आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकीय यशाच्या बाबतीत, २०१८-१९ मध्ये भाजपने शिखर गाठले. या काळात २१ राज्यांमध्ये भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता होती. मात्र, आता केवळ १५ राज्यांमध्ये सरकारे आहेत. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या. १९८४ नंतर कोणत्याही पक्षाने मिळवलेल्या सर्वाधिक जागा होत्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला ४२७ जागा मिळाल्या होत्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरात (२६), राजस्थान (२५), दिल्ली (७), उत्तराखंड (५), हिमाचल (४), त्रिपुरा (२) आणि हरियाणा (१०) मधील सर्व जागा जिंकल्या. कर्नाटकात २८ पैकी २५, मध्यप्रदेशात २९ पैकी २८, बिहारमध्ये जदयू व लोजपाबरोबर ४० पैकी ३९, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत ४८ पैकी ४१, यूपीमध्ये ८० पैकी ६४, झारखंडमध्ये १४ पैकी १२ आणि छत्तीसगडमध्ये ११ पैकी ९ जागा भाजपला मिळाल्या.
जवळपास १५ राज्ये अशी आहेत जिथे लोकसभा निवडणुकीत भाजप विजयाच्या शिखरावर पोहोचले आहे. मात्र, महाराष्ट्रातून शिवसेना आणि बिहारमधून जेडीयू वेगळे झाल्याने भाजपला मागील यशाची पुनरावृत्ती करणे कठीण होणार आहे. या राज्यांतील नुकसानीचा सामना करण्यासाठी भाजपला पाच राज्यांतून (बंगाल, बिहार, तेलंगणा, महाराष्ट्र आणि ओडिशा) जागा वाढवणे अपेक्षित होते. कर्नाटकातील पराभवाने दक्षिणेत धक्का बसला आहे. नवीन पटनायक ओडिशात आतापर्यंत अजिंक्य आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांबरोबरच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पटनायक पुन्हा सत्तेत आले. भाजपची लाट असूनही पक्षाला राज्यातील २१ पैकी ९ जागा जिंकता आल्या. दुसरीकडे, बिहार आणि झारखंडमधील महागठबंधन आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी एकत्र राहिल्यास या राज्यांमध्येही भाजपला आपल्या जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे कठीण जाईल. भाजपला सर्वात मोठी आशा पश्चिम बंगाल आणि तेलंगणामधून आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये ४२ पैकी १८ आणि तेलंगणात १७ पैकी ४ जागा जिंकल्या होत्या. बंगालमध्ये भ्रष्टाचार आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत आहे. तेलंगणातही भ्रष्टाचारावर केसीआरला घेरून टोकाच्या हिंदुत्वाच्या वाटेवर पुढे जात आहे. मात्र, कर्नाटकच्या निकालामुळे भाजपला रणनीतीचा फेरविचार करावा लागू शकतो. आतापर्यंत काँग्रेस आघाडीपासून दूर ममता बॅनर्जी या काँग्रेस सोबत आल्या, तर भाजपलाही तेथे पाय रोवणे कठीण होईल.
राज्यांच्या निकालांचा मानसिक प्रभाव : छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्येही या वर्षी डिसेंबरपर्यंत निवडणुका होणार आहेत. राज्यांच्या निकालांचा लोकसभा निवडणुकीवर थेट परिणाम होत नाही, पण निकाल भाजपच्या बाजूने लागला नाही तर त्याचा मानसिक प्रभाव होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.