आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहार विधानसभा निवडणुकीत दहशतवाद हा माेठा मुद्दा ठरू पाहत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी वैशालीत एका प्रचार सभेत राजदला टाेला लगावला. राजद सत्तेवर आल्यास काश्मीरमधून पळून आलेल्या दहशतवाद्यांचा बिहार अड्डा हाेईल, असा आराेप राय यांनी केला. त्यावर राजद नेते तेजस्वी यादव यांनी सरकारवर प्रतिहल्ला चढवला. बिहारमध्ये बेरोजगारीचा दर ४६.६ टक्के आहे. बेराेजगारी, गरिबी, उपासमारी व पलायन इत्यादी दहशतीवर त्यांना (नित्यानंद) काही बाेलायचे आहे का ? १५ वर्षांत त्यांच्या डबल इंजिन सरकारने केले तरी काय ? खरे तर जनतेला दिलेल्या आश्वासनापासून पळ काढण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु आम्ही अजेंड्यावर निवडणूक लढवू इच्छिताे, असा टाेला यादव यांनी लगावला. दुसरीकडे भाजपने राय यांच्या विधानाचे समर्थन केले. भाजप दहशतवादाच्या विरोधात कडक कारवाई करत आहे, असे नित्यानंद यांना म्हणायचे आहे. परंतु त्यांच्या विधानाचा विपर्यास केला जात आहे, असे भाजपने राय यांचा बचाव करताना म्हटले आहे. मंत्रिमहाेदयांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपला मुद्दा मांडला हाेता.
सेना, राष्ट्रवादी निवडणुकीच्या तयारीत
शिवसेना यंदा बिहार निवडणुकीत ४० जागांवर उमेदवार उभे करणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. पुढल्या आठवड्यात मी पाटण्याला जाणार आहे. तेथील अनेक स्थानिक पक्ष आमच्याशी चर्चा करू इच्छितात. यात पप्पू यादव यांच्या जन अधिकार पक्षाचाही समावेश आहे. अद्याप फाॅर्म्युला निश्चित नाही, असे राऊत यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारदेखील बिहारमध्ये राजद-काँग्रेससाेबत निवडणूक लढवू इच्छितात.
कलंकित उमेदवार : राजदमध्ये २९, भाजपचे २१ उमेदवार रिंगणात
बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ७१ जागांवर २८ ऑक्टाेबरला मतदान हाेईल. या जागांवर १०६५ उमेदवार उभे आहेत. त्यापैकी माेठ्या राजकीय पक्षांच्या एकूण १६४ उमेदवारांची प्रतिमा डागाळलेली आहे. म्हणजेच हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, बालकांवर अत्याचार, फसवणूक इत्यादी खटल्यांत त्यांची नावे आहेत. त्यापैकी २९ उमेदवार राजदमध्ये आहेत. पक्षाने सर्वाधिक ३८ केसेस असलेले आराेपी अनंत सिंह यांना माेकामा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. भाजप व लाेजपाच्या प्रत्येकी २१ उमेदवारांवर खटले आहेत. कलंकित उमेदवारांत १७ उमेदवारांसह रालाेसपा तिसऱ्या, तर १४ उमेदवारांसह जदयू चाैथ्या स्थानी आहे.
उलथापालथ : जदयूने माजी मंत्र्यांसह १५ जणांची केली हकालपट्टी
जदयूने पक्षविराेधी कारवाई केल्याबद्दल १५ नेत्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. ही माेठी कारवाई मानली जाते. यात माजी मंत्री रामेश्वर पासवान, आमदार ददनसिंह यादव यांचा समावेश आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ट नारायण सिंह यांनी त्यास दुजाेरा दिला आहे. दुसरीकडे राजदने आतापर्यंत विद्यमान १७ आमदारांना यंदा तिकीट नाकारले, तर सहा जणांचे तिकीट कापले. त्यांच्या सध्याच्या जागा आघाडीतील इतर पक्षांना देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.