आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार महाभारत 2020:सीएम पदासाठी अर्धा डझन उमेदवार, पैकी चार वेगवेगळ्या आघाडीचे नेते

पाटणा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजवर कोणत्याही राज्यात एवढे चेहरे नव्हते मैदानात

राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात १७ व्या बिहार विधानसभेत यंदा एक नव्हे, एकूण सहा उमेदवार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून रिंगणात उतरले आहेत. याआधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र किंवा झारखंडमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून एक किंवा दोन नेत्यांना समोर केले जाते होते. बिहारमध्ये मात्र ही संख्या अर्ध्या डझनावर गेली. त्यापैकी चार वेगवेगळ्या आघाड्यांचे नेते आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार रालोआचा चेहरा आहेत. महाआघाडीकडून तेजस्वी यादव, ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंटकडून उपेंद्र कुशवाह यांच्यानंतर प्रगतिशील लोकशाही आघाडीकडून राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादवदेखील सहभागी आहेत. नवोदित पक्ष प्लूरल्सच्या पुष्पम प्रिया चौधरी व लोजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवानदेखील मैदानात आहेत. ३३ वर्षीय पुष्पम प्रिया लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी राजकारणात थेट प्रवेश करून स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे जाहीर केले. चिराग यांच्या पक्षाकडून सातत्याने त्यांना पुढे केले जात आहे.

सत्तेच्या दावेदारांपैकी केवळ तेजस्वी (राघोपूर), पप्पू यादव (मधेपुरा), पुष्पम प्रिया चौधरी या बांकीपूर आणि बिस्फीमधून निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार विधान परिषदेचे सदस्य आहेत. रालोसपाप्रमुख उपेंद्र कुशवाहदेखील निवडणूक लढवत आहेत. चिराग अद्यापही जमुईचे खासदार आहेत. त्यातही रंजक म्हणजे मैदानातील कोणताही पक्ष स्वबळावर सरकार बनवण्याच्या स्थितीत नाही.

चुकीचा दावा : मंत्र्यांनी हैदराबादच्या रस्त्याला मुजफ्फरपूर संबोधले
बिहारचे नगरविकास व गृहनिर्माणमंत्री सुरेशकुमार शर्मा यांनी पथदिव्यांचा झगमगाट असलेला एक उड्डाणपुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत ‘मुजफ्फरपूर पथदिवा योजना..मुजफ्फरपूरचे रस्ते उजळले’ अशी कॅप्शन दिली. पडताळणीनंतर ही छायाचित्रे हैदराबादच्या बैरामालगुडा जंक्शनच्या उड्डाणपुलाची असल्याचे दिसून आले.

पहिला टप्पा : रालोआचे ६० टक्के, तर आघाडीचे ५८ % उमेदवार कोट्यधीश
पहिल्या टप्प्यात एकूण ७१ जागांसाठी १०६५ उमेदवार उभे आहेत. त्यात प्रमुख पक्षांचे ३५३ उमेदवारांपैकी १५३ उमेदवार कोट्यधीश आहेत. रालाेआचे ६० टक्के व महाआघाडीचे ५८ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. राजदने सर्वात जास्त २९ कोट्यधीशांना तिकिटे दिली आहेत. त्यानंतर जदयूने २५ व लोजपाने २३ कोट्यधीशांना निवडणूक मैदानात उतरवले. अतरी मतदारसंघातून जदयूच्या उमेदवार मनोरमादेवीदेखील उमेदवारांत सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्यांनी आपली संपत्ती ५३.१९ कोटी नमूद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...