आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई 12 वी:फक्त 4 विषयांची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ‘ओएमआर शीट’वर घेण्यास अनेक राज्ये सहमत; दहावीची परीक्षा नाहीच! - राज्य सरकार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • 1 जूनला वेळापत्रक?; आपल्याच शाळेत परीक्षा, दीड तासाची वेळ शक्य

सीबीएसई बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून त्यांच्याच शाळेत ओएमआर शीटवर दीड तासाचे चार पेपर घेतले जाऊ शकतात. नवे वेळापत्रक १ जूनपर्यंत जाहीर होऊ शकते. देशातील ३२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी बारावीची परीक्षा घेण्यास सहमती दर्शवली आहे. फक्त चार राज्ये दिल्ली, महाराष्ट्र, गोवा व अंदमान-निकोबारने परीक्षा न घेण्याचे म्हटले आहे. परीक्षेसाठी तयार राज्यांपैकी ३ राज्ये राजस्थान, तेलंगण व त्रिपुरा पहिला पर्याय म्हणजे परीक्षा केंद्रांवरच पारंपरिक पद्धतीने ३ तासांच्या लेखी परीक्षेच्या बाजूने आहेत. या राज्यांनी म्हटले आहे की, ऐनवेळी स्वरूप बदलणे योग्य होणार नाही.

तर २९ राज्यांनी दुसऱ्या पर्यायाचे समर्थन करत म्हटले आहे की, परीक्षा केंद्राऐवजी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत ओएमआर शीटवर दीड तासांचे चार पेपर घेतले जावेत. त्यात एक भाषा व तीन वैकल्पिक पेपर असावेत. सहमती दर्शवणारी सहा राज्ये केरळ, आसाम, पंजाब, झारखंड, सिक्कीम व दमण-दीवने परीक्षा घेण्याआधी विद्यार्थ्यांना लस द्यायचे म्हटले आहे. कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश व हरियाणा यांनी पेपर पॅटर्नमध्ये कमी बदल करण्याचे सांगितले आहे.

१५ जुलै ते २६ ऑगस्टदरम्यान होऊ शकते परीक्षा
परीक्षेसाठी दोन टाइम स्लॉट प्रस्तावित आहेत - १५ जुलै ते १ ऑगस्ट आणि ८ ते २६ ऑगस्ट.

सीबीएसईला बघूनच राज्ये ठरवतील आपले धोरण
परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षेचे स्वरूप जाहीर झाल्यानंतरच बहुतांश राज्ये त्यांच्या मंडळाच्या परीक्षेचे स्वरूप ठरवतील. मात्र, केंद्राने आधीच राज्ये त्यांच्या स्थितीनुसार निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही बारावीनंतरचे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत आपल्या राज्याच्या मुलांसाठी चांगली संधी मिळावी म्हणून सीबीएसईचा पॅटर्न स्वीकारण्याकडे राज्यांचा कल असेल.

ओएमआर शीटचा फायदा
देशातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेत उत्तरपत्रिकेऐवजी ओएमआर शीट वापरले जाते. यात विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ पेनाने रंगवावे लागते. या पद्धतीत परीक्षेतील शारीरिक स्पर्श कमीत कमी केला जाऊ शकतो. मूल्यांकनही संगणकाद्वारे होण्याने निकाल लवकर लागू शकतो.

नववी-दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण

मुंबई - इयत्ता दहावीची यंदाची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असून नववी व दहावीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे गुण दिले जाणार आहेत. त्यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रिमंडळ बैठकीनंतर वर्षा निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने दहावीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.

दहावी परीक्षा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी करताना १२ वी परीक्षा घेऊ शकता, मग दहावीची का नाही, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारकडे केली आहे. दहावी परीक्षेसंदर्भात राज्य सरकारला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. राज्य सरकार दहावी परीक्षा न घेण्यावर अजूनही ठाम आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतिम गुण देण्याचे निकष राज्य सरकारने निश्चित केले आहेत. त्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना भेटीदरम्यान दिली. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत घोषणा करावी, अशी विनंती गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना केल्याचे समजते. इयत्ता १० वीचे गुण देताना विद्यार्थ्यांचे दोन वर्षांचे म्हणजे ९ वी आणि १० वीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

विद्यार्थी-पालकांत संभ्रम
इयत्ता दहावीच्या परीक्षा होणार की नाही, हाेणार असतील कर कशा होणार? परीक्षा झाल्या तर ठीक, नाहीच झाल्या तर या विद्यार्थ्यांना गुण कसे दिले जाणार? हे गुण दिले जात असताना कशाच्या आधारे मूल्यमान करणार, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे सध्या विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम आहे. तो आता संपेल.

बातम्या आणखी आहेत...