आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP's Demand For Immediate Implementation Of President's Rule In The State, Parambir's Letter Bomb Was Rejected By Pawar

संसदेत हंगामा:राज्यात तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी, परमबीर यांचा लेटरबाॅम्ब पवारांनी केला निकामी

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 कोटींचा प्रश्न : आघाडी सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा : भाजप

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकामी केला. परमबीर यांनी पत्रामध्ये केलेल्या दाव्यानुसार गृहमंत्री आणि सचिन वाझे यांची फेब्रुवारीच्या मध्यात भेट झाली होती. परंतु या कालावधीत अनिल देशमुख हे नागपुरात कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे परमबीर यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून देशमुख यांच्या राजीनाम्याची आ‌वश्यकता नाही, असे पवारांनी ठामपणे सांगितले.

पवारांची राष्ट्रवादी आणि आघाडी सरकारला वाचवण्याची कसरत सुरू असताना परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, परमबीर यांच्या आरोपांमुळे सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला.

गृहमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपच्या नेते, खासदारांनी केली आहे. लोकसभा व राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात गदारोळ झाला. राज्यसभेत दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.

१०० कोटींचा प्रश्न : आघाडी सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा : भाजप
नवी दिल्ली | गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांचा हप्ता गोळा करण्यास सांगितल्याच्या आयपीएस अधिकारी परमबीरसिंग यांच्या आरोपावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप खासदारांनी लोकसभेत केली. खासदार गिरीश बापट, पूनम महाजन, नवनीत राणा, उदय कोटक, कपिल पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करून खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.
राज्यसभा तहकूब : राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होताच सत्ताधारी भाजप सदस्यांनी महाराष्ट्राचा मुद्दा लावून धरला. या वेळी उपाध्यक्ष हरिवंश यांनी यासंबंधीचा मुद्दा रेकॉर्डवर येणार नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतरही सत्ताधारी सदस्यांना वारंवार विनंती करूनही गोंधळ सुरूच राहिला. अखेर कामकाज दहा मिनिटांनंतर २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

रात्रीतून पवारांचा यू टर्न
गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी याबाबत निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांनी स्वत:च पत्रकार परिषद बोलावून देशमुखांवरील आरोप फेटाळले. ते म्हणाले, फेब्रुवारीच्या मध्यात महिन्याला १०० कोटी वसुलीच्या सूचना गृहमंत्री यांच्याकडून देण्यात आल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्रे आहेत. त्यावरून ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत देशमुख रुग्णालयात होते. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याची नोंद आहे. १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत ते घरी विलगीकरणात होते. मग देशमुख यांनी सचिन वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचे परमबीर कशाच्या आधारावर सांगत आहेत? त्यामुळे त्यांच्या आरोपात काहीही तथ्य दिसत नाही.

आता उपलब्ध झालेल्या कागदपत्रावरून देशमुख हे मुंबईत नव्हतेच. ते नागपूरला होते आणि कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सरळ सरळ उघड झाले आहे. त्यामुळे चौकशीचा आणि देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. गृहमंत्री मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले असेही लिहिले आहे. मात्र आमची भेट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात झाली होती, असे सांगत परमबीर हे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गप्प का होते? ते आरोपासाठी महिनाभर का थांबले होते ? असा उलटा प्रश्न पवार यांनी केला.
मुख्य गुन्ह्याबाबत सत्य हळूहळू बाहेर येईल : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी आढळणे मुख्य गुन्हा आहे. संबधित गोष्टी अंबानीच्या घराखाली गाडीत कशा आल्या, हे महत्वाचे आहे. काल (रविवारी) एटीएसने हिरेन मृत्युप्रकरणी दोघांना अटक केली आहे. अंबानी यांंच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी कुणी व का ठेवली याबाबतचे सत्य परमबीर यांंच्या आरोपानंतर दुर्लक्षित होत होते. त्याबाबत आता चौकशी होत आहे. हळूहळू सत्य बाहेर येईल, असा दावा पवार यांनी केला.

गृहमंत्र्यांच्या चौकशीचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घ्यावा
परमबीरसिंग यांच्या पत्रानंतर निर्माण झालेला वाद हा राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा कट असल्याचे पवार म्हणाले. तसेच गृहमंत्री यांच्यावरील आरोपप्रकरणी कोणती व कशी चौकशी करावी याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्र्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करा : परमबीर
मुंबई पोलिस आयुक्तपदावरून झालेली बदली बेकायदा असून बदलीचे आदेश रद्द करण्यात यावे; परंतु तोपर्यंत बदलीस तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी विनंती परमबीर यांनी याचिकेत केली आहे. तसेच गृहमंत्र्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याचे आदेश राज्य, केंद्र सरकार आणि सीबीआयला देण्यात यावे, अशी मागणी परमबीर यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप, देशमुखांचा खुलासा
देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पवारांच्या विधानातील विरोधाभास दर्शवून दिला. १५ फेब्रुवारी रोजी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली होती, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर स्वत: देशमुख यांनीच खुलासा केला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाबाहेर येताच प्रसारमाध्यमांनी घेरले होते म्हणून आपण बोललो, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...