेसने हार्दिक पटेलांना पुढे केले तर इतर नेते त्यांना स्वीकारतील का, ही शंका आहे, तर आम आदमी पक्षाची शक्ती पाटीदार मतांवर अवलंबून आहे. गुजरातच्या ९० टक्के जागा ४ जातीत विभागल्या आहेत. पाटीदार, ओबीसी, दलित आणि आदिवासी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.