आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवारी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाशेजारी झालेल्या ब्लास्ट प्रकरणातील तपास तीव्र झाला आहे. फॉरेन्सिक टीमच्या तपासणीत असे आढळले आहे की स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या टीमला अर्धी जळालेली गुलाबी रंगाची ओढणी आणि इस्त्रायली राजदूताच्या नावाने एक लिफाफा मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लिफाफ्यातून एक चिठ्ठीही मिळाली आहे. त्यात 'हा ट्रेलर आहे' असे लिहिले आहे. फॉरेन्सिक टीमने आता फिंगर प्रिंट तपासण्यास सुरुवात केली आहे.
तसेच, बॉम्ब स्फोटादरम्यान 45 हजार मोबाइल फोन अॅक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. तपास संस्थेला या परिसरातील टॉवरकडून ही माहिती मिळाली आहे. परंतु, या स्फोटात सहभागी असलेल्या लोकांनी फोन बाळगला होता का, याबाबत माहिती मिळाली नाही. दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रांच एपीजे अब्दुल कलाम रोडवर येणाऱ्या-जाणाऱ्या कॅबचा डेटाही तपासणार आहे. शुक्रवारी दुपारी 3 पासून 6 पर्यंतचा डेटा तपासला जाणार आहे.
कॅब ड्रायव्हर उलगडणार दोन संशयीतांचे रहस्य
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्हीमध्ये दोन संशयितांची ओळख पटवली आहे. ते टॅक्सीवरून खाली उतरताना दिसत आहेत. पोलिसांनी कॅब चालकाची चौकशी सुरू केली आहे. त्या आधारे संशयितांचे स्केच तयार केले जात आहे. रात्री उशिरा पोलिसांनी अनेक भागात छापा टाकला. दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशीही सुरू केली आहे.
29 व्या डिप्लोमेटिक अॅनिव्हर्सरीला झाला स्फोट
शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास दिल्लीत इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला. दूतावासाच्या इमारतीच्या 150 मीटर अंतरावर झालेल्या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही, परंतु जवळपास पार्क केलेल्या चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले. इस्रायलने याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. या स्फोटामुळे चिंता देखील वाढली कारण शुक्रवारी भारत-इस्त्रायली मुत्सद्दी संबंधांचा 29 वा वर्धापन दिन होता.
भारत आणि इस्रायलचे परराष्ट्र मंत्री फोनवर बोलले
या स्फोटाबद्दल भारत आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवर बातचित केली. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, मी इस्त्रायली परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाजी यांच्याशी बोललो आहे. आम्ही ही घटना अतिशय गंभीरपणे घेतली आहे. दूतावास आणि तेथे काम करणाऱ्या मुत्सद्दी यांना पूर्ण सुरक्षा दिली जात आहे. घटनेचा तपास सुरू असून दोषींना शोधण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही.
यानंतर इस्त्रायली परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाजी यांचे विधान आले की, भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी सर्व इस्रायली मुत्सद्दींच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. तसेच त्यांनी ब्लास्ट करणाऱ्याला लवकरच शोध घेणार असल्याचेही सांगितले आहे. मी त्यांचे आभार मानले आहेत. इस्त्रायल या बाबतीत पूर्णपणे मदत करण्यास तयार आहे.
इस्त्रायली राजदूतांनी सांगितले- 'भारतासोबत मिळून तपास करु '
दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेनंतर भारतातील इस्त्रायली राजदूत रॉन मालका यांचे विधान आले. ते म्हणाले, 'दोन देशांमधील मुत्सद्दी संबंधांच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त ही घटना घडली. हल्लेखोर आणि त्यांचे हेतू शोधण्यासाठी आम्ही भारतीय अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहोत.
ब्लास्टच्या ठिकाणाहून 1.7 किमी दूर होते VVIP
विजय चौकपासून 1.7 किलोमीटर अंतरावर लुटियंस झोनमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोडवरील जिंदल हाऊसजवळ इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला. जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा विजय चौकातच बीटिंग रिट्रीट सुरू होती, त्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांच्यासह अनेक VVIP उपस्थित होते.
देशभरात हाय अलर्ट
दिल्लीच्या सर्वात सुरक्षित भागात हा स्फोट झाल्यानंतर देशभरातील 63 विमानतळांवर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. CISF म्हणाले, 'विमानतळांसह 63 महत्त्वाच्या संस्था, सरकारी इमारतींच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली मेट्रोची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. गुप्तचर विभाग आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह बॉम्ब निरोधक पथक घटनास्थळी उपस्थित आहे. आजूबाजूचा परिसर सील केला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
9 वर्षांपूर्वीही इस्रायलला लक्ष्य केले होते
यापूर्वी फेब्रुवारी 2012 मध्ये इस्त्रायली दूतावासाच्या एका कारला लक्ष्य केले होते. इस्त्रायली राजदूतांच्या कारमध्ये 13 फेब्रुवारी 2012 रोजी हा स्फोट झाला होता. यामध्ये राजदूत चालकासह चार जण जखमी झाले होते. इस्रायलने इराणवर हल्ल्याचा आरोप लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राजधानी दिल्लीत हा पहिला स्फोट आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.