आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेसाठी भाजपला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले -स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाऱ्या राजकीय पक्षांत सध्या हिंदुत्वावरुन स्पर्धा रंगली आहे. त्याचे फळ भारतीय मुस्लिमांना भोगावे लागत आहे. महाराष्ट्रात सध्या मुस्लिमविरोधी वातावर तयार केले जात असून, याला भाजप जबाबदार आहे.
राज ठाकरेंची रविवारी औरंगाबादेत सभा झाली. या सभेद्वारे त्यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला 4 तारखेपर्यंतच अल्टिमेटम दिला. याविषयी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना छेडले असता त्यांनी राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते नांदेडमध्ये बोलत होते.
ते म्हणाले -महाराष्ट्रातील घटनाक्रम भाजपने पसरवलेल्या द्वेषाच्या राजकारणाचे फळ आहे. राज्यात सध्या मुस्लिम विरोधी वातारवण तयार केले जात आहे. यासाठी भाजप जबाबदार आहे. या प्रकरणी भाजप स्वतः न्यायाधीश बनली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यंमत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आदी नेत्यांनी मुस्लिमांची घरे पाडण्याचे ठरवले, तर आम्हाला न्यायालय किंवा पोलिसांची गरजच भासणार नाही. भाजपच्या नेतृत्वात देशातील मुस्लिमांना सामूहिक शिक्षा दिली जात आहे, असे ते म्हणाले.
हिंदुत्वावरुन राजकीय पक्षांत स्पर्धा
स्वतःला निधर्मी समजणाऱ्या राजकीय पक्षांत सध्या हिंदुत्वावरुन कमालीची स्पर्धा रंगली आहे. आज सर्वच राजकीय पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी सिद्ध करण्यात व्यस्त आहे. त्याचे फळ मुस्लिम समुदायाला भोगावे लागत आहे. सध्या देशात संविधानाविरोधात बोलले जात आहे. देशात कायद्याचे नव्हे तर बुलडोझरचे सरकार आले आहे, असेही ओवैसी यावेळी म्हणाले.
वेळ पडल्यास औरंगाबादेत सभा
देशातील मुस्लिमांवर अत्याचार सुरू असताना कोणताही पक्ष त्यावर बोलण्यास तयार नाही. यात काँग्रेसचाही समावेश आहे. आम्हाला द्वेषाचे राजकारण करायचे नाही. पण, वेळ येईल तेव्हा मी औरंगाबादसह नाशिक, परळी, लातूर, मालेगाव, धुळे आदी सर्वच शहरांत सभा घेईल, असेही ओवैसी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
समान नागरी कायद्याला विरोध करताना यावेळी त्यांनी प्रथम संविधानातील तरतुदींची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. समान नागरी कायदा लागू करण्यापूर्वी देशातील सर्वच नागरिकांचे एकसमान उत्पन्न होईल याची काळजी सरकारने घ्यावी. देशाच्या नैसर्गिक संसाधनांवर सर्वांचा समान अधिकार असावा, असे ते म्हणाले.
इम्तियाज जलील यांचीही टीका
एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनीही या प्रकरणी मनसेवर टीका केली. भाजपच्या निर्देशांनुसार राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा काढला. भोंग्याच्या मुद्यावर राज ठाकरे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देतात. हे आम्हालाही मान्य आहे. पण, अंमलबजावणी कुणी केली नाही. 2014 पासून आजपर्यंत देशात भाजपचे सरकार आहे. राज ठाकरे याविषयी भाजपला सवाल का करत नाहीत? असे जलील म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.