आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • BJP's Satelote With WhatsApp; Rahul Gandhi's Allegation After The News Of Another American Newspaper

हेट स्पीच प्रकरण:भाजपचे व्हॉट्सअॅपशी साटेलोटे; अमेरिकेच्या आणखी एका वृत्तपत्राच्या बातमीनंतर राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दावा काय : ‘भाजप-फेसबुक संबंधांमुळे भारतात हेट स्पीचविरोधी लढाईत अडचणी’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भाजपवर निशाणा साधला. अमेरिकेच्या ‘टाइम’ने भाजप व व्हॉट्सअॅप यांच्यात साटेलोटे असल्याचा दावा केला आहे. ४० कोटी भारतीय व्हॉट्सअॅपचा वापर करतात. आता व्हॉट्सअॅपला पैशांच्या मोबदल्याची अपेक्षा आहे. त्यासाठी मोदी सरकारच्या परवानगीची गरज आहे. त्यामुळेच भाजपच्या मुठीत व्हाॅट्सअॅप आले आहे, असे ट्वीट राहुल यांनी केले. सोबत “टाइम’मध्ये प्रकाशित बातमीचे कात्रणही पोस्ट केले आहे. दुसरीकडे काँग्रेसने या प्रकरणात फेसबुक सीईआे मार्क झुकेरबर्गला दुसऱ्यांदा पत्र पाठवले आहे. पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल पत्रात म्हणतात, भाजप व फेसबुक इंडिया परस्परांना लाभ देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पक्षपाताच्या पुराव्याची माहिती उजेडात आली आहे. पत्रात १७ ऑगस्टला पाठवलेल्या पत्राचादेखील उल्लेख आहे. त्यावर फेसबुकने आतापर्यंत काय कार्यवाही केली आहे, अशी विचारणाही काँग्रेसच्या पत्रातून करण्यात आली आहे. वेणुगोपाल यांनी पत्रास पुष्टी दिली आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केली जावी, असे त्यांनी म्हटले आहे.

दावा काय : ‘भाजप-फेसबुक संबंधांमुळे भारतात हेट स्पीचविरोधी लढाईत अडचणी’

“टाइम’ नियतकालिकाच्या म्हणण्यानुसार भारतात सत्ताधारी पक्षासोबत फेसबुकचे साटेलोटे असल्याने कंपनीला हेट स्पीचविरोधी लढाईत काम करणे कठीण बनले आहे. . फेसबुकची कर्मचारी अलाफिया झोएब जुलै २०१९ मध्ये कंपनीच्या भारतीय स्टाफशी व्हिडिआे कॉलने हेट स्पीच असलेल्या १८० पोस्टबद्दल चर्चा करत होती. तेव्हा फेसबुकचे सर्वात वरिष्ठ अधिकारी शिवनाथ ठुकराल यांनी संपूर्ण मुद्दे न ऐकताच बैठक सोडली होती.

> पोस्टमध्ये आसामचे भाजप नेते शीलादित्य देव यांची पोस्टही होती. शीलादित्य यांनी एक बातमी शेअर केली होती. त्यात मुस्लिम मुलावर अत्याचाराचा आरोप होता. बांगलादेशातील मुस्लिम आमच्या लोकांना लक्ष्य करत असल्याची कमेंट शीलादित्य यांनी केली होती. या पोस्टवर आक्षेप आल्यानंतरही पोस्ट एक वर्ष होऊनही हटवली नाही.

> ठुकराल तेव्हा भारत व दक्षिण आशियात फेसबुक पब्लिक पॉलिसीचे संचालक होते. भारत सरकारशी लॉबिंग करण्याचे त्यांचे काम होते. फेसबुकच्या काही माजी कर्मचाऱ्यांच्या मते, ठुकराल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी हा मुद्दा मांडत. राजकीय नेत्याची पोस्ट हेट स्पीचच्या कक्षेत आल्यास ते कसे हाताळावे, हे त्यांनी समजावले होते. ठुकराल आधी भाजपशी संबंधित होते.

> मेमध्ये फेसबुकचे सीईआे मार्क झुकेरबर्ग यांनी गुंतवणूकदारांशी चर्चा केली होती. भारतात लोक मोठ्या संख्येने व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्यवसायाच्या दृष्टीने ही मोठी संधी आहे, असे त्यांनी म्हटले होते.

अर्थमंत्री अर्थव्यवस्थेबाबत देवदूत होऊन उत्तर देतील काय? : काँग्रेस

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या ‘अॅक्ट ऑफ गॉड’ वक्तव्यावरून शनिवारी त्यांना लक्ष्य केले. महामारी दैवी घटना असेल तर २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० दरम्यानच्या अर्थव्यवस्थेच्या वाईट व्यवस्थापनाची व्याख्या कशी करणार? अर्थमंत्री देवदूत होऊन त्याचे उत्तर देतील काय? , असा प्रश्न चिदंबरम यांनी विचारला आहे. सरकारच्या अार्थिक निर्णयांवर चिदंबरम यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती.

आता सरकारचे संपूर्ण १०० रुपये थेट जनतेला मिळतात : जावडेकर

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर शनिवारी म्हणाले, जनधन योजना क्रांतिकारक आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात १०० रुपयांपैकी पूर्ण १०० रुपये थेट जनतेला मिळू लागले आहेत. काँग्रेस आपल्या सत्ताकाळात १०० रुपये सरकार देते. परंतु जनतेपर्यंत १५ रुपये जातात, असे सांगत. परंतु विद्यमान सरकारने सहा वर्षांत ४०.३५ कोटी जनधन खाती उघडली आहेत. सरकारच्या योजनांच्या टीकाकारांना हे उत्तर ठरेल, असे भाजपला वाटते.