आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिल्किस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, न्यायाधीश न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांनी बिल्किसच्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठातून स्वत:ला वगळले आहे. आता दुसऱ्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. बिल्किसने 11 सामूहिक बलात्काराच्या दोषींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या होत्या. ज्यामध्ये न्यायालयाच्या 13 मेच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या आदेशात सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, गँगरेपच्या दोषींच्या सुटकेसाठी 1992 मध्ये बनवलेले नियम लागू होतील. त्याआधारे 11 दोषींची सुटका करण्यात आली.
बिल्किस यांनी दाखल केल्या दोन याचिका
रिपोर्ट्सनुसार, बिल्किस बानो यांनी कोर्टात दोन याचिका दाखल केल्या होत्या. पहिल्या याचिकेत 11 दोषींच्या सुटकेला आव्हान देत त्यांना त्वरित तुरुंगात पाठवण्याची मागणी केली होती. त्याचवेळी, दुसऱ्या याचिकेत मे महिन्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटले होते की, दोषींच्या सुटकेचा निर्णय गुजरात सरकार घेईल. बिल्किस म्हणाल्या की, महाराष्ट्रात या खटल्याची सुनावणी सुरू असताना गुजरात सरकार निर्णय कसा घेऊ शकते?
गोध्रानंतरच्या दंगलीत झाला होता गँगरेप
गोध्रा हत्याकांडानंतर 3 मार्च 2002 रोजी गुजरातमध्ये दंगली उसळल्या. दंगलीदरम्यान दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात संतप्त जमावाने बिल्किस बानोच्या घरात घुसखोरी केली. दंगलखोरांपासून वाचण्यासाठी बिल्किस त्यांच्या कुटुंबासह शेतात लपल्या. तेव्हा बिल्किस 21 वर्षांच्या होत्या आणि त्या 5 महिन्यांच्या गर्भवती होत्या. दंगलखोरांनी बिल्किसवर सामूहिक बलात्कार केला. त्यांची आई आणि तीन महिलांवरही बलात्कार झाले.
या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील 17 पैकी 7 जणांचा मृत्यू झाला होता. 6 लोक बेपत्ता असल्याचे आढळले, जे कधीही सापडले नाहीत. या हल्ल्यातून फक्त बिल्कीस, एक पुरुष आणि एक तीन वर्षांचा मुलगा बचावला.
जानेवारी 2008 मध्ये CBIच्या विशेष न्यायालयाने ठोठावली होती शिक्षा
घटनेच्या वेळी बिल्किस 21 वर्षांच्या आणि गर्भवती होत्या. दंगलीत त्यांच्या कुटुंबातील 6 सदस्य जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाले. गँगरेपच्या आरोपींना 2004 मध्ये अटक करण्यात आली होती. जानेवारी 2008 मध्ये CBIच्या विशेष न्यायालयाने 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा कायम ठेवली होती.
आरोपींना प्रथम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणि नंतर नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. तब्बल 9 वर्षांनंतर या सर्वांना गोध्रा सबजेलमध्ये पाठवण्यात आले.
बिल्किसचे पती म्हणाले- या निर्णयाने आम्ही खचलो
दोषींच्या सुटकेवर बिल्किस यांचे पती याकूब रसूल म्हणाले, 'ज्यांनी बिल्किसवर सामूहिक बलात्कार केला, माझ्या 3 वर्षांच्या मुलीला आदळून मारून टाकले, माझ्या कुटुंबातील सात जणांची हत्या केली, त्यांना सरकार कसे सोडू शकते, हा विचार करूनच आम्ही घाबरलो आहोत. या निर्णयामुळे बिल्कीसचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. ती कोणाशी बोलत नाही. ती काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.