आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणुक:बिहारची पहिली परीक्षा उद्या; आठ मंत्र्यांसह माजी मुख्यमंत्री मैदानात, पहिल्या टप्प्यातील प्रचार थोफा थंडावल्या

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घोटाळ्यांवरून घमासान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार सोमवारी थांबला. या टप्प्यात २८ ऑक्टोबरला १६ जिल्ह्यांतील ७१ जागांसाठी मतदान होईल. यासाठी ३१ हजार मतदान केंद्रे आहेत. निवडणूक आयोगानुसार, या टप्प्यात १०६६ उमेदवार असून ११४ महिला आहेत. आठ मंत्रीही मैदानात आहेत. सुमारे २,१४,८४,८०० मतदार यांचे भाग्य ठरवतील. या टप्प्यात राज्य सरकारच्या आठ मंत्र्यांसह अनेक दिग्गजही मैदानात आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री जितन राम मांझीही निवडणूक लढवत आहेत. प्रशासनाने नक्षली भागात सुरक्षा वाढवली आहे. पहिल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची सभा एकाच दिवशी असेल. २८ ऑक्टोबरला ही सभा होईल. दरभंगा, मुजफ्फरपूर, पाटण्यात मोदींच्या तर वाल्मीकीनगर आणि कुशेश्वरमध्ये राहुल गांधीच्या सभा होतील.

नितीशकुमारांच्या नेतृत्वात ३० हजार कोटींचे घोटाळे : तेजस्वी
राजद नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी सरकारवर निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात ३० हजार कोटींचे ६० घोटाळे झाले आहेत. बिहारमध्ये कुठलेही काम लाच दिल्याशिवाय होऊ शकत नाही, अशी परंपरा नितीशकुमार यांनी बनवली आहे. या वेळी तेजस्वींच्या हातात कांद्याची माळ होती. ते म्हणाले, भाजपच्या लोकांना कांद्याची माळ घालण्याची सवय आहे. कांद्याचे दर १०० च्या पुढे गेल्यानंतरही भाजप गप्प आहे. तसेच राज्यात बेरोजगारी आणि कुपोषणही वाढत आहे.

जदयू : कुमारांचा पलटवार, काही जण निवडणुकीच्या वेळी खोटे बोलतात
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी महुआमध्ये सभा घेतली. त्यांनी तेजस्वींच्या कुटुंबावर निशाणा साधला. ते म्हणाले, काही लोकांना निवडणुकीच्या वेळी आश्वासन देण्याची आणि खोटे बोलण्याची सवय असते. असे लोक फक्त स्वत:च्या कुटुंबापुरता स्वार्थ साधतात. आधी शिक्षण, आरोग्य अशा कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत. गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. आम्ही गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून कायद्याचे राज्य आणले.

लोजप : चिराग म्हणाले, नितीश यांना घोटाळ्यांची माहिती नाही हे अशक्य
लोजप अध्यक्ष चिराग पासवान यांनी सात निश्चय योजना घोटाळ्यावरून मुख्यमंत्री नितीशकुमारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, नितीशकुमार यांना घोटाळ्याची माहिती नाही, हे अशक्य आहे. मुख्यमंत्री स्वत: या घोटाळ्यांमध्ये सहभागी आहेत. चौकशीत सारे स्पष्ट होईल. सरकारने २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २.७ लाख कोटी रुपयांच्या सात निश्चय योजनेची घोषणा केली होती. यात वीज, शौचालय, सिंचन सुविधा देण्याची तरतूद होती.