आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याविरोधात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बँकिंग फसवणुकीप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या कन्सॉर्टियमची ३४,६१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयकडे दाखल झालेला हा आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा बँकिंग फसवणुकीचा गुन्हा आहे.
यापूर्वी, १२ फेब्रुवारी रोजी सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड, तिचे तत्कालीन अध्यक्ष, एमडी आणि इतरांविरुद्ध २२,८४२ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ते प्रकरण स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील २८ बँकांशी संबंधित होते.
युनियन बँकेच्या तक्रारीवरून झाली ही कारवाई
१७ बँकांच्या युनियन बँकेच्या नेतृत्वाखालील संघाने दिवाण हाउसिंग फायनान्सला २०१० ते २०१८ दरम्यान ४२,८७१ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. युनियन बँकेने आपल्या तक्रारीत डीएचएफएलच्या जुन्या व्यवस्थापन आणि प्रवर्तकांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. बँकांनी आरोप केला आहे की, डीएचएफएलच्या लेखा परीक्षणामध्ये कंपनीने आर्थिक अनियमितता केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी कर्ज स्वरूपात मिळालेले पैसे इतर कामात वळवले. वाधवान बंधूंनी जनतेच्या पैशाचा गैरवापर करून विश्वासघाताचे गुन्हेगारी कृत्य केले. मे २०१९ पासून कर्जाची परतफेड करण्यात चालढकल करून ३४,६१४ कोटींची फसवणूक केली. तक्रारीत ऑडिट फर्म केपीएमजीच्या तपासणीच्या निकालांचाही उल्लेख केला आहे.
गुन्हेगारी कटाचा गुन्हा
सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, युनियन बँकेच्या तक्रारीवरून तपास यंत्रणेने २० जून रोजी डीएचएफएलचे तत्कालीन सीएमडी कपिल वाधवान, संचालक धीरज वाधवान आणि सहा रिअॅल्टी कंपन्यांविरुद्ध गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर यूबीआयसह १७ बँकांची फसवणूक करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या ५० अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी मुंबईतील आरोपींच्या १२ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये अमरेलीज रिअॅल्टर्सचे सुधाकर शेट्टी आणि इतर आठ बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे.
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात वाधवान बंधू आधीच चौकशीच्या फेऱ्यात आहेत. येस बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआय आणि ईडी खटल्याच्या आधारे दोघांना अटक झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.