आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिमाचल प्रदेशातील कोविड किट खरेदी घोटाळ्यात नाव आल्यानंतर सत्तारूढ भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांनी बुधवारी राजीनामा दिला. कोरोना संकटात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून देशात प्रथमच एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला पद सोडावे लागले.
कोविड-१९ पासून बचावासाठी उपकरण खरेदीच्या बदल्यात पुरवठादाराकडून ५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून तपास संस्थांनी २१ मे रोजी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. अजयकुमार गुप्ता यांना अटक केली होती. ४३ सेकंदांचा हा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली हाेती. तपासात आजवर सरकार व भाजपच्या एखाद्या नेत्याचे नाव प्रत्यक्षपणे आलेले नाही. मात्र, डाॅ. बिंदल यांच्यासह काही भाजप नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षही त्यांच्यावर आरोप करत होते. डॉ. गुप्तांच्या अटकेच्या आठवडाभरानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पाठवलेल्या राजीनाम्यात डॉ. बिंदल यांनी म्हटले आहे की, आपण नैतिकदृष्ट्या पद सोडत आहोत, जेणेकरून घोटाळ्याचा तपास कोणत्याही दबावाविना व्हावा. माजी आरोग्यमंत्री आणि चार वेळचे आमदार डाॅ. बिंदल यांनी घोटाळ्यात सहभागाचे आरोप फेटाळले आहेत.
विरोधक म्हणाले, घोटाळ्यात बड्या नेत्यांचा समावेश
कोविड किट खरेदीत काळेबेरे होते. यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. महामारीतही असे घोटाळे भाजपची पोलखोल करत आहेत. यात भाजपच्या बड्या नेत्यांचा हात असल्याचे राजीनाम्यावरून सिद्ध होते. - मुकेश अग्निहाेत्री, विरोधी पक्षनेते
मुख्यमंत्री ठाकूर म्हणाले, टिप्पणी करणे योग्य नाही
राजीनाम्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला. दोषींविरुद्ध कठाेर कारवाई केली जाईल. विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. - जयराम ठाकूर, मुख्यमंत्री हिमाचल प्रदेश
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.