आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • CBSE Board New Assessment Scheme; CBSE Board, 10th 12th Examinations, Assessment Scheme For 10th 12th Examinations, CBSE Academic Session 2021 22; News And Live Updates

सीबीएसई परीक्षा अशी होईल:दहावी-बारावीचा 50-50% अभ्यासक्रम 2 टर्ममध्ये कव्हर होणार; टर्म-1 मध्ये फक्त MCQ; कोरोनामुळे परिस्थिती बदलली तरी निकालाचा फॉर्म्युला निश्चित

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • शाळांतील इंटर्नल असेसमेंट आणखी सक्षम करण्यासाठी हे आहेत उपाय

कोरोना महामारीमुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द कराव्या लागल्यानंतर सीबीएसईने आता आगामी शैक्षणिक सत्र म्हणजे २०२१-२२ साठी पूर्वतयारी केली आहे. सोमवारी सीबीएसईने २०२१-२२ या वर्षात इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतसाठी स्पेशल असेसमेंट स्कीमची (मूल्यांकन पद्धत) घोषणा केली. त्यानुसार, १०वी व १२वीत १००% अभ्यासक्रमावर आधारित पारंपरिक बोर्ड परीक्षेऐवजी टर्म-१ आणि टर्म-२ या नावाने वर्षातून दोन परीक्षा घेतल्या जातील. प्रत्येक परीक्षेत ५०% अभ्यासक्रमातूनच प्रश्न विचारले जातील. म्हणजे ५०% अभ्यासक्रम टर्म-१ मध्ये व उर्वरित ५०% टर्म-२ मध्ये विचारला जाईल.

दोन्ही टर्म परीक्षांचे पेपर बोर्डच तयार करेल. टर्म-१ चा पेपर बहुपर्यायी प्रश्नावर आधारित असेल. तो ओएमआर शीटवर असेल. इतकेच नव्हे तर ऑनलाइन शिक्षणासाठी अभ्यासक्रम आणखी सयुक्तिक केला जाईल. शाळांचे अंतर्गत मूल्यांकन अधिक विश्वासार्ह करण्यासाठी पावले उचलली जातील. कोरोनामुळे वाढत्या अनिश्चिततेकडे पाहता सीबीएसईने असेसमेंटच्या चार संभाव्य परिस्थितीही ठरवल्या आहेत. परिस्थिती पूर्णपणे अनुकूल राहिल्यास टर्म परीक्षा बाहेरील पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत वा बाह्य केंद्रांवर होऊ शकतात.

बिकट परिस्थितीत पुढील संपूर्ण सत्रात शाळा बंदच राहिल्यास दोन्ही टर्मचे पेपर विद्यार्थ्यांना घरूनच देता येतील. पुढील पूर्ण सत्रादरम्यान कोरोना महामारीची स्थिती कशी असेल हे पूर्णपणे अनिश्चित आहे. ही अनिश्चितता पाहता आता सीबीएसईनेही पूर्ण तयारी केली आहे. ४ प्रकारच्या परिस्थितीसाठी निकालाचा फॉर्म्युला वेगवेगळा बनवण्यात आला आहे.

जर दोन्ही टर्म परीक्षांसाठी शाळा उघडल्या तर...

 • जर कोरोना महामारीची स्थिती सुधारली तर टर्म-१ आणि टर्म-२ दोन्ही परीक्षा शाळा किंवा परीक्षा केंद्रावर आयोजित होतील.
 • अंतिम निकालांत दोन्ही टर्मच्या गुणांचे समसमान (५०:५०) योगदान मानले जाणार आहे.

जर टर्म-१ मध्ये शाळा बंद राहिली, टर्म-२ साठी खुली

 • शाळा उघडली नाही तर टर्म-१ ची परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन घरांतून होईल. टर्म-२ च्या परीक्षेपर्यंत शाळा उघडल्या तर परीक्षा पारंपरिक पद्धतीने होईल.
 • अंतिम निकालांमध्ये टर्म-१ च्या गुणांचे वेटेज कमी करण्यात येईल.

टर्म-१ शाळेत झाली, टर्म-२ मध्ये शाळा उघडली नाही

 • टर्म-१ ची परीक्षा शाळेत झाली, पण कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे मार्च-एप्रिलपर्यंत शाळा सतत बंद राहिली तर टर्म-२ चे पेपर होणार नाहीत.
 • टर्म-१ आणि इंटर्नल असेसमेंटच्या आधारावर निकाल तयार केला जाईल.

जर टर्म-१ आणि टर्म-२ दोन्हींतही शाळा बंद राहिली

 • जर पूर्ण सत्रादरम्यान शाळा एक दिवसही उघडू शकली नाही तर अशा स्थितीत टर्म-१ आणि टर्म-२ दोन्हीही परीक्षा विद्यार्थी घरूनच देतील.
 • दोन्ही टर्ममधील गुणांमध्ये अंतर्गत मूल्यांकनाचे गुण मिळवून निकाल तयार करण्यात येईल.

नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये टर्म-१ ची परीक्षा
टर्म-१ ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये होईल. ९० मिनिटांचा पेपर एमसीक्यू (मल्टिपल चॉइस क्वेश्चन) आधारित असेल. उत्तर ओएमआर शीटवर भरावे लागेल. बोर्ड परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करेल, सोबतच पेपर आणि गुणांकनाची योजनाही पाठवेल. परीक्षा बाहेरील परीक्षक व पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत होईल. ज्या दिवशी पेपर असेल, त्याच दिवशी त्याचे गुण सीबीएसईच्या वेबसाइटवर अपलोड होतील. टर्म-१ चे गुण अंतिम निकालात जोडले जातील.

मार्च-एप्रिल २०२२ मध्ये टर्म-२ ची परीक्षा
टर्म-२ परीक्षा पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये बोर्डातर्फे निर्धारित बाहेरील परीक्षा केंद्रावर होईल. दोन तासांच्या परीक्षेत पारंपरिक पद्धतीचे सविस्तर आणि लघूत्तरी प्रश्न विचारले जातील. त्या वेळीही कोरोना महामारी सुरू राहिली आणि पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेणे शक्य झाले नाही तर मिड टर्मप्रमाणेच ९० मिनिटांची परीक्षा घेतली जाईल आणि तीत एमसीक्यू प्रकारचे प्रश्न विचारले जातील, उत्तर ओएमआर शीटवरच भरावे लागेल.

शाळांतील इंटर्नल असेसमेंट अाणखी सक्षम करण्यासाठी हे आहेत उपाय

 • दोन्ही टर्मच्या परीक्षांव्यतिरिक्त ९ वी व १० वीसाठी अंतर्गत मूल्यांकन म्हणून शाळांना वर्षभरात किमान ३ पीरियोडिक टेस्ट घ्याव्या लागतील.
 • तसेच स्टुडेंट एनरिचमेंट, पोर्टफोलिअो व प्रॅक्टिकल आणि कार्यानुभव यांचाही प्रकल्पात समावेश करण्यास सांगण्यात आले आहे.
 • ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठीही शाळांना अंतर्गत मूल्यांकनात प्रत्येक युनिटची चाचणी, प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट वर्कचा समावेश करावा लागेल.
 • सर्व शाळांना सीबीएसईच्या आयटी पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकन गुण अपलोड करावे लागतील.
बातम्या आणखी आहेत...