आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीतील काेराेना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र आणि दिल्ली सरकारने सुविधांमध्ये आणखी वाढ करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. रुग्णांवर चांगल्यात चांगला उपचार करण्यासाठी दाेन्ही सरकारांनी रुग्णालयांतील खाटा आणि व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवावी, असे आदेश मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले. रुग्णालयांतील खाटा आणि उपचार सुनिश्चित करण्याबाबत दाखल याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. रुग्णांच्या पदरी निराशा पडू नये यासाठी राजधानीतील सर्व रुग्णालये खाटांच्या उपलब्धतेची दरराेज अद्ययावत माहिती जाहीर करतील, अशी आशा न्यायालयाने व्यक्त केली. दिल्लीत ९ जूनपर्यंत ९,१७९ खाटा उपलब्ध हाेत्या. यापैकी ४,९१४ खाटा भरलेल्या आहेत. एकूण ५६९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून त्यातील ३१५ वापरात असल्याचे केजरीवाल सरकारने न्यायालयाला सांगितले.
देशात तासाला १६ मृत्यू, ५२४ नवे रुग्ण; एकूण रुग्ण ३.१३ लाखांवर
भारतात तासाला ५२४ नवे रुग्ण आढळत आहेत आणि १६ मृत्यू होत आहेत. शनिवारी १२,५७३ नवे रुग्ण आढळले, तर ३८० मृत्यू झाले. त्यामुळे मृतांची संख्या ९,१९४ वर गेली. तर, रुग्णांची संख्या ३.१३ लाखांच्या पुढे गेली. सर्वाधिक मृत्यू असलेल्या देशांत भारत जगात नवव्या स्थानावर गेला आहे. येथे मृत्युदर २.९४ टक्के आहे. बेल्जियम (९,६५०) आठव्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत (१.१७ लाखाहून अधिक) झाले आहेत. २४ तासांत सर्वाधिक ३,४२७ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. दिल्लीत नव्या २,१३४ रुग्णांसह संख्या ३८,९५८ वर गेली. ५७ मृत्यू झाले. तामिळनाडूत १,९८९ नवे रुग्ण आढळले. तेलंगणात एका कोरोनाबाधित महिलेच्या अंंत्ययात्रेत सहभागी एकाच कुटुंबातील १९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
गरजेनुसार बेड्स, आयसोलेशन वॉर्ड वाढवा
अनलॉक-१ मध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत याचा आढावा घेतला. शहरांमध्ये गरजेनुसार बेड्स आणि आयसोलेशन वॉर्ड वाढवा, असे निर्देश त्यांनी दिले. पंतप्रधान १६ व १७ जूनला सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.