आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या दौरा:बृजभूषण शरण सिंह समर्थकांची राज ठाकरेंविरोधात रॅली, माफी मागा अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू न देण्याचा इशारा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजप आणि मनसेत वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांची माफीशिवाय राज ठाकरे यांना प्रवेश नाही, अशी भूमिका घेतली आहे. यातच सिंह यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात आज नंदिनी नगर येथे रॅली काढत उघड आव्हान दिले आहे. यावेळी बृजभूषण सिंह यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. 'राज ठाकरे दबंग नहीं, चूहा है, अपने बिल में रहता है' (राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत) अशी घोषणाबाजी ठाकरेंविरोधात सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे राज ठाकरे हे उत्तर प्रदेशात गेल्यास त्यांचा भाजप खासदारासोबत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मानतो. हा आमच्या अस्मितेशी लढा आहे. राज ठाकरेंनी माफी मागावी. जर आज माफी मागितली नाही बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आयुष्यात कधीही येता येणार नाही. माझा विरोध मराठी माणसांशी नाही. ज्या व्यक्तीने उत्तर प्रदेशातील लोकांना त्रास दिला त्याने माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येऊ नये. राज ठाकरेंनी माफी मागावी. हीच ती वेळ आहे. यापुढे यूपीतील लोकांना त्रास देणार नाही असे सांगावे, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.

राज ठाकरे यांना रोखण्यासाठी बृजभूषण शरण सिंह हे मंगळवारी गोंडा येथे ऋषी-संतांची मोठी परिषद घेत आहेत. यात राज ठाकरेंना रोखण्याबाबत चर्चा होणार आहे. या परिषदेला अयोध्येतील साधू-संतही उपस्थित राहू शकतात, असे सांगण्यात येत आहे. या परिषदेत उत्तर भारतीयांविरोधात केलेले वक्तव्य मागे घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

माफीनंतरच अयोध्येत प्रवेश

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना यापूर्वीही इशारा देण्यात आला आहे. राज यांना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही. त्यांनी आधी हात जोडून सर्व उत्तर भारतीयांची माफी मागावी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊ नये, असे आवाहनही खासदार बृजभूषण यांनी केले आहे.

मनसेकडून अयोध्या दौऱ्याची तयारी -
राज 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत म्हणून मनसैनिक मोठ्या प्रमाणावर तयारीला लागले आहेत. मनसेकडून मुंबईत 'अयोध्या चलो'चे पोस्टर लावण्यात आले आहेत. मनसे कार्यकर्त्यांकडून ठिकठिकणी अयोध्या दौऱ्यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात येत आहेत. अशामध्ये दादरच्या शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोरच मनसेने अयोध्या दौऱ्याचे बॅनर लावले आहे. मनसेच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा भगवाधारी फोटो पाहायला मिळत आहे. या बॅनरवर ‘राज तिलक की करो तैयारी, आ रहे है भगवाधारी’ असे लिहिण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...