आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • By Creating A Spy Network Of 200 Students, Exposing The Corrupt Stone throwers; News And Live Updates

दिव्य मराठी मुलाखत:200 विद्यार्थ्यांचे गुप्तहेरांचे जाळे तयार करून भ्रष्टाचारी, दगडफेक करणाऱ्यांना उघडे पाडले, ज्या हाती दगड होते त्या हातांत चेंडू देऊन काश्मिरी भावना पेरली : मलिक

शिलाँग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस-सैन्यावर कोणी दगडफेक केली तर त्याला गोळी घाला, असे स्पष्ट सांगितले होते
  • कलम 370 हटवल्याच्या घटनेस आज 2 वर्षे पूर्ण

काश्मीरमध्ये माझे गुप्तहेर होते तेथील २०० विद्यार्थी नेते. ते मला कधीही भेटू वा बोलू शकत असत. ते मला सर्व माहिती देत असत. जुन्या मुख्यमंत्र्यांपासून आयएएस-आयपीएसच्या भ्रष्टाचाराची माहिती देत असत. हे म्हणणे आहे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि कलम ३७० हटवण्याच्या वेळी महत्त्वाच्या भूमिकेत राहिलेले सत्यपाल मलिक यांचे. सध्या मेघालयचे राज्यपाल असलेले मलिक यांनी कलम ३७० हटवल्याच्या घटनेस दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध मुद्द्यांवर दैनिक भास्करचे प्रमोद कुमार यांच्याशी मुक्त संवाद साधला. त्यातील संपादित भाग...

काश्मीरच्या नेत्यांनी घटनात्मक चुका केल्या नसत्या तर आम्ही तेथून कलम ३७० हटवण्याची शिफारस करू शकलो नसतो : मलिक

३७० रद्द करण्यासाठी तुम्हीच का?
मी तर बिहारमध्ये खुश होतो. पण पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणाले की, तुम्ही समाजवादी नेते होता. तुमच्याशी सर्वांचे चांगले संबंध आहेत. तुमच्याविरुद्ध बंड होणार नाही. कलम ३७० केव्हा हटवले जाईल हे तेव्हा निश्चित नव्हते. लोकांना विश्वासात कसे घ्यायचे, दगडफेक करणाऱ्यांशी कसे वागायचे हे मला माहीत होते

तेथील नेत्यांकडून कुठे चूक झाली?
तेथील नेत्यांनी घटनात्मक चुका केल्या नसत्या तर आमच्याकडे कलम ३७० रद्द करण्याचे अधिकार आले नसते आणि आम्ही शिफारस करू शकलो नसतो. सरकार बनवण्यासाठी मेहबूबा बाहेर वक्तव्य देत होत्या, पण पाठिंब्याचे पत्र दिले नाही. ईदचा दिवस असल्याने माझ्याकडे स्टाफही नव्हता. आम्ही फॅक्स केला असे हे लोक सांगत होते, पण रात्री ८ पर्यंत मला फॅक्स मिळाला नाही. ते माझ्याकडे पत्र घेऊन येऊ शकत होते, रात्री ८ वाजता मी विधानसभा विसर्जित केली. भाजपलाही बोलावले नाही कारण घटनात्मक स्तरावर ते टिकणार नाही हे मला माहीत होते. दुसऱ्या दिवशी माध्यमांना सर्व सांगितले. नेते सुप्रीम कोर्टात गेले, तेथे आमची बाजू योग्य ठरली. त्यांचे सरकार स्थापन झाले असते तर कलम ३७० हटवले पाहिजे असे त्यांनी लिहिलेच नसते.

हिंसेशिवाय यश मिळेल असे वाटले होते?
पीएम-गृहमंत्र्यांनी नियोजनबद्धपणे काम केले आणि माझ्याकडे जबाबदारी सोपवली. तेथे देव आणि जनता दोघांनीही मला साथ दिली. मी तेथील माजी मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जमवले. त्यांना उघडे पाडल्याने जनतेचा विश्वास उडाला. काश्मीरची खडान‌्खडा माहिती असलेल्या २०० विद्यार्थ्यांना घेऊन स्वत:चे गुप्तहेरांचे जाळे बनवले. त्यांच्याकडून मला भ्रष्ट नेते, अिधकारी, दगडफेक आणि फंडिंग करणाऱ्यांची माहिती मिळत गेली. त्याआधारे लष्कर व पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. एका वर्षात ४० पदवी कॉलेज उघडली. २८० शाळा अपग्रेड केल्या. एम्स आणि आयआयएम आणले. अधिकाऱ्यांकडून समस्या सोडवल्या. त्यामुळे विश्वास निर्माण झाल्याने दगडफेक करणाऱ्यांची नवीन भरती बंद झाली. दोन मोठे स्टेडियम बनवले आणि ज्या हातांत दगड होते त्या हातांत चेंडू सोपवला.

