आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जंगलात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५ नव्हे, २३ जवान शहीद झाले. रविवारी सकाळी हे समोर आले. एक जवान अजून सापडलेला नाही, तर ३१ जवान जखमी आहेत. नक्षल्यांनी टेकलगुडा जंगलात शनिवारी हा भीषण हल्ला केला होता. चकमकीनंतर नक्षल्यांनी जवानांच्या मृतदेहांवरून शस्त्रे लुटली, जवानांचे बूट-कपडेही काढून नेले. शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत चाललेल्या या चकमकीनंतर आतापर्यंत दोन शहिदांचेच मृतदेह हाती लागले आहेत. जखमींना रात्री उशिरा कसेबसे बाहेर काढता आले. तोवर फक्त पाच जवान शहीद झाल्याची माहिती होती. मात्र, रविवारी सकाळीपर्यंत सर्व मृतदेह जंगलाबाहेर आणता आले नाहीत. गेल्या १० दिवसांत हा दुसरा मोठा हल्ला आहे. २३ मार्चला नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांची बस उडवण्यात आली. त्यात ५ पोलिस शहीद झाले होते. बदलती रणनीती हे या हल्ल्यामागील कारण आहे. दरवर्षी नक्षली ८ मार्चला हल्ले सुरू करतात. यंदा जानेवारीपासून ते सुरू आहेत. दरवर्षी २-८ डिसेंबर पीएलजीए सप्ताह म्हणून पाळला जातो. यंदा नक्षली वर्षभर हल्ले करत आहेत.
जवानांचे मृतदेह गावात विखुरलेले होते, उचलणारे कोणीही नव्हते, सगळीकडे होते गणवेशधारी नक्षली
नक्षलवादी हल्ल्यानंतर पहाटे ५ वाजता ‘भास्कर’ची टीम सुकमा जिल्ह्यात दोरनापालहून ग्राउंड झीरोसाठी रवाना झाली. कच्चे रस्ते, पायवाटा व दोन नाले ओलांडत टीम सकाळी ८.३० वाजता विजापूर-सुकमा सीमेवरील टेकलगुडा गावात पोहोचली. हा प्रवास सुमारे ६० किमीचा होता.
गावात दृश्य भयंकर होते. गावात जाताच ६०-७० गणवेशधारी नक्षलवादी दिसले. त्यांना पाहताच आम्ही दुचाकी एका झाडाखाली लावली. एक मिनिटही होत नाही तोच आणखी काही नक्षलवादी आले आणि आमची चौकशी करू लागले. आम्ही पत्रकार आहोत असे सांगताच नक्षलवादी थोडे वरमले आणि आमचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक विचारला. किती जवान शहीद झाले, असा प्रश्न आम्ही विचारला. थोड्या वेळाने त्यांनी ‘२० पेक्षा जास्त’ असे उत्तर दिले. नक्षलवाद्यांचे किती नुकसान झाले? या प्रश्नावर,“त्याची माहिती नाही’ असे सांगण्यात आले. दरम्यान, काही ग्रामस्थही आले. त्यांच्यासोबत पुढे जा, असा इशारा नक्षलवाद्यांनी केला. झाडापासून १०० मीटर अंतरावर गेलो असता चहूकडे जवानांचे मृतदेह दिसू लागले. एका ठिकाणी ६ मृतदेह ठेवण्यात आले होते. नक्षलींनी जवानांची शस्त्रास्त्रे काढून घेतल्यानंतर मृतदेह एका ठिकाणी ठेवले आहेत, असे प्रथमदर्शनी वाटले. ज्या ठिकाणी जवानांचे मृतदेह होते त्याच्या जवळच एका खाटेच्या बाजूला आणखी एका जवानाचा मृतदेह पडलेला होता. संपूर्ण भागात आम्हाला एकही जिवंत जवान दिसला नाही. संपूर्ण भाग नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्यासारखे जाणवले. नक्षलवाद्यांनी शहीद जवानांची शस्त्रास्त्रे काढून घेतली होती.
अनेक शहिदांचे बूट आणि लढण्यासाठी उपयुक्त साहित्यही मृतदेहांवरून काढून घेण्यात आले होते. हल्ल्याबाबत ग्रामस्थांना विचारले तेव्हा कोणीही काही बोलत नव्हते. परिसरात १५ ते २० घरांच्या चार वस्त्या आहेत. यातील तीन वस्त्यांत लोक होते, मात्र एक वस्ती ओस होती. चकमक झाली ते स्थळ पाहता जवान गावात आले तेव्हा ते तयारीत नसावेत असे जाणवले. उलट नक्षलवादी सज्ज होते. गावात ठिकठिकाणी गोळ्या व रक्ताच्या खुणा होत्या. गावातील शांतता व पूर्ण भागातील चित्र खूपच भीतिदायक होते. आम्ही असतानाच आम्हाला डोंगराकडे काळ्या कपड्यांत नक्षलवाद्यांचा गट दिसला. बहुधा नक्षलवाद्यांच्या पीएलजीएची तुकडी असावी. परिसरातील वातावरणावरून जाणवले की आम्ही घटनास्थळी असताना येथे कमीत कमी तीनशेपेक्षा जास्त शस्त्रसज्ज नक्षलवादी होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.