आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर भूमिपूजन:'शरद पवार तर रामद्रोही', पवारांच्या 'त्या' विधानाचा भाजप नेत्या उमा भारतींनी घेतला समाचार

भोपाळ2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर केलेल्या वक्तव्यावरुन भाजप नेत्या उमा भारती यांनी पवारांवर निशाना साधला आहे. ' काही लोकांना राम मंदिर बांधून कोरोना कमी होईल असे वाटत असेल, तर हरकत नाही,' असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. या विधानावरुन त्यांचा थेट निशाना पंतप्रधान मोदींवर होता.  यावरुन आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती म्हणाल्या की, ' हे वक्तव्य मोदींविरोधी नाही, तर भगवान रामविरोधी आहे.' 

'राम द्रोही' आहेत शरद पवार

उमा भारती आज मध्यप्रदेशातील सीहोरच्या प्राचीन गणेश मंदिरात आल्या होत्या. येथे त्यांनी गणेशाची विधीवत पुजा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना उमा भारती यांनी शरद पवारांवर 'रामद्रोही' असल्याचा आरोप केला. यावेळी त्या म्हणाल्या की, 'पवारांचे विधान मोदींविरोधातील नाही, तर भगवान रामांविरोधातील आहे. पंतप्रधान मोदी दोन तासांसाठी भूमिपूजनाच्या कार्यक्रमला गेले, तर कोणती अर्थव्यवस्था बुडणार आहे? पंतप्रधान दिवसातून फक्त चार तास झोपतात, इतर वेळी ते आपले काम इमानदारीने करतात. जर भगवान रामांसाठी त्यांनी दोन तास दिले, तर काही बिघडणार नाही', असे मत उमा भारती यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

कोरोनाला प्राधान्य हवे. भाजपवाल्यांना राम मंदिर बांधून कोरोना कमी होईल असे वाटत असेल तर हरकत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. देशभरात एकीकडे कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार आहेत. यासंदर्भात पवारांना छेडले असता त्यांनी ही मार्मिक टिप्पणी केली.

अयोध्या आणि शिवसेनेचे राजकीय नातं नाही- संजय राऊत

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले का, याची चर्चा रंगली आहे. मात्र सध्या फक्त तारीख जाहीर झाली आहे. राजकीय सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कार्यक्रम कसा करता येईल, यावर निर्णय घेतला जाईल.''

पुढे बोलताना ते म्हणाले की, ''अयोध्या आणि शिवसेनेचे राजकीय नाते नाही. उद्धव ठाकरे नेहमीच रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जातात. जेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यावरही गेले होते. राजकारणासाठी आम्ही अयोध्येत जात नाही. राम मंदिराचा पूर्ण रस्ता शिवसेनेने तयार केलेला आहे. मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे होते ते शिवसेनेने दूर केले. राजकारण म्हणून नाही, तर श्रद्धा, हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिले. ते आमचे नातं कायम आहे” असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...