पंचायत निवडणूक टर्निंग पॉइंट होता का?
होय.. अितरेक्यांनी गोळी घालण्याचे ठरवले. तिरंगा पकडणारे वाचणार नाहीत, असे नेत्यांचे म्हणणे होते. अशा वेळी जेथे ४ हजार सरपंच निवडून गेले आणि एकही गोळी चालली नाही. मी स्पष्ट निर्देश दिले होते की, पोलिस किंवा सैनिकांवर कोणी दगड फेकला तर त्याला गोळी घाला. अशा अतिरेक्यांना गोळी मारल्यास पोलिस केस होणार नाही की कोणी विचारणारही नाही. जेव्हा काही जणांनी सैनिकांवर दगड फेकले तेव्हा तिन्ही सैन्यांसोबत पोलिसांनी त्यांना गोळ्या घातल्या असता त्यांची हिंमत खचली.

इंटेलिजन्स आणि तेथील नेत्यांकडे काय इनपुट होते? काश्मिरी पोलिसांनी विरोध केला नाही का?
इंटेलिजन्सला वाटत होते की, हजारो लोक मरतील. परंतु मला माझ्या नेटवर्कवर भरवसा होता. मला सांगितले गेले होते की, ठाणी एसआरपीएफच्या ताब्यात द्यावीत. मी हे करण्यापेक्षा पोलिसांना दिल्या जाणाऱ्या सुविधा वाढवल्या.

नेत्यांच्या अटकेमुळे पोलिस मागे हटले होते का?
मला सांगितले गेले की पोलिस तर नेत्यांच्या घराबाहेर उभे आहेत. त्यांना वाटत होते की हे सत्तेत राहतील. त्यामुळे घरात घुसून अटक करत नाहीत. मी तत्काळ या नेत्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितले की आम्हीच सत्तेत असू. त्यांना अटक केली तर आम्ही सोबत आहोत. मग काय अधिकाऱ्यांनी ताबडतोब अटक केली, जेणेकरून हे लोक दंगल करणार नाहीत. मेहबूबांची बहीण धरणे देण्यासाठी गेली तेव्हा त्यांच्यासोबत दोन माणसेही नव्हती. यामुळे त्यांचे मनोबल खचत गेले आणि लोक साथ सोडत गेले.

म्हणजे लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला?
३० वर्षांत पहिल्यांदाच असे झाले की गृहमंत्री गेले आणि लोकांनी बहिष्कार घातला नाही. हुरियत ३० वर्षांपासून बहिष्कार घालत आला आहे. ५ ऑगस्ट रोजी ३७० कलम हटले आणि ३० ऑक्टोबरला बापूंच्या हौतात्म्याच्या दिवशी एका कार्यक्रमात हजारो लोक जमले आणि गव्हर्नर जिंदाबादचे नारे दिले. मी २ कोटी देऊन दोन मोठे फुटबॉल स्टेडियम बनवले असता एका वर्षात काश्मीरचा संघ देशात तिसऱ्या क्रमांकावर आला. यासीन मलिक यांनी हुरियतची बैठक बोलावली असता तिला लोक गेले नाही. ज्यांनी १० वर्षांत टीव्ही, चित्रपट पाहिला नाही ते २० हजार लोक स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी आले.

तुमच्या मते काश्मीरसंदर्भात विकासाचे व्हिजन पूर्ण होऊ शकले का?
कुठे करू शकलो मी? रोजगार द्यायचा होता. तेथे विकास करायचा होता. ज्या अधिकाऱ्यांना मी गावी पाठवले त्यांना गावात पोहोचून लोकांच्या समस्यांशी निगडित प्रगती सांगायची होती. तेही गेले नाही. ब्यूरोक्रसी रद्दाड आणि भ्रष्ट आहे.

अपवाद म्हणून तुम्ही काश्मीरला राहावे, असा प्रस्ताव होता का?
हे बघा, मी कोणत्याही सरकारी एजन्सीचे ऐकून काम करत नव्हतो. त्यामुळे कोणत्याही एजन्सीला मी तेथे राहावे, असे वाटत नव्हते. ज्या नेत्यांना मी कैदेत पाठवले त्यांनाही मी नको होतो. तेथील शांततेत ते सहकार्य करत नव्हते. कारण ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या चिडू लागले होते. यूटी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यांवर चालते. पण मी असताना हे शक्य नव्हते. मी काश्मीर आणि लडाखचा एलजी बनून काम करावे, असे गृहमंत्र्यांना वाटत होते. मात्र इंटेलिजन्सचा अहवाल होता की पाकिस्तानने मला मारण्यासाठी आयडी एक्स्पर्ट काश्मिरात पाठवला आहे. पाकिस्तानी सेनेची फ्रिक्वेन्सी कॅच झाल्यावर एकच बोलणे होते की, सत्यपाल मलिकला मारायचे आहे.

एका वर्षात तीन बदल्या आणि एका वर्षात चार राज्ये?
हसून, आता आणखी एक बदली होऊ शकते. मी अंगठाछाप राज्यपाल नाहीय. शिक्षित आहे. मी बोलतो. परंतु पीएम आणि गृहमंत्र्यांच्या मेहरबानीमुळे मला हटवले गेले नाही. गोव्यातून तर मी स्वत:हून बदली मागितली होती. तेथे कोविडची चांगली हाताळणी होत नव्हती. माझ्या मते नर्सच्या नियुक्तीत सीएमने हस्तक्षेप करू नये.

बातम्या आणखी आहेत...