आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळा:बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांची सीबीआय चौकशी, राबडींना 5 तासांत 48 प्रश्न

पाटणा/ नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेजस्वी म्हणाले, ‘२०२४ पर्यंत असेच चालत राहील’

रेल्वेत चतुर्थ श्रेणीची नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री व राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांना सोमवारी सीबीआयने साडेचार तासांत ४८ प्रश्न विचारले. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १६ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ही झडती आहे की छापा, हे सांगण्यास सीबीआयने नकार दिला. दिल्लीच्या कोर्टाने लालू यादव, राबडी, मुलगी मिसा भारती यांना १५ मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

सूत्रांनुसार, सीबीआयने काही दिवसांपूर्वी राबडी यांना समन्स बजावत दिल्लीला बोलावले होते, पण राबडी यांनी ६ मार्चला पाटण्याला येऊन चौकशी करण्याची विनंती केली. बिहारमध्ये सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सीबीआयचे अधिकारी सकाळी १० वाजता पोहोचले आणि दुपारी २.४० वाजता तेथून निघाले. यादरम्यान, त्यांनी ४८ प्रश्न विचारले. गेल्या वर्षी २० मे रोजीही सीबीआयने राबडींच्या निवासस्थानी १४ तास पुरावे शोधले होते. सीबीआय आता लालू यादव, त्यानंतर मीसा भारती व हेमा यादव यांची चौकशी करेल. तथापि, चौकशीनंतर राबडी म्हणाल्या, ‘असे काहीच झालेले नाही. ते आम्हाला प्रत्येक वेळी त्रास देऊ शकतात, पण आम्ही ठाम राहू.’ उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, ‘२०२४ पर्यंत असेच चालणार. सीबीआयने आमच्या घरीच कार्यालय उघडावे, जेणेकरून येण्याजाण्याचा सरकारी खर्च वाचेल.’

भाजप विरोधकांचा आवाज दाबत आहे - काँग्रेस : भाजप विरोधकांचा आवाज दाबत आहे, असा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला. त्या म्हणाल्या, जे विरोधी पक्षनेता भाजपसमोर झुकत नाहीत त्यांचा ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून छळ केला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ज्या राज्यांत विरोधक आहेत तेथे त्यांना काम करू दिले जाणार नाही, हा ट्रेंड रूजत आहे.

हे प्रश्न विचारले : किती लोकांकडून जमीन घेत नोकरी दिली? राबडी म्हणाल्या, असे काहीच नाही
{पाटण्यातील ८-९ लोकांकडून जमीन घेतली आणि त्यांना नोकऱ्या दिल्या, हा योगायोग आहे का?
{त्यांना लालू कुटुंब कसे ओळखते?
{स्व. किशुनदेव राय यांनी खरेदी खताद्वारे २००८ मध्ये पाटण्यातील ३३७५ चौ. फूट जमीन ३.७५ लाख रुपयांत तुमच्या नावे केली, हे खरे आहे? त्यांच्या कुटुंबातील ३ सदस्यांना मुंबई सेंट्रलमध्ये नोकरी दिली का?
{दिल्लीची कंपनी एके इन्फोसिस्टिमला हजारी राय यांनी फेब्रुवारी २००७ मध्ये १० लाख ८३ हजारांत जमीन विकली होती, हे खरे आहे का? हजारी राय यांच्या दोन पुतण्यांना जबलपूरमध्ये पश्चिम-मध्य रेल्वेत नोकरी दिली. नंतर कंपनीच्या मालमत्तेचे सर्व अधिकार तुमच्या व मुलीच्या नावे करण्यात आले. मग २०१४ मध्ये तुम्ही कंपनीचे बहुतांश शेअर खरेदी केले व अचानक संचालिका कशा झाल्या?
{तुमच्या कुटुंबाने केलेले जमिनीचे सर्व व्यवहार रोख झाले? खरेदीखत व गिफ्ट डीडच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ७ जमिनींचा सर्कल रेट ४.३९ कोटींहून अधिक आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
{लालूप्रसाद यांचे ओएसडी भोला यादव कोणते काम पाहत होते?
{भोला मध्यस्थ म्हणून काम करायचे?

विरोधी पक्षनेत्यांनी पीएमना पत्र पाठवल्याच्या दुसऱ्याच दिवशी सीबीआयची धडक
नऊ विरोधी पक्षनेत्यांनी एक दिवस आधीच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केंद्रीय तपास यंत्रणांचा (सीबीआय-ईडी) दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला होता. याच्या दुसऱ्याच दिवशी सीबीआयने राबडीदेवी यांच्या निवासस्थानी धडक दिली. या पत्रावर तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राजद नेते तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे (जम्मू-काश्मीर) नेते फारूक अब्दुल्ला, उद्धव ठाकरे आणि सपा नेते अखिलेश यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अबकारी घोटाळा : सिसोदियांची २० मार्चपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी
दिल्लीच्या राऊज अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने सोमवारी अबकारी घोटाळ्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सोमवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपली. विशेष न्यायालय सीबीआयला म्हणाले, आता आम्हाला सीबीआयच्या कोठडीची गरज नाही. यानंतर विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी सिसोदियांची २० मार्चपर्यंत तुरुंगात रवानगी केली. सिसोदिया यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...