आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीश कुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट:विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी दिल्लीत जोरदार हालचाली; सुमारे 40 मिनिटे चर्चा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची ही भेट सुमारे 40 मिनिटे चालली. 2024 ची लोकसभा निवडणूक आणि विरोधी पक्ष नेत्यांना एकत्रित आणण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर नितीश म्हणाले की, आपण एकत्र निवडणुका लढलो तर देशाच्या विकासासाठी चांगले होईल. भाजपवाले संपूर्ण देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकजुट होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट हे या संवादाचे प्रमुख कारण आहे. जेणेकरून 2024 मध्ये भाजपचा विजय रथ रोखता येईल.

नितीशकुमार यांनी गेल्या महिन्यात बिहारमध्ये भाजपसोबतची युती तोडून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून विरोधक सातत्याने एकजुटीवर भर देत आहेत. मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही किंवा त्यासाठी इच्छुकही नाही, परंतु भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करणे हे ध्येय, असे नितीश कुमार म्हणाले होते.

नेत्यांच्या भेटी

शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी नितीशकुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांची भेट घेतली होती. तसेच याआधी नितीश कुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचीही भेट झाली होती. तसेच गेल्या सोमवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही नितिश यांनी भेट घेतली होती. शिवाय, मंगळवारी ते दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनाही भेटले होते. यातून देशपातळीवर विरोधी पक्षाचा एकोपा तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...