आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार निवडणूक:कोरोनानंतर रोजगार मोठा मुद्दा, मात्र महामारी काळातही राजकीय समीकरणे जातीच्या अवतीभवती, मागासवर्गीयांवर सर्वांचेच लक्ष

पटणा / धर्मेंद्रसिंह भदौरिया2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप मोदींच्या, जदयू नितीश यांच्या तर राजद ‘माय’च्या आधारे विधानसभा निवडणुकीच्या तयारीत

पाटण्याहून आरामार्गे सासारामकडे जाताना बाजारपेठा आणि चौकांवर अनेक ठिकाणी निवडणुकीचे फलक लावलेले दिसतात. भाजपच्या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या फोटोंसह केंद्र सरकारची कामगिरी दाखवलेली असते. सत्ताधारी जदयूच्या फलकांवरही मोठा भाग मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या चेहऱ्याने व्यापलेला आहे. तर राजदच्या फलकांवर तेजस्वी यादव यांच्या मोठ्या फोटोसह बीपीएलमुक्त बिहारचे आश्वासन केलेले आहे. या फलकांकडे व्यवस्थित बघितल्यास बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीचे मुद्दे आणि चेहरे स्पष्ट होतात. यंदाही बिहारमध्ये जातीय समीकरणे अत्यंत महत्त्वाची ठरतील. तसेच मतांच्या धुव्रीकरणासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणारे सांप्रदायिक कार्ड अद्याप बाहेर काढलेले नाही.

बिहारमध्ये सध्या राजकीय पक्ष व्हर्च्युअल संवाद, पोस्टर्सच्या माध्यमातून आपले मुद्दे कार्यकर्ते आणि मतदारांना समजावण्यामध्ये व्यग्र आहेत. मात्र राजकारण कोरोनाच्या अवतीभोवती फिरत आहे. पाटण्यातील कंकरबागमध्ये राहणारे पदव्युत्तर शिक्षण घेणारे राजेश रंजन सांगतात, कोरोना काळात रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पक्षालाच आम्ही मतदान करू. ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक सुरेंद्र किशोर सांगतात की, विधानसभा निवडणुकीत सर्वात महत्त्वाची भूमिका जातीय समीकरणांची असेल. पक्षांकडून हक्काच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. युवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध मुद्दे उपस्थित केले जातील. राजदकडून कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उचलला जाऊ शकतो. दुसरीकडे भाजपकडून गावातील घराघरात धान्य आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचा फायदा उचलला जाऊ शकतो. लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीतील ही पहिली निवडणूक असेल.

राजदचा ‘माय’ मजबूत करण्यावर भर, जदयूचे मागासवर्गीयांवर लक्ष
बिहारमध्ये राजकीय समीकरणे निवडणुकीवर आधारित आहेत. राजद आपले माय ( मुस्लिम आणि यादव) समीकरण मजबूत करण्यावर भर देईल, तर तेजस्वी यादव तरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षणाला धोका असल्याचे सांगत राजद मागासवर्गीयांना आपल्याकडे वळवत आहे. भाजपकडून सवर्ण मतदारांना आकर्षित केले जात आहे. सवर्णांना १० टक्के आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. जदयूचा दलित मतांवर डोळा असेल.

घरी परतलेल्या मजुरांना काम हवे
सासाराम येथील स्थलांतरित मजूर महेंद्र चौधरी सुरतमध्ये साडी मशीनचे काम करायचे. ते निवडणुकीबाबत सांगतात की, सरकारने कोरोना काळात अन्नधान्याची सोय केली. मात्र अजून रोजगार मिळालेला नाही. रोजगाराशिवाय जीवन कसे सुरळीत होईल? मत कुणाला देणार हे विचारल्यावर मत कुणाला द्यायचे हे मतदानाच्या वेळीच ठरवू, असे ते म्हणाले. तसेच जिल्ह्यातील आलमपूर गावातील गोरखनाथ सिंह सांगतात, निवडणुकीत कोरोनाचा मुद्दा आहे. विकास आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दाही महत्त्वाचा असेल. जातींची भूमिका महत्त्वाची ठरेल. उमेदवार निश्चित झाल्यावर आम्ही मत कुणाला देणार हे ठरवू. उमेदवाराची जातही बघू.

बातम्या आणखी आहेत...