आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहांच्या दरबारात कॅप्टन:नाराज अमरिंदर यांचा शेतकऱ्यांचे निमित्त करून नवा राजकीय डाव; नाराज जी-23च्या माध्यमातून सिब्बल यांनी राहुलना घेरले

दिल्ली/जालंधर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपमध्ये हालचाली : अमरिंदर सिंग यांनी घेतली शहांची भेट; कृषी कायद्यांवर चर्चा

पंजाब काँग्रेसमधील कलहामुळे आता केंद्रीय राजकारणही ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे नाराज माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास चर्चा केली आणि खळबळ माजली. सूत्रांनुसार, कॅप्टन शेतकरी आंदोलनाचा आधार घेत नवा राजकीय मार्ग शोधू पाहतील. तर, भाजप त्यांच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनावर तोडगा काढू शकते.

कॅप्टन सोशल मीडियावर म्हणतात, “गृहमंत्र्यांशी दीर्घ काळापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा केली. कायदा रद्द करून एमएसपीची हमी देऊन पेच सोडवा, अशी विनंती केली.’ तत्पूर्वी काँग्रेसच्या नाराज जी-२३ गटातून कपिल सिब्बल यांनी अचानक पक्षश्रेष्ठींवर हल्लाबोल करत नव्या मोर्चेबांधणीचे संकेत दिले. गुलाम नबी आझाद यांनी तत्काळ कार्यकारिणीची बैठक घ्यावी, अशी मागणी केली.

सिब्बल यांचा प्रश्न : स्थायी अध्यक्ष नाही, निर्णय कसे?
सिब्बल म्हणाले,‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर नाही. पक्ष सोडून जाणार नाही. पंजाबमध्ये जे होत आहे, त्याचा अर्थ काय? त्यामुळे आयएसआय, पाकिस्तानला फायदा आहे. सीडब्ल्यूसीची बैठक बोलवावी.’ त्याच्या उत्तरात काँग्रेसच्या यूथ ब्रिगेडने सिब्बल यांच्यावर निशाणा साधला. पक्ष प्रवक्ता अजय माकन म्हणाले,‘संघटनात्मक पार्श्वभूमी नसतानाही सिब्बल मंत्री झाले. पक्षात सर्वांचे म्हणणे ऐकले जात आहे. ओळख मिळवून देणाऱ्या संघटनेला कमी लेखू नये.’ दरम्यान, दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांनी सिब्बल यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.

काँग्रेसला नवे रूप देण्याच्या राहुल यांच्या इराद्यामुळे ‘जुन्या’ काँग्रेसमध्ये खळबळ, पुन्हा नव्या मागण्या
कन्हैया कुमारचा काँग्रेस प्रवेश आणि जिग्नेश मेवाणीने पाठिंबा दिल्यानंतर एक दिवसाने जी-२३ या असंतुष्ट गटाने पुन्हा ‘अंतर्गत लोकशाही’चा झेंडा उभारला. ही सव्वाशे वर्षे जुन्या काँग्रेसमध्ये आर-पारची लढाई मानली जात आहे. राहुल यांची वाढती ताकद आणि त्यांच्या निर्णयांवर सोनियांचे शिक्कामोर्तब पाहून ज्येष्ठांनी जाहीर नाराजी दर्शवली. राहुल पितृपक्षानंतर प्रदेश शाखा आणि संसदीय पक्षाबाबत महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत, हे कळल्यावर जी-२३ च्या नेत्यांनी मंगळवारी रात्री उशिरा फोनवर चर्चा केली. त्यानंतर वेगवेगळी आघाडी उघडण्यात आली. राहुल यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरावा आणि कार्यकारिणीच्या बैठकीत सिब्बल यांच्या नेतृत्वात टीम स्थापनेचा प्रस्ताव यावा, ही टीम पक्ष मजबूत करण्याची योजना सादर करेल, अशी रणनीती आहे.

असंतुष्टांच्या ३ मागण्या

  • पक्षाध्यक्षांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा. उशीर करू शकत नाही.
  • निवडणुका असलेल्या राज्यांची रणनीती, तिकिटांचे निर्णय सामूहिक पद्धतीने व्हावेत.
  • २ महिन्यांत २० नेते काँग्रेस सोडून गेले. नेते सोडून जाऊ नयेत यासाठी रणनीती तयार करावी.

भेटीचा अन्वयार्थ... नवा राज-मार्ग तयार करू शकतात कॅप्टन

1. नवा पक्ष स्थापन करू शकतात?
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंजाबात भाजप अडचणीत आहे. कॅप्टन शेतकऱ्यांसोबत राहिलेले आहेत. ते प्रादेशिक पक्ष स्थापून नवा पर्याय ठरू शकतात. भाजपसोबत युती करून निवडणूकही लढवू शकतात. असे झाल्यास काँग्रेसमधील कलह व अकाली दलाच्या दुर्बलतेचा फायदा कॅप्टन आणि भाजप उचलू पाहतील.

2. भाजपमध्ये प्रवेश करू शकतात?
कॅप्टन यांची राष्ट्रवादी स्टाइल भाजपला अनुरूप आहे. राष्ट्रीय सुरक्षेवर कॅप्टन यांनी अनेकदा पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. सीएमपदाचा राजीनामा देतानाही त्यांनी सिद्धूंना पाकिस्तान समर्थक संबोधले होते. कॅप्टन भाजपत आल्यास राष्ट्रवाद मुद्दा बनू शकताे. भाजपलाही मोठा शीख चेहरा मिळू शकतो.

3. कृषी कायद्यांवर निर्णय
कॅप्टन नवा पक्ष स्थापन करो वा भाजपत जावो, जोवर कृषी कायद्यांवर निर्णय होत नाही तोवर फायदा होणार नाही. सरकार कृषी कायद्यांवर २ ते ३ महिन्यांत धक्कादायक निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा आहे. यामुळे भाजप कॅप्टन यांना सोबत घेऊन पंजाबमध्ये आपली राजकीय पकड मजबूत करू शकते.

4. उत्तर प्रदेशातही होणार फायदा
शेतकरी आंदोलनाचा मुख्य परिणाम पंजाब आणि हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत याच भागाने भाजपच्या विजयात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाल्यास पश्चिम उत्तर प्रदेशातील सुमारे ६० जागांवर भाजपचा मोठा फायदा होईल.

बातम्या आणखी आहेत...