आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Capturing Campaign In The Villages Of Assam Villagers Allege 'We Have Burnt Everything

आसाम:‘आमची घरेदारे जाळली, आता कुटुंब शेतात उघड्यावर’; धौलपूर गावात अतिक्रमण हटाव अभियानानंतर लोकांचा संताप

गुवाहाटी / दिलीपकुमार शर्माएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हजारो एकर जमिनीवरील अतिक्रमणामुळे कारवाईचा प्रशासनाचा दावा

आसाममधील दरंग जिल्ह्यातील धौलपूर गावांत राज्य सरकारच्या अभियानादरम्यान झालेल्या हिंसक धुमश्चक्रीनंतर गावात सन्नाटा आहे. पोलिस प्रशासनाच्या भीतीने गावातील लोक सुता नदीच्या किनारी पुरुष-महिला कच्च्याबच्च्यांसह तात्पुरत्या निवाऱ्याखाली मुक्कामी आहेत. सिपाझार शहरापासून सुमारे १३ किमीवर नो व सुता नदीदरम्यान ३ क्रमांकाच्या धौलपूर गावात प्रवेश करताच पाडकाम केलेली आणि पेटवलेली शेकडो घरे नजरेच्या टप्प्यात येतात. काही लोक उरलेसुरले सामान नदीच्या दुसऱ्या मार्गे घेऊन जाताना दिसले. परंतु बहुतांश लोक बेघर झाले. ते आता खुल्या आकाशाखाली शेतात मुलेबाळे, वृद्धांसह राहतात. मात्र सिपाझार तालुक्यात हजारो एकर जमिनीवर बेकायदा ताबा करण्यात आला आहे, असा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. परंतु गावकऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. गेली ४०-५० वर्षांपासून नदीकिनारी वास्तव्याला असल्याचे गावकरी सांगतात. २३ सप्टेंबर रोजी अतिक्रमण हटाव अभियान राबवले गेले. पोलिस-प्रशासन तसेच स्थानिक लोकांत तेव्हा हिंसक धुमश्चक्री झाली होती. सुता नदीच्या किनारी असलेल्या गावात झोपड्यांतून हुंदके एेकू येत होते. पोलिस गोळीबारात मारल्या गेलेल्या मोइनुल हक (२८) यांचे कुटुंब राहत होते.

मोइनुलची आई मोइमोना बेगम यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. त्या म्हणाल्या, मला माझा मुलगा हवाय. माझ्या मुलाचे खूप वाईट केले. ३ नंबर गावातील ३८ वर्षीय मेसलन बेगम म्हणाल्या, काल रात्री आम्ही मुलांसह शेतावर झोपलो होतो. पुढे काय करायचे हे मला ठाऊक नाही. आम्ही मतदान करतो. आम्हा सर्वांची नावे एनआरसीमध्ये आहेत. आता आमची सगळी कागदपत्रे जाळण्यात आली. धौलपूर गावात जळालेल्या अवशेषांमध्ये काही महिला उरलेसुरले सामान शोधत होत्या. गावाच्या दौऱ्यावर आलेले आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भूपेन बोरा म्हणाले, निर्दोष लोकांची हत्या करण्याचा आम्ही राज्य सरकारला परवाना देऊ शकत नाहीत. आसामचे मुख्यमंत्री भीतीचे वातावरण तयार करत आहेत. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले, आम्ही सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या बाबतीत कुचराई करणार नाहीत. उद्या कोणीतरी कामाख्या मंदिरावर कब्जा करेल तेव्हा आम्ही शांत बसून राहायचे का? ही गोष्ट मान्य करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी किनारपट्टीवरील अतिक्रमण केलेल्या जमिनी मोकळ्या करण्यासाठी गोरुखुटी प्रकल्प सुरू केला आहे.

आम्ही आसामचे नागरिक, कागदपत्रांची पडताळणी करा : गावकरी
प्रशासनाने तीन मशिदी, एक मदरसादेखील पाडला. दोन क्रमांक धौलपूर गावातील अमर अली म्हणाले, आमच्या घरासमोरील मशिदीत प्रार्थना केली जाते. मोहंमद तायेत म्हणाले, या सरकारी जमिनीवर लोक ६०-७० वर्षांपासून वास्तव्याला आहेत. सरकारने एवढे दिवस काही केले नाही. सरकारला वाटत असल्यास आम्ही जमीन सोडण्यास तयार आहोत. परंतु आम्ही आसामचे नागरिक आहोत. वाटल्यास सरकारने आमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी.

बातम्या आणखी आहेत...