आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Assembly Election 2020 : Opponents Of Re enacting Article 370 Do Things, It Is An Insult To The Martyrs Of Bihar; Modi Rahul Gandhi Face off For First Time In Bihar Election Campaign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणूक 2020:कलम-370 पुन्हा लागू करण्याच्या विरोधक गोष्टी करतात, हा बिहारच्या शहिदांचा अपमान; बिहार निवडणूक प्रचारात प्रथमच मोदी-राहुल गांधी आमने-सामने

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी 15 हून अधिक मुद्द्यांवरून विरोधकांना घेरले, सहा मुद्द्यांवर राहुल यांचा मोदींवर निशाणा

बिहार विधानसभा निवडणुकीत शुक्रवारी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभा झाल्या. मोदी यांनी सासाराम, गया व भागलपूरमध्ये, तर राहुल गांधी यांनी नवादा व भागलपूरमध्ये सभा घेतल्या. मोदींच्या सभेत मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित होते. मोदींनी कलम ३७० पासून गलवान खोरे-पुलवामामध्ये शहीद झालेल्या बिहारी सैनिकांचा मुद्दा मांडला, तर राहुल यांनी चिनी घुसखोरीवरून मोदींवर टीका केली.

मोदींनी १५ हून अधिक मुद्द्यांवरून विरोधकांना घेरले

कलम ३७० : मोदी म्हणाले, एनडीए सरकारने काश्मीरमधून कलम ३७० संपवले. विरोधकांनी ते पुन्हा लागू करावे असा आग्रह करतात. हा बिहारचे सैनिक, शहिदांचा अवमान नाही का?

राम मंदिर, तीन तलाक : राष्ट्रहिताच्या निर्णयांना काही जण विरोध करतात. तीन तलाक, दहशतवादाविरोधात कारवाया, राम मंदिर, कलम ३७० यावर टीका करणारे बिहारचा विकास करू शकत नाहीत, असा आरोप मोदी यांनी केला.

गलवान : गलवान व पुलवामात शहीद बिहारच्या जवानांना मोदींनी भोजपुरीत श्रद्धांजली अर्पण केली.

राफेल : राफेलच्या मुद्द्यावर मोदी म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्या व एमएसपी ही केवळ बहाणेबाजी आहे. खरेतर विरोधकांना मध्यस्थ व दलालांना वाचवायचे आहे. राफेल लढाऊ विमानाचा सौदा ठरला तेव्हाही हाच प्रकार घडला. या लोकांना देशहिताऐवजी दलालांचे हित महत्त्वाचे वाटते.

इतर मुद्दे : कृषी कायद्यावरून विरोधकांचा होत असलेला विरोध म्हणजे शेतकऱ्यांत गैरसमज पसरवणे आहे, असे मोदी म्हणाले. आता सणवार जवळ आले आहेत. लोकांनी स्थानिक बाजारपेठेतील वस्तू विकत घ्याव्यात. यामुळे आपल्या व्यापाऱ्यांना आर्थिक बळ मिळेल. तेजस्वी यादव यांच्या दहा लाख नोकऱ्यांच्या आश्वासनावर मोदींनी टीका केली. बिहारच्या जनतेने व नितीशकुमार सरकारने कोरोना काळात जी काळजी घेतली त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे ते म्हणाले. बिहारमधील पूर्वीचे जंगलराज आणि आजचे सुरक्षित वातावरण याची तुलना करत मोदींनी नितीश यांचे कौतुक केले.

सहा मुद्द्यांवर राहुल यांचा मोदींवर निशाणा

चिनी घुसखोरी : ज्यांनी गलवान खोऱ्यात बलिदान दिले त्या बिहारच्या तरुणांना मोदी नमन करतात, परंतु चीनच्या घुसखोरीबद्दल खोटे बोलून लष्कराचा अवमान करतात. चिनी कुरापतीमुळे आमचे २० जवान शहीद झाले. १२०० चौरस किमी क्षेत्र चीनने बळकावले. तरीही भारताची जमीन कोणीही बळकावलेली नाही, असे सांगून मोदींनी सैनिकांचा अवमान केला आहे, असे राहुल गांधी म्हणाले

नोकऱ्या : माेदीजी, तुम्ही बिहारींना खरेच नोकऱ्या दिल्या आहेत काय? गेल्या निवडणुकीत पंतप्रधानांनी दोन कोटी नाेकऱ्यांचे आश्वासन दिले होते. नोकरी कुणालाच मिळाली नाही.

अदानी-अंबानी : मजूर, जवान, शेतकऱ्यांसमोर आपण नतमस्तक असल्याचे मोदी सांगतात. पण वेळ येताच अदानी-अंबानींचीच कामे करतात.

नोटबंदी : नोटबंदीमुळे तुम्हाला काही फायदा मिळाला का? असा जाहीर सवाल राहुल गांधी यांनी विचारला. तुमच्या खिशातील पैसा काढून घेऊन पंतप्रधानांनी अदानी-अंबानी यांची कर्जे माफ केली, असे राहुल म्हणाले.

जीएसटी : मोदी यांनी श्रीमंतांसाठी जीएसटी लागू करून सर्व छोट्या व्यापाऱ्यांना संपवले. येत्या काही वर्षांत संपूर्ण देश फक्त दोन-तीन भांडवलदारांच्या हातात राहील.

स्थलांतर : राहुल म्हणाले, कोरोनाची साथ पसरली तेव्हा बिहारच्या सर्व कामगारांना दिल्लीतून पळवून लावले. तेव्हा मोदी यांनी मदत केली नाही. ते मजुरांसमोर झुकतात म्हणजे केवळ नाटकीपणा आहे.