आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bihar Assembly Election : Congress Kept Thinking, We Did; BJP President Nadda's Tola

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार विधानसभा निवडणूक:काँग्रेस विचारच करत राहिली, आम्ही करून दाखवले; भाजप अध्यक्ष नड्डा यांचा टोला

पाटणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाटण्यात नितीशकुमार-नड्डा यांच्यात बैठक, जागावाटपावर चर्चा

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शनिवारी पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली. ही बैठक तासभर चालली. सूत्रांच्या मते, उभय नेत्यांत जागावाटप तसेच जास्त जागांची मागणी करणाऱ्या लोजपच्या नाराजीवरही चर्चा झाली. नड्डा यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद तसेच भाजपच्या इतर नेत्यांचीही उपस्थिती होती.

नड्डा यांच्या उपस्थितीत पाटण्यातून भाजपच्या आत्मनिर्भर बिहार अभियानाची सुरुवातही झाली. याप्रसंगी ते म्हणाले, बिहारचे लोक बाहेर जाऊन देशाचे चित्र पालटू शकतात, मग ते बिहारचे चित्र का बदलू शकणार नाहीत? खरे तर बिहार बदलू लागला आहे यात शंका घेण्याचे कारण नाही. कारण बिहारला भेट देणाऱ्याला ही बाब लक्षात येऊ शकेल. बिहार रालोआ सरकारच्या नेतृत्वाखाली बदलला आहे. देशात २०१४ नंतर राजकीय संस्कृती बदलली, असे सांगून नड्डा यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, पूर्वीचे नेतृत्व म्हणायचे ‘हम देखेंगे, हम सोचेंगे.’ परंतु आजचे नेतृत्व आम्ही करू शकतो, आम्ही करून दाखवतो. देशातील सुमारे ८ कोटी महिलांना गॅसची व्यवस्था देण्यासाठी आधीच्या सरकारला कोणी रोखले होते का? घरोघर वीजपुरवठा करण्यास त्यांना कोणी मनाई केली होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टींची पूर्तता होतेय. सरकारने कोरोनाच्या संकटाचे रूपांतर संधीत बदलले. आत्मनिर्भर बिहार बनवण्यासाठी राज्यातील कृषी मालास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, असे नड्डांनी सांगितले.

टेक ऑफ : दरभंगा विमानतळ सज्ज, २२ जिल्ह्यांना लाभ : पुरी

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीपसिंह पुरी शनिवारी दरभंगाच्या दौऱ्यावर होते. यानिमित्ताने ते म्हणाले, दरभंगा विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले. छठपूजेपूर्वी येथून उड्डाणांचा शुभारंभ होईल. दरभंगा येथून दिल्ली, मुंबई, बंगळुरूसाठी दररोज उड्डाणांचे अॅडव्हान्स बुकिंग सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होईल. उत्तर बिहारच्या २२ जिल्ह्यांसाठी ते वरदान ठरेल.त्यातून लोकांना राेजगाराची संधी मिळेल.

लँडिंग : भाजप सांगेल तेच करू : चिराग पासवान यांची भूमिका

लोजपप्रमुख चिराग पासवान जदयूवर अनेक दिवसांपासून नाराज होते. आता मात्र त्यांचा पवित्रा बदलला आहे. बिहारमध्ये भाजपने जदयूचे नेतृत्व स्वीकारले आहे. म्हणूनच भाजप म्हणेल ते काम आम्ही करणार आहोत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोजप रालोआमध्ये सहभागी झाली होती. तो विश्वास अजूनही आहे. दबावाचे राजकारण करणे ही आमची पद्धत नाही. परंतु चूक झाल्यास निश्चितपणे बोलत राहू.