आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा16 जानेवारी 2023. पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या यूएई दौऱ्यातील एका मुलाखतीत म्हणाले - मोदीजी, या बसूया, काश्मीरवरही चर्चा करूया.
याच दिवशी लष्करचा अतिरेकी अब्दुल रहमान मक्कीच्या नावाची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जागतिक दहशतवादी म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी पाकचा जवळचा मित्र चीननेही कोणता अडथळा आणला नाही.
या 2 घटनांनंतर एका आठवड्याने 25 जानेवारी रोजी भारताने पाक परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांना SCO बैठकीला येण्याचे निमंत्रण पाठवले. पाकने ते मान्य केले. त्यानुसार, बिलावल भुट्टो गुरुवारी 4 मे रोजी भारतात पोहोचले.
बिलावल भुट्टो डिसेंबर 2022 पर्यंत पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करत होते. पण गत 5 महिन्यांत असे काय घडले की, ज्यामुळे भारत -पाक संबंध रुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली? यात UAE ची काय भूमिका? दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे...
डिसेंबर 2022 पर्यंत भारत-पाकमध्ये चर्चेची शक्यता नव्हती
15 डिसेंबर 2022 रोजी, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर UNSC मध्ये म्हणाले, 'जो देश अल-कायदाचा नेता ओसामा बिन-लादेनचा यजमान असू शकतो व आपल्या शेजारच्या देशाच्या संसदेवर हल्ला करू शकतो, त्याला UN मध्ये धर्मोपदेशक बनण्याची कोणतीही गरज नाही.'
एक दिवसानंतर, 16 डिसेंबर 2022 रोजी, पाक परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी न्यूयॉर्कमध्ये UNSC च्या निमित्ताने म्हणाले, 'ओसामा बिन लादेन यमदसनी पोहोचला. पण गुजरातचा कसाई अजून जिवंत आहे. तो भारताचा पंतप्रधान आहे. तो पंतप्रधान नव्हता तोपर्यंत त्याच्यावर अमेरिकेत येण्याची बंधी होती.
म्हणजेच डिसेंबर 2022 ची ही दोन्ही विधाने स्पष्टपणे दर्शवत आहेत की, त्यावेळी दोन्ही देशांमध्ये तणाव होता. चर्चेची सूतराम शक्यता नव्हती.
16 जानेवारीच्या 2 घटनांवरून संबंध रुळावर येण्याची शक्यता
पहिली घटना : शरीफ म्हणाले- मोदीजी, चला बसूया, काश्मीरवरही बोलू
भारत - पाकमधील संबंध टोकाला पोहोचला असताना 16 जानेवारी 2023 रोजी पाक पंतप्रधान शाहबाज यांची मुलाखत आली. UAE च्या अल अरेबिया वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरीफ म्हणतात - मी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांना भारत-पाकमध्ये समेट घडवून आणण्याची विनंती केली आहे.
ते पाकचे मित्र असून, भारताशीही त्याचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते दोन्ही देशांमध्ये चर्चा घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
शाहबाज म्हणाले, 'मी भारताशी पूर्ण जबाबदारीने बोलण्याचा शब्द दिला आहे. आम्ही भारताशी 3 युद्धे केली. त्यामुळे जनतेला केवळ गरिबी, बेरोजगारी मिळाली. आम्ही आमचा धडा घेतला आहे. आम्हाला शांततेत जगायचे आहे. मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा संदेश द्यायचा आहे की, आपण एकत्र बसू व काश्मीरवरही बोलू.
दुसरी घटना : लष्करचा अतिरेकी जागतिक दहशतवादी घोषित, चीनची आडकाठी नाही
लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अब्दुल रहमान मक्की याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावेळी पाकचा सर्वात मोठा शुभचिंतक व जवळचा मित्र चीनने कोणताही अडथळा आणला नाही.
एवढेच नाही तर दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असल्याचे सांगत खुद्द चीननेच आपले पाऊल स्पष्ट केले. यापूर्वी 2022 मध्ये चीनने मक्कीसह पाकच्या 5 अतिरेक्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित होण्यापासून वाचवले होते.
त्यानंतर भारताचे पाक परराष्ट्र मंत्री बिलावल यांना निमंत्रण
19 जानेवारी रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारताला पाकशी नेहमीच सौहार्दाचे संबंध हवे आहेत. पण अशा संबंधांसाठी दहशत व हिंसामुक्त वातावरण असणे क्रमप्राप्त आहे. अशा चर्चेसाठी शांततेचे वातावरणही हवे. हा आमचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे.
त्यानंतर, 25 जानेवारी रोजी भारताने पाक परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांना SCO बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांमार्फत हे निमंत्रण पाठवले होते.
SCO मध्ये भारत-पाक या 2 देशांशिवाय चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान व उझबेकिस्तानचा समावेश आहे. या बैठकीसाठी चीन व रशियासह इतर मध्य आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे भारताने पाक परराष्ट्रमंत्र्यांना निमंत्रण पाठवणे हे एक साधारण पाऊल वाटत असले तरी, ते तसे निश्चितच नव्हते.
UAE च्या प्रयत्नांमुळे भारत-पाक संबंधात सकारात्मक सुधारणा
14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरच्या पुलवामात झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकच्या बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केली. त्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो.
5 ऑगस्ट 2019 रोजी, भारताने कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. 2019 मध्ये घडलेल्या या 3 घटना होत्या, ज्यामुळे भारत-पाक संबंध बिघडले होते.
पाकचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पूर्ववत होईपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर भारतानेही दहशतवाद्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत चर्चेचा प्रश्नच येत नसल्याची आपली भूमिका स्पष्ट केली होती.
त्यानंतर अवघ्या 2 वर्षांतच 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत-पाकमध्ये शस्त्रसंधी जारी झाली. दोन्ही देशांतील डीजीएमओ स्तरीय चर्चेनंतर हा करार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यावेळी ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला होता की, युनायटेड अरब अमिराती म्हणजेच यूएईने भारत-पाकच्या अधिकाऱ्यांमध्ये शस्त्रसंधीसाठी एका गुप्त चर्चेचे आयोजन केल्याचे म्हटले होते.
शस्रसंधीच्या निर्णयाचे स्वागत करणारा यूएई हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश असल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते. एवढेच नाही तर या कराराच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी 26 फेब्रुवारी रोजी UAEचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान अचानक नवी दिल्लीच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले होते.
ही भेट दोन्ही देशांतील संबंध अधिक बळकट करण्यासाठी असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यूएईचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची त्यांच्या 2 दिवसीय अबुधाबी दौऱ्यात भेट घेतली. त्यानंतर पाक परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशींनीही याच महिन्यात त्यांची भेट घेतली.
शस्त्रसंधीच्या घोषणेपूर्वी 2 आठवडे अगोदर UAE च्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
त्यात त्यांनी प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. तत्पूर्वी, काही दिवस अगोदर भारताने इम्रान खान यांच्या विमानाला श्रीलंकेला जाण्यासाठी भारतीय हवाई हद्द वापरण्याची परवानगी दिली होती.
यावेळीही पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यूएईच्या दौऱ्यातच भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव दिला.
भारताने आतापर्यंत केव्हाही UAE चा मध्यस्थीचा प्रस्ताव स्वीकारला नाही. काश्मीर प्रश्नी कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आपल्याला मान्य नाही, अशी भारताची भूमिका अधिकृत भूमिका आहे.
गत 5 महिन्यांच्या घडामोडींवर तज्ञ काय म्हणतात?
परराष्ट्र व्यवहार तज्ञ व जेएनयूचे प्राध्यापक राजन जोशी यांच्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ यांची भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करणारी विधाने विधान असो, एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाक परराष्ट्र मंत्र्यांना पाठवलेले भारताचे निमंत्रण असो किंवा SCO शिखर परिषदेसाठी बिलावलचे गोव्यात झालेले आगमन असो...
या दोन्ही स्थितींत भारत-पाक संबंध रुळावर येण्याची शक्यता आहे. याचे एक भक्कम कारण म्हणजे पाकची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. पण दोन्ही देशांनी चर्चेसाठी एका व्यासपीठावर येणे एवढे सोपे नाही. तसेच या संबंधांतून दहशतवादाला आळा घालणेही तूर्त शक्य नाही. याची 2 कारणे आहेत...
1. पाक सरकारमध्येच भारताशी चर्चा करण्याच्या मुद्यावर मंत्री व संसद सदस्यांत मतभेद आहेत.
2. पाकिस्तानात सरकारशिवाय लष्कराची भूमिका महत्त्वाची असते. दोन्ही देशांतील संबंधांवर लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही.
त्यामुळे शाहबाज यांचे विधान व बिलावल भुट्टो यांचा एससीओ परिषदेतील सहभाग याकडे केवळ संबंध सुधारण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले पाहिजे.
जेएनयूमधील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक एके महापात्रा म्हणतात की, एससीओचा यजमान देश असल्याने भारताने पाक परराष्ट्र मंत्र्यांना निमंत्रण पाठवले. पाक देखील SCO चा सदस्य असल्याने, नवी दिल्लीचीही कोणते वाईट संकेत द्यायचे नव्हते.
एससीओबाहेर जोपर्यंत भारत-पाकमध्ये संवाद होत नाही, तोपर्यंत संबंधांमध्ये प्रगती होण्याची अपेक्षा करता येत नाही, असे ते म्हणाले. महापात्रा म्हणाले – मला सध्या फारसे आशादायक चित्र दिसून येत नाही.
पण यामुळे दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. ते म्हणाले की, इस्लामाबादसोबतच्या चर्चेतील मुख्य अडसर म्हणजे सीमेपलीकडे दहशतवादाला असणारा पाठिंबा आहे. या मुद्यावर भारत अजिबात तडजोड करणार नाही.
भारताचे माजी राजदूत सुधीर देवरे म्हणतात की, पाक परराष्ट्र मंत्री अनेक वर्षांनंतर भारतात आलेत. त्यामुळे माध्यमांत उत्साहाचे वातावरण आहे. पण मला अशी कोणतीही आशा नाही, कारण सध्या पाकची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. राजकीय स्थितीही स्थिर नाही.
बिलावल बहुपक्षीय बैठकीसाठी भारतात आलेत. असे असतानाही पाकमध्ये त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याने दोन्ही देशांच्या संबंधात काही फरक पडेल की नाही हे सांगणे फार कठीण आहे.
संरक्षण तज्ज्ञ सेवानिवृत्त कॅप्टन अनिल गौर म्हणतात की, भारतासोबतचे संबंध सुधारल्याशिवाय पाकला भविष्य नाही. भारताकडून स्वस्त वस्तू मिळवण्यासाठी पाकला द्विपक्षीय संबंध सुधारावे लागतील. दहशतवादाची निर्यात थांबवावी लागेल. व्यापार व इतर गोष्टींमध्ये भारताच्या मदतीशिवाय पाकचा निभाव लागणे अवघड आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